Nilesh Jadhav

Drama

3.4  

Nilesh Jadhav

Drama

निर्णय

निर्णय

4 mins
228


बऱ्याच दिवसांनी मी मावशीकडे आलो होतो. थोडावेळ बसलोच होतो तितक्यात मावशीच्या शेजारी रहाणारी वैष्णवी काहीतरी घ्यायला मावशीकडे आली. तिचं लग्न झाल्यानंतर खूप वर्षांनी मी तिला बघत होतो. तशी आमची जास्त ओळख होती अशातला भाग नाही क्वचित कधीतरी आमचं बोलणं व्हायचं इतकंच. 


       वैष्णवी.. काहीतरी नक्कीच विशेष होतं या मुलीमध्ये. तिच्याकडे पहिलं ना की वाटायचं की असं बिनधास्त होऊन जगता यायला हवं. ती वाया गेलीये असं काही नव्हतं फक्त तिचा स्वभाव मनमोकळा होता. तिच्याकडे पहिलं की वाटायचं हिला कशाचीच फिकीर नसावी बहुदा. दिसायला म्हणाल तर एवढी खास नव्हती पण कमालीची आकर्षित करणारी होती. माझ्याकडे तिच्याबद्दल कुठल्या प्रकारचं आकर्षण हे सांगणं तसं कठीणच आहे. म्हणजे प्रेम वगैरे त्यातला भाग अजिबात नाही बरं का. काही माणसं असतात अशी ती त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या स्वभावाने लोकांना अगदी सहज आकर्षित करून घेतात. जसा की मी... माझ्याही बाबतीत बरेच जण हेच बोलतात. (स्वतःच कौतुक स्वतःच करावं कधी तरी) असो तर अशी ही वैष्णवी होती. हिच्यातली आणखी एक गोष्ट म्हणजे ही माझी खूप मोठी फॅन होती माझ्या कविता तिला खूप आवडायच्या असं मावशी एकदा मला सांगत होती. त्याचं झालं असं होतं की मावशीच्या ओळखीच्या कुठल्यातरी मॅडम ने माझ्या कविता मागवून घेतल्या होत्या प्रकाशित करू वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्याचं पुढं काय झालं मी कधी मावशीला विचारलंच नाही पण माझी ती कवितेची वही मावशीकडेच राहिली होती. माझ्या आयुष्याला कलाटणी देईल अशी एक घटना घडली आणि मी कविता वगैरे सर्व सोडून दिलं होतं. मग ती वही परत मागून घ्यावी असं मला कधी वाटलंच नव्हतं. याच वहीतल्या कविता वैष्णवीने वाचल्या होत्या. आणि विशेष म्हणजे माझीच एक कविता तिने तिच्या कॉलेज मध्ये होणाऱ्या कविसंमेलनात वाचली होती. कधीतरी मावशीकडे जाणं व्हायचं तेंव्हाच हे सर्व कळायचं. 


      वैष्णवीचं कुठल्या तरी मुलाबरोबर अफेयर चालू आहे ही गोष्ट देखील मला मावशीकडून कळाली होती. ही आधीच इतकी बिनधास्त मुलगी होती मग प्रेम प्रकरण असेल हे काही नवीन नव्हतं. हे असं असलं तरी तिच्या घरच्यांना तिचं हे प्रेम मान्य नव्हतं. बरेच संघर्ष करूनही घरचे नाही या शब्दावर अडून बसले होते. आणि एक दिवस कळालं की वैष्णवी त्या मुलासोबत पळून गेली आहे. खरंतर ही बातमी मलाही थोडीसी धक्का देणारी होती. खरंतर हे असं पळून जाणं म्हणजे माझ्या न आवडीची गोष्ट होती पण नंतर विचार केला की घरचे मान्य करत नव्हते तर कदाचित तिचा हा निर्णय योग्यही असू शकतो. त्यानंतर बराच काळ गेला आणि अचानक याहून मोठा धक्का देणारी बातमी कानावर येऊन धडकली. वयक्तिक वैमानुष्यातून वैष्णवीच्या नवऱ्याचा खून झाला होता. आताशा कुठं त्यांच्या संसाराला रंग भरला होता. तिच्या घरचे सुद्धा खुश होते आणि तिला एक वर्षाचा छान मुलगा देखील होता. ती बातमी एकूण खूप वाईट वाटलं होतं मला त्यावेळी. पण म्हणतात ना नशिबाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. 


