Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Nilesh Jadhav

Others


3.5  

Nilesh Jadhav

Others


सुन्या...

सुन्या...

3 mins 190 3 mins 190

      नव्याने कामावर रुजू झाल्यानंतर कंपनीमध्ये मला एकच माणूस लक्षवेधी वाटला. तो म्हणजे "सुनील खुटवड". कोण हुशार होतं कोणी अनुभवी तर कोणी भांडखोर. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रमाणे सगळ्या प्रकारची माणसं आमच्या कंपनी मध्ये होती. माझा पहिलाच दिवस असल्यामुळे मी जरा शांतच होतो जिथे उभं करतील तिथे काम करत होतो. संध्याकाळी मला सुन्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी मात्र मला बारावीच्या मराठीच्या पुस्तकातला अंतू बरवा आठवला. 


      तिशीतल्या सुन्या केस पिकून गेलेला होता. नजर अशी की क्षणभर तो कुठे पाहतोय हेच कळत नव्हतं. त्याच्या हातात असलेल्या कलेमध्ये मात्र तो पारंगत होता. त्याच्याबद्दलची माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणाल तर त्याची विनोदी शैली. त्याचं विनोदाचं टायमिंग इतकं अचूक होतं की त्याच्याशी बोलताना सांभाळून बोलावं लागत असे कधी कुठला शब्द पकडून त्याच्यावर अलगद विनोद करेल याचा भरवसा नव्हता. घरचे टेन्शन हे सगळ्यांनाच असतं पण हा मात्र सतत हसत असायचा. एखाद्याच्या मदतीला चटकन धावून जायचा. तो, त्याची बायको, त्याची आई आणि त्याची मुलगी हे सुन्याचं विश्व होतं. कंपणीमधील भय्या लोकांना तो तोंडभरून शिव्या द्यायचा पण ह्या शिव्या प्रेमाच्या आहेत हे त्या लोकांनाही माहीत होतं. तर असा हा सुन्या त्याचा पोषाख पाहुन हे पात्र विनोदी आहे हे लगेच कळत होतं. अंगावर असलेलं त्याचं ते जरकीन त्याची नेहमीची पुढे आलेली ढेरी अजून मोठी करून दाखवायचं. एका बाजूला टांगलेली डब्याची बॅग आणि हातात हेल्मेट घेऊन जेंव्हा निघायचा तेंव्हा मला कित्येकदा मनोमन हसू यायचं.


       सगळ्या कंपनीत त्याचं कोणाशी जमत नाही असं अजिबात नव्हतं. सुन्या सर्वांचा लाडका होता. ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणी मात्र हस्यांचा मळा फुलायचा. त्याची एक वाईट सवय होती ती म्हणजे दारू. असा एकही दिवस नव्हता त्या दिवशी तो दारू प्यायला नाही. रोज वीस रुपयांची तरी तो घ्यायचाच. ज्या प्रमाणे बायको, मुलगी आणि आईवर तो जीव लावायचा त्याप्रमाणे तो दारूवरही तितकंच प्रेम करायचा. दारूसाठी घेतलेले पैसे मात्र त्याने कधी बुडवले नाही व्यवहाराला तो चोख होता. अख्या कंपनीचा तो सुन्या होता मी मात्र त्याला ओ खुटवड अशीच हाक मारायचो. रविवारची सुट्टी असली की कधीतरी दिसायचा नसरापूरच्या बाजारात पण सोबतीला मात्र आई, बायको, आणि मुलगी असायचीच. या तिघींशिवाय तो कधी कुठे गेलाच नाही. 


      चार वर्षांचा काळ गेला. तोवर सुन्याला आणखी एक मुलगी झाली होती. आला दिवस सारखाच रोज कामावर यायचं साहेबांची धास्ती, कामाचा ताण सगळं सगळं आहे तसं. आणि तो दिवस उजाडला. नायगावची यात्रा होती सकाळ पासूनच आम्ही सगळे नायगावला जायचं म्हणून उत्साहात होतो. संध्याकाळी आम्ही गेलो चार-पाच जण होतो. तिथे सगळ्यांनी जेवणावर ताव मारला पण या सगळ्यात सुन्याला जरा जास्तच झाली. कसाबसा त्याला हायवे पर्यंत आणला त्यानंतर अरुण भाऊच्या इथे झोप सकाळी जा आशा खुप विनवण्या केल्या पण ऐकतोय तो सुन्या कसला. शेवटी तो त्याची गाडी घेऊन गेलाच आम्हीही आपापल्या घरी गेलो. रात्रीचे अकरा वाजले असतील तेवढ्यात माझा फोन वाजला पलीकडून कुमार सांगत होता अरे सुन्याचा अक्सिडंट झालाय. मी क्षणभर सुन्नच झालो. रात्रभर डोक्यात सुन्याचे विचार थैमान घालत होते.


दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर कळालं की सगळं ठीक आहे. हेल्मेट असल्यामुळे सुन्याला जास्त लागलं नव्हतं. आठवडाभराच्या विश्रांती नंतर सुन्या परत कामावर आला एक दिवस काम करून दुसरेदीवशी अर्ध्या दिवशीच सुट्टी घेऊन डोकं दुखतंय म्हणून सुन्या घरी गेला तो आलाच नाही. नंतर कळालं की तो जास्तच आजारी पडलाय त्याचा लिव्हर खराब झाला होता अशी बातमी उडत उडत कानावर आली. महिना गेला आणि मग मात्र सुन्याची सुन्न करणारी बातमी आली. मनाला कुठेतरी आतवर जखम झाली असं वाटलं. सतत हसरा, दुसऱ्याला हसवणारा, हसवून हसवून रडवणारा सुन्या या वेळी मात्र खरोखरचा रडवून गेला तो कधीच परत न येण्यासाठी. मी माझं दुर्दैव म्हणेल कारण मला त्याला शेवटचं सुद्धा पहाता आलं नाही. 


      काही दिवसांपूर्वीच मी तिथलं काम सोडून दुसरीकडे रुजू झालो त्या ठिकाणी दुश्मनही मिळाले आणि जीवाला जीव देणारी माणसं सुध्दा भेटलीत. सगळ्या जाती धर्माची लोकं आम्ही एकत्र राहिलो. पण आजही मनातून सुन्या मात्र गेला नाही. तो आहे..! त्या वेळी त्याने केलेल्या बऱ्याचश्या विनोदांमध्ये जिवंत. त्या विनोदांची आठवण झाली की मग आजही खुप हसायला येतं आणि नकळत पाणावलेल्या डोळ्यांची कडा त्या हसण्यात सुन्या आजही जिवंत असल्याची साक्ष देऊन जाते...


Rate this content
Log in