आईच्या डोळ्यातील भाव..
आईच्या डोळ्यातील भाव..
साधारण तिसरी-चौथीला असेल मी, तेंव्हाची ही गोष्ट. गोष्ट म्हंटली तर ही मी नेहमी लिहितो म्हणजे प्रेमकथा वगैरे अजिबात नाही. ही गोष्ट आहे माझ्या आईची. जेंव्हा पहिल्यांदाच मी तिला हताश झालेली पहिली होती. तिच्या नजरेत दाटून आलेल्या त्या हतबल पणाला मी अजूनही नाही विसरू शकलो.
आम्ही पुण्याला धनकवडीमध्ये रहायला होतो. वडिलांची सर्व्हिसची नोकरी होती खरी पण त्या तुटपुंज्या पगारावर घर चालवणं कठीण होतं. त्यात आम्ही दोघे भाऊ नामांकित शाळेत शिक्षण घेत होतो. शिक्षण चांगले मिळावे हा आईचा अट्टाहास असायचा. मग त्या शाळेच्या गणवेशा पासून तेथील फी पर्यंत सर्वच थोडं हाय फाय होतं. मग आई सुद्धा काही ठिकाणी स्वयंपाकाची कामं करायची. त्यात होऊन जायचं सर्व.
तर झालं असं की दिवाळीचा सण तोंडावर आला होता. दिवाळी म्हंटली की नवीन कपडे आलेच. तसे तर आम्हाला आमचे चुलते कपडे शिवून द्यायचे. चुलते टेलर काम करायचे मग वडील कापड आणून द्यायचे. तेंव्हा सिलाईचे पैसे वाचत होते. पण या वेळी मात्र आम्हाला रेडिमेड कपडे हवे होते. कारण जीन्स घालायची फॅशन आम्हाला कळू लागली होती. खूप हट्ट केल्यावर रेडिमेड कपडे घेऊयात असं आई म्हंटली खरी पण प्रॉब्लेम होता तो पैशाचा. आम्ही दोघेही भाऊ लहान होतो त्यामुळे पैशाचा व्यवहार आम्हाला तरी कळणं कठीणच. लहान वयातील अल्लड बुद्धी असणारे आम्ही जिन्स घालायला मिळणार याच आनंदात होतो.
आमच्या आनंदासाठी आईनेही कपडे घ्यायचे असं ठरवलेलं होतं. पण तिला ती ज्या ठिकाणी स्वयंपाकाचं काम करत होती तिथे पैसे मिळालेच नाही. या उलट त्यांनी सांगितलं की अमुक तमुक दुक
ानात जा आणि माझं नाव सांगून उधारीवर कपडे घ्या. माझी आई साधी नक्कीच होती पण भोळी नव्हती. तरीही म्हणतात ना आशा खूप वाईट असते. त्याच आशेपोटी ती आम्हाला घेऊन त्या दुकानात गेली होती. एवढ्या मोठ्या कपड्यांच्या दुकानात मी तर पहिल्यांदाच गेलो होतो. हाय स्टँडर्ड लोक तिथे कपडे घेत होते. थोडंस बिचकतच माझी आई दुकान मालकाला म्हणाली अमुक तमुक बाईंनी तुमच्याकडे पाठवलं आहे आम्हाला उधारीवर कपडे घ्यायचे आहेत. पण दुकानदाराने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्या नंतर आईने खूप विनवण्या केल्या होत्या पण काहीही करून तो दुकान मालक कपडे देण्यास तयार नव्हता. त्यावेळीचा आईचा तो केविलवाणा चेहरा मला आजही आठवतो. एवढ्या विनवण्या ती फक्त आमच्यासाठी करत होती. त्या लहान वयात आम्हालाही आईच्या हताशतेची जाणीव झाली होती. म्हणून आम्ही दोघांनीही जास्त हट्ट नाही केला. तो प्रसंग, माझ्या आईचा तो केविलवाणा चेहरा, डोळ्यात उन्मळून आलेली वेदना सर्वच्या सर्व मला आजही आठवलं की खूप कसंतरी होतं. कुणाही समोर झुकू नका अशी शिकवण देणारी आमची आई तेंव्हा आमच्यासाठी विनवण्या करत होती पण शेवटी आईच ती.
थोडी वाट पहावी लागली पण नंतर आम्हाला जीन्स मिळाली होती बरं का. नंतर बऱ्याच घटना घडल्या आयुष्यात पण तो प्रसंग कधीच न विसरता येईल असाच ठरला. आजही आम्ही काही गडगंज श्रीमंत आहोत असं काही नाही. पण त्या दुकानात जाऊन आम्ही आम्हाला हवी तशी कपडे खरेदी करू शकतो हे मात्र नक्की. आईची वेगवेळी रुपं अशीच घडतच असतात. मी जेव्हा एखादी कविता लिहितो आणि ती कुठल्याश्या वृत्तपत्रा मध्ये प्रकाशित होते. किंवा एखाद्या काव्यस्पर्धेत मला पारितोषिक मिळतं तेंव्हा आईच्या डोळ्यातील भाव किती समाधान देऊन जातो हे शब्दात सांगणं केवळ कठीण.