      वैष्णवी आली तेंव्हा तिच्याबरोबर एक साधारण तीन वर्षाचा मुलगा होता. हा तिचाच मुलगा आहे हे ओळखायला मला फारसा वेळ लागला नाही. येताना तिने मला पाहून छोटीशी स्माईल दिली होती इतकंच मग मी पण काहीच बोललो नाही. माझं लक्ष टीव्ही पाहण्यात होतं इतक्यात वैष्णवीचा आवाज कानावर धडकला

"कधी आलास रे निलेश दादा..?" 

"मगाशीच आलोय" थोडंस उसनं हसू चेहऱ्यावर आणत मी बोललो. खरंतर क्षणभर मला वाटलं होतं की कदाचित ही बोलणारच नाही आपल्याशी. 

"बाकी काय म्हणतोस मग..?" ती बोलली

"काही नाही सर्व मजेत तू कशी आहेस...?" मी बोललो..

"कशी दिसतेय..?" तिच्या या उलटच्या प्रश्नावर मला क्षणभर काय बोलावं कळलंच नाही. 

"हा तुझाच मुलगा का.?" मी विचारलं

ती हो म्हणाली इतक्यात तिला तिच्या आईने आवाज दिला म्हणून ती निघून गेली. मी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिलो होतो.


     ती गेल्यानंतर मला मावशी सांगत होती. की तशी ती खूप जिद्दी आहे. मुलाला सासुकडे ठेऊन जॉब करते. बाकी कोणाची नाही पण स्वतःच्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे तिला. मावशी सांगत होती आणि मी ऐकत होतो. थोड्यावेळाने मी मावशीच्या इथून घरी येण्यासाठी निघालो तेंव्हा माझ्या डोक्यात फक्त वैष्णवीचे विचार थैमान घालत होते. माझ्या विचार करण्याच्या सवयीप्रमाणे कित्येक प्रश्न माझ्या डोक्यातून जणू काही उड्याच मारत होते. ते म्हणतात ना की एखादा घेतलेला निर्णय चुकला ना की आयुष्य चुकत जातं. तसाच काहीसा त्या मुलासोबत लग्न करण्याचा वैष्णवीचा निर्णय चुकला होता का...? कदाचित घरचे तिला म्हणत असतीलही दुसरं लग्न कर यावर ती काय निर्णय घेईल.? मग ती आई वडिलांचं ऐकेल की सासू-सासऱ्यांचं ऐकेल.? तिचं लग्न करण्याबाबत मला तरी काही माहीत नाही. पण ऐन वयाच्या पंचविशी मध्ये असं अचानक आलेलं वैधत्व घेऊन ती जगू शकेल का..? अजून खूप दिवस जायचे आहेत काय असेल तिचा पुढील निर्णय.?


    एकंदरीत काय तर योग्य निर्णय घेणं कधीही महत्वाचं. आपण एखादी गोष्ट करूयात हा निश्चय असतो आणि आपण ती गोष्ट करणारच आहोत हा निर्णय. पण घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे पुढे पश्चाताप होऊ नये इतकंच. त्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णयामुळे वैष्णवीला कदाचित पश्चाताप झाला नसेलही कारण तो निर्णय तिने विचारपूर्वकच घेतला असावा. आणि म्हणूनच ती मला काल होती अगदी तशीच आजही भासली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama