एक पत्र आलंय...
एक पत्र आलंय...
प्रिय...
तसं पाहिलं तर मी आपला साधा कवीच आहे... म्हणजे एवढं काय भारी लिहीतो असं अजिबात नाही. माझे शब्द एकदम साधे सरळ आहेत. हो पण तसं जरी असलं तरी त्यात भावना मात्र अगदी कुटून कुटून भरलेल्या आहेत. तू माझी होणार नाहीस याची जाणीव असूनही तुझ्यावर प्रेम करण्याची आस सतत लागून असते. तुझं प्रेम मला लिहिण्यासाठी बळ देतं. आणि बऱ्याचदा हतबल ही करतं. पण तेवढंच ते संयमी आहे.
खरं सांगू मला कधीच कोणावर अधिकार गाजवता आला नाही. खरंतर गाजवताच येत नाही असं म्हणणं वावगं ठरेल. वाटत जरी नसलो तरी मी खूप इमोशनल आहे. मला लवकर रडू येतं. या वाक्यावर तू थोडीशी हसशीलही पण एक मात्र नक्की तू सुद्धा अगदी अशीच आहेस हे माहितेय मला. तितकं तर ओळखलंच आहे मी तुला... हा मोबाईल म्हणजे आपल्या दोघांमधला दुवा आहे. हाच तर आपल्याला रोज न चुकता भेटवतो. तसं समोरासमोर आपण
भेटलोय हे खरंय... पण एक भेट अशी सुद्धा हवी आहे त्यात तू हक्काने फक्त माझी असशील.. निदान त्या क्षणापूरती तरी नक्कीच. तुझ्या हळुवार मिठीत अलगद शिरताना तुझ्या खांद्यावर डोकं ठेऊन मन मोकळं होई पर्यंत बोलायचं आहे. कधी कधी खूप अधीर असतो मी तुझ्याशी बोलायला. तुझा मेसेज येतो आणि मग मी निश्चिंत होतो. तू माझी आहेस म्हणून....
तुला भेटणं हे माझं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न उराशी कवटाळून मरायचं नाही मला. या स्वप्नासारखंच तुलाही डोळ्यात साठवायचं आहे. तो क्षण जगायचा आहे तुझ्या सोबतीने... फक्त एकदा... एकदाच येऊन भेट मला... किती वेडा आहे ना मी..? पण मला सांग तुझी अवस्था यापेक्षा वेगळी आहे का..?
तुझाच