Nilesh Jadhav

Drama

4.0  

Nilesh Jadhav

Drama

भिंत

भिंत

5 mins
293


    घरातली सर्व कामं एकदाची उरकली आणि मी सोफ्यावर अंग टाकलं. थोडासा वेळ जावा म्हणून मी मोबाईल हातात घेतला आणि मला एका सोशल साईड वर त्याचा मेसेज आलेला दिसला. ओळखलंस का मला मी अमित... क्षणभर तो मेसेज वाचून मी थोडी बावरलेच होते. पण नंतर सावरलं स्वतःला. अमित... त्याला मी कसा विसरेल.. माझं पहिलं प्रेम... आणि पहिलं प्रेम विसरता येतं का कधी..? मला अजूनही आठवतं मी त्याला पहिल्यांदा आमच्या कॉलेजच्या एन एस एस कॅम्प मध्ये पहिलं होतं. आणि का कोणास ठाऊक मला तो आवडून गेला....


    खरंतर मला समस्त पुरुष जातीचा अगदी पहिल्या पासून रागच यायचा. कारण मी त्यांची पहिल्यापासून एकच बाजू बघत आलीये. पण आयुष्यात याची एन्ट्री झाली आणि माझा दृष्टिकोन बदलला आज पर्यंत न पाहिलेली दुसरी बाजू मला कळून आली हाती. त्या दिवशी कॅम्प मध्ये आजची स्त्री सबला की अबला या विषयावर मी स्पीच दिली होती. माझ्यानंतरही बऱ्याच जणांनी भाषणे दिली त्यात हाही होताच. त्यात त्याने माझ्याच भाषणातले बरेच पॉईंट काढले होते. असा राग आला होता मला त्याचा. मग काय मी थेट त्याच्याकडे जाऊन त्याच विषयावर वाद घालू लागले पण अगदी सहज जास्त काही न बोलता त्याने मला समजावून सांगितलं होतं. म्हणतात ना प्रेमाची सुरुवात भांडणातून होते तसंच काही माझ्या बाबतीत घडणार होतं. त्याचा समजदार पणा, इतर सर्व मुलांना सांभाळून घेणं, त्याचं बोलणं अगदी सर्वच खूप वेगळं आणि आवडण्यासारखं असंच होतं.


     कॅम्प चे ते दिवस त्याच्या सानिध्यात कसे गेले ते कळलंच नाही. खूप छान बोलायचा तो.. त्याच्या याच बोलण्यात मी अडकत चालले होते. तो येऊन माझ्याशी बोलावा असं सारखंच वाटायचं. त्याचा फक्त एक शब्द कानावर येऊन धडकावा यासाठी तळमळू लागले होते. जशी अवस्था माझी होती अगदी तशीच अवस्था त्याचीही झाली होती हे कळायला मला वेळ नाही लागला. तो मला प्रपोज करणार आहे ही बातमी एव्हाना सर्व कॅम्प मध्ये पसरली खरंतर वरवर मी सर्वांना टाळत होते पण तो यावा त्याने बोलावं असं मलाही वाटत होतं. पण तो आलाच नाही कॅम्प संपला तो दुसऱ्या कॉलेजमध्ये होता त्यामुळे तो आता कधी भेटेल हे माहीतही नव्हतं. मनोमन मी खूप नाराज झाले होते. पण ही नाराजगी जास्त दिवस राहिली नाही कारण ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आला होता. त्यादिवशी मला भेटायला म्हणून तो माझ्या कॉलेज मध्ये आला होता. 

"हाय प्रणिता कशी आहेस...?"

खरतर अचानक अमितला समोर पाहून मी लाजेने लालेलाल झाले होते. मला काही बोलावं ते कळलंच नाही. मी मानेनेच इशारा केला. माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यानेही ओळखले होते. माझ्याकडे तीव्र कटाक्ष टाकत तो बोलला 

"अग बोलायचं आहे तुझ्याशी..."

"हो बोल ना" मला काहीच माहीत नाही या अविर्भावात मीही म्हणाले.

त्यावर तो म्हणाला "कशी आहेस..?"

मी परत मानेने इशारा करत हो बोलले.


अरे वेड्या माझंही तुझ्यावर प्रेम आहे रे तू एकदा बोल तरी हे शब्द माझ्या हृदयाची स्पंदने तोडत ओठांवर धडका देत होते. पण तो वेडा नुसताच जमिनीकडे पहात होता. किमान माझ्या नजरेत तरी बघावं ना त्याने पण नाहीच. तो फक्त कॉलेज कसं चाललं आहे, घरचे बरे आहेत ना असलं काहीतरी बोलत होता. माझ्याशी बोलताना तो इतका घाबरला होता की तो बोलूच शकला नाही की मला तू आवडतेस... पण त्याची चलबिचल मला आवडत होती. मी पण काहीच बोलले नाही. तो काहीतरी बोलेल हे ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते पण तो जसा आला तसा निघूनही गेला जे बोलायचं होतं ते बोलला मात्र नाही.


