भुताटकी - भाग 2
भुताटकी - भाग 2


माझं शिक्षण पूर्ण होऊन मी जॉब करू लागलो होतो. त्या वेळी मी मामाच्या गावीच रहायचो. मामाचं गाव म्हणजे सिंहगडच्या बॅकसाईडला म्हणजे पुणे पानशेत रोड वरून खानापूर गावातून वेल्हे(राजगड) तालुक्यात एक रस्ता जातो त्याच रस्त्यावर मामाचं गाव आहे. माझं गाव तिकडेच वेल्हे तालुक्यात आहे. असो तर मी मामाच्या गावाला राहूनच शिक्षण घेतलं आणि जॉब सुद्धा तिथूनच येऊन जाऊन करू लागलो होतो. त्या वेळी आम्ही सर्व तरुण मुलं मराठी शाळेच्या वरांड्यात झोपायला जायचो. मस्त गप्पा गोष्टी करत धिंगाणा घालत असायचो. खूप मज्जा करायचो आम्ही.
मराठी शाळा ही गावातून थोडी वरच्या बाजूला होती. त्या वेळी शाळेच्या आजूबाजूला तुरळक दोन तीन घरं होती. लाईटच्या खांबावरची लाईट कधी असायची तर कधी नसायची शेवटी गावच ते. एकदा का गाव झोपून गेला की शाळेच्या आवारात फक्त आणि फक्त अंधारच असायचा. आणि पावसाळ्यातील अंधार तर बोलायलाच नको. मुख्य रस्ता पलटी केला की थोडी भातखाचरे सोडली तर डोंगरच चालू व्हायचा शाळेच्या समोरून लांबवर शेतीच होती. उन्हाळ्यात काही वाटत नसायचं पण पावसाळ्यात शेताच्या फाड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज चालूच असायचा. त्यात रातकिड्यांचा आवाज त्याला सोबत करायचा. त्यामुळे वातावरण थोडं भयावह व्हायचं. पण शाळेच्या वरांड्यात झोपण्याची मजा मात्र काही वेगळीच होती.
एवढं सगळं असलं तरी शाळेच्या बाबतीत बऱ्याच दंतकथा प्रचलित होत्या. गावातील लोकं सांगायचीत की शाळेच्या आवारात भूत आहे. रात्रीचं शाळेच्या अंगणात भूत फिरत असतं. आणि कोण्या एका इसमाला भुताने वरांड्यातून पाय धरून खाली फेकलं होतं वगैरे वगैरे गोष्टी ऐकायला मिळायच्या. पण प्रत्येक्षात असा अनुभव आलेले कोणी होतं असं नाही. आमच्यातले बरेच जण या गोष्टीवर विश्वास ठेवायचे. मला मात्र या सर्वाचीच खूप गम्मत वाटायची. आम्ही तरुण मुलंच शेवटी. आम्हाला प्रत्येकाला आमची प्रायव्हसी हवी असायची. कोणी प्रेम वेडा होता तर कोणी काय हे असले किस्से तर असायचेच. आणि त्या तरुण वयात तेवढं तर चालणारच ना. म्हणून शाळेच्या वरांड्यात झोपण्याचा अट्टाहास असायचा.
साधारण आषाढ महिना चालू होता. पुण्याच्या घाटमाथ्यावर कोसळणारा पाऊस त्यात तो आषाढ महिन्यातील म्हणजे केवळ अवर्णनीयच. त्या दिवशी सुद्धा धो-धो पाऊस चालू होता. भातलावणी एव्हाना कधीच होऊन गेली होती. फाडयावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज चालूच होता. लाईट तर काय पावसाळ्यात नसायचीच बऱ्याचदा. त्या दिवशी सुद्धा पोलावरची लाईट नव्हती. नेहमी प्रमाणेच आम्ही सर्व मस्त गप्पा मारत मारत झोपलेलो होतो. साधारण अकरा वाजेपर्यंत सर्वच जण गाढ झोपेत हरवून जायचे. पाऊस म्हणजे आपल्या आवडीचा विषय मला तर कौलावर पडणाऱ्या पावसाच्या टिपूर थेंबांचा आवाज विलक्षण आवडतो. तो आवाज घेता घेता झोपून जाणं म्हणजे आनंददायी क्षण असायचा माझ्यासाठी. मुख्य मुद्दा बाजूलाच राहिला नाही का..? हे म्हणजे हॉरर कथेतून एकदम रोमँटिक कथेत आल्यासारखं झालं. हो तर त्या दिवशी पण असाच मुसळधार पाऊस होता. आम्ही सर्व गाढ झोपेत असताना एक जण लघुशंके साठी उठून रस्त्यावर गेला. तिथूनच तो धावत धापा टाकत आम्हाला उठवायