Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Nilesh Jadhav

Others


2  

Nilesh Jadhav

Others


गाव

गाव

3 mins 133 3 mins 133

गाव.... हा शब्दच मला वाटतं प्रत्येकाच्या मनात किती तरी जवळचा आहे नाही का..? तसं माझं लहान पण पुण्यातच गेलं त्यामुळे गावाबद्दलची आसक्ती खुप होती. मग कधी उन्हाळ्याची सुट्टी लागते आणि कधी गावाला जातो असं व्हायचं. माझ्या मनात माझ्या गावाची एक वेगळीच प्रतिमा अगदी पहिल्या पासून आहे. पुण्याच्या नैऋत्य दिशेला तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या अती दुर्गम भागात वेल्हे तालुक्यात आहे. असो हे सगळं सांगत बसलो तर वाचणाऱ्यालाही कंटाळा येईल . गावच्या खुप आठवणी आहेत उनाड बालपणाच्या. उन्हाळ्यात दिवसभर आंब्याच्या झाडावर सुरपारंब्या खेळण्यापासून संध्याकाळी अंधार होई पर्यंत अट्यापट्या खेळायची मजाच काही वेगळी होती. कैऱ्या, करवंद, झांभळं गोळा करण्यात दिवस भुर्रकन निघून जायचे. म्हशी माग नदीवर गेल्यावर तासंतास पाण्यात पोहत राहायचो. पण हे सगळं उन्हाळ्यातच अनुभवायला मिळायचं. आणि मग 7 वी नंतर

काही कारणास्तव मी मामाच्या गावी शिकायला गेलो. आणि मग खऱ्या अर्थाने अनुभवला मनाच्या तळ घरात नेहमीच असणारा पाऊस. खरच पाऊस अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या रांगेत कुठेही जा तो चेहऱ्यावरुन ओघळताना मनात कधी उतरतो तेच कळत नाही.


मामाच गाव सिंहगडच्या पायथ्याला आहे . शहरातल्या शिस्तबद्ध शाळेतून मी गावाकडे शाळेत आलो आणि गावकडचाच झालो . वर्गाच्या खिडकीतून दूरवर डोंगर रानात कोसळणारा पाऊस पाहत बसायचो. मित्रांबरोबर धमाल करायचो. ओढ्याला आलेल्या पुरात बिनदिक्कत पणे उड्या मारताना आम्हाला कधीच काही वाटलं नाही. चिंचा, आवळे आणायला रानात हिंडत राहायचो. गोट्या खेळतानाची रंगत तर काही ओरच... विठी दांडू, लगोऱ्या या ही खेळात चुरस असायची. माझं गाव आणि मामाच गाव हे डोंगराच्या अड्याल-पड्याल आहे. सुट्टी असली की मी एकटाच त्या अंगावर येणाऱ्या डोंगरातून चालत माझ्या गावी जायचो. खरं तर दोन्ही गावात वाढलेल्या मला कळायचंच नाही की आता दोन्ही गावात चांगल गाव कसं ठरवावं. पण दोन्ही कडचे बालमित्र अगदी मनात आहे असेच आहेत. दोन्ही गावात बरीचशी ठिकाण अशी आहेत जिथं मी एकटाच बसून एखादं चित्र काढायचो, कविता लिहायचो, कधी कधी स्वतःशीच बोलायचो.


      उन्हाळ्यात रात्री अंगणात झोपायचो या वेळी रातकिड्यांचा आवाज , एखाद्या पाखरांच्या पंखांची फडफड, पाचोळ्यातून एखादा सरडा सारकल्यावर होणारी सळसळ सगळं कसं वेगळंच असायचं. लगीन सराईत लग्नाची गडबड सनईचे आवाज खरच त्या लहानवयात मोठेपणाची स्वप्न दाखवून जायची. अहो एक रुपयाला मिळणारे गारेगार सुध्दा किती मागे राहून पंधरा रुपयाचं आईस्क्रीम झालं कळलंच नाही. गाव आणि गावाकडंची मजा हे सगळं सांगायला शब्दच अपुरे आहेत. 


      मी जेव्हा आत्ताच्या लहान मुलांकडे पहातो तेंव्हा स्वतःला मी खरच खुप भाग्यवान समजतो. आत्ताच लहान पण मोबाईल , गाडी अशा कित्तेक आधुनिक गोष्टीत हरवुन गेलय आमच्या वेळी लपाछपीच्या खेळातील राज्य तीन तीन दिवस चालायचं. त्या मानाने ह्यांच बालपण शोधणं खुपच कठीण आहे. शेतभातात आम्ही अनवाणी फिरायचो याना ब्रँडेड चप्पल असूनही घर सोडवत नाही. शेवटी दुर्दैवच नाही का ..? खुप वाटतं या शहरातील माझ्या घरात सुखाने राहावं पण नकळत मन ओढलं जातं गावातल्या त्या कौलारू घराकडे. पावसाळ्यात कौलांवर पडणाऱ्या टिपूर थेंबाचा आवाज घेता घेता अंथरुणात शिरणं, माळ्यावर असणाऱ्या आंब्यांच्या अढीचा वास घरभर दरवळणं, दारातून लांब डोंगराच्या कुशीतून पडणारा पांढरा शुभ्र कडा पाहणं, वळचणीत मनसोक्त भिजणं, हिवाळ्यात धुक्यात हरवलेला तोच डोंगर शोधणं, तर उन्हाळ्यात अंगणात 

उभं राहून चांदण्याचा एक कवडसा वेचण हे सर्व तर गावातच असतं. गावाकडची प्रत्येक सराई नवं काहीतरी घेऊन येते. माणसं बदलली पण त्या वाटा, पाणवठे, ती राने ह्या गोष्टी जशाच्या तशा आहेत. 


   आजही मन वेडं करतात त्या आठवणी ती नदी, पोहणं, हुंदडणं, कैऱ्या पाडणं, ते खेळ बरच काही. त्या गावाच्या खुळे पणावर अजूनही समोरचे राजगड-तोरणा हसताना दिसतात. अगदी याचं आठवणी मामाच्या गावातीलही आहेतच की... इथे फक्त नदीच्या जागेवर ओढा होता. आणि राजगड-तोरणा च्या जागेवर सिंहगड हसताना दिसतो.


     वासराला घरात ठेऊन रानात सोडलेल्या गाईचा हंबरडा मी एकलाय. पारडू दिसलं नाही की लुकलूकणाऱ्या म्हशीच्या डोळ्यात मी पाहिलंय, पाखरांचा किलकीलाट एकलाय, आंब्याच्या सावलीत झोपलोय, नदीच्या डोहात पोहलोय, एकदा झाडावरूनही पडलोय, मधमाशीच्या पोळ्यातून मध काढलंय, लोकांच्या गप्पांवर हसलोय, गावावर प्रेम करतच मोठा झालोय, इथेच हुंदडलोय, धरपडलोय, प्रेमात पडलोय कविताही केल्या. म्हणूनच म्हणतोय 

माझ्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचं पान..... ते तर माझं गाव छान.. 


    पण अलीकडे हेच गाव राजकारणाच्या दलदलीत, मोबाईल इंटरनेट, आशा कितीतरी आधुनिक तंत्रज्ञानात अडकून पडलंय... पूर्वी सारखं धुकं तर नाही पडत आता पण का कोणास ठाऊक गाव हरवल्या सारखं वाटतंय...


Rate this content
Log in