      बरेच दिवस गेले मी आता वाट पाहून थकले होते. न रहाऊन मी त्याच्या नावे एक चिठ्ठी लिहिली. त्यात मनातलं सर्व लिहिलं होतं. त्याच्या एका मित्राच्या हस्ते मी ती चिट्ठी दिली खरी पण ती चिट्ठी त्याच्यापर्यंत पोहचलीच नाही. याउलट दुसऱ्याच कुठल्यातरी मुलाशी माझं नाव जोडल्या गेलं आणि आमचं काहीतरी चालू आहे हे अख्या कॉलेज ला कळालं. मी खूप अस्वस्थ झाले होते. सर्वांच्याच नजरा बदलल्या सारख्या दिसत होत्या. घरी कळालं तर... शिक्षणही बंद होईल... या सर्वांची खूप भीती वाटत होती. कसतरी स्वतःला सावरून मी नव्याने मार्गस्थ झाले. तो, त्याच्याबद्दलचे विचार, त्या अफवा सर्व विसरून पुढे चालायचं हे ठरवून मी पुढे चालू लागले यात कॉलेज कधी संपलं कळलंच नाही. त्यानेही मला विचारण्याची कधी हिम्मत केली नाही. प्रश्न तर खूप पडले उत्तरं मात्र भेटली नाहीत. आता माझं लग्न पण झाले आहे ते सोनेरी दिवस कधीच मागे सुटले होते. हो पण त्याची आठवण असायची मनात. मला त्याचा हात हाती घेऊन त्याला सांगायचं होतं की मी खूप प्रेम करतेय रे तुझ्यावर पण हे स्वप्न स्वप्नच राहिलं होतं. आणि आता इतक्या वर्षांनी याला माझी आठवण आली का..? का केलाय याने मला मेसेज..? माझा संसार चांगला चालू आहे माझ्या या दुनियेत मी रमलेली असताना त्याचं येणं गरजेचं आहे का..? परत प्रश्न या प्रश्नांची तरी उत्तरं सापडणार आहेत का..?


     डोकं खूप जड झालं होतं म्हणून मी उठून खिडकीत गेले तोच त्याचा आणखी एक मेसेज आला. माझा नंबर मागत होता तो. मी ही जास्त विचार न करता त्याला माझा नंबर दिला. थोडया वेळातच माझा मोबाईल वाजला. अंदाजाप्रमाणे त्याचाच कॉल होता. मी हॅलो केलं आणि पलीकडून तो बोलू लागला. म्हणत होता भेटायचं आहे तुला.. पण मी स्पष्टपणे त्याला नकार देऊन मोकळी झाले. मला त्याला भेटायची इच्छा नव्हती असं अजिबात नाही पण का कोणास ठाऊक मला त्या क्षणी जे वाटलं ते मी केलं. खरंतर माझं ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी होती मला पण आता खूप उशीर झाला होता. मी त्याला भेटायला नाही म्हणाले कारण माझं पहिलं प्रेम मला कायम आठवणीत ठेवायचं होतं. त्या प्रेमाला मनाच्या कुपीत दडवून ठेवायचं होतं. आणि तसंही आयुष्यात एवढ्या पुढे आल्यानंतर मागे वळून नकोच बघायला. 


     आयुष्यभर स्मरणात राहतं ते प्रेम आणि आयुष्याशी जोडला जातो तो संसार... आणि पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं ते शेवटचं कधीच नसतं हो ना... आणि संसारात राहूनही प्रेम करता येतंच की.... मान्य आहे मला की मी त्याला भेटायला हवं होतं... त्याच्याशी बोलायला हवं होतं.. पण त्या क्षणी मला जे वाटलं तेच मी केलं.... त्यावेळी तो बोलला नाही आणि यावेळी मला बोलायचं नव्हतं किंबहुना मला बोलायचंच नाही. आणि हाच अबोला आमच्या प्रेमामधील भिंत आहे.... ती भिंत न तोडलेलीच बरी..... अबोल राहिलेलंच चांगलं.... पण तरीही मला हुंदका आवरत नव्हता... घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि आठवणी मला मागे खेचत होत्या.... का कोणास ठाऊक ती भिंत ढासळत चालली आहे का असं वाटतंय... तरीही मला माझ्या मतावर ठाम रहायचं आहे हवं तर त्या भिंतीच्या अलीकडे मी आणखी एक भिंत बांधेल...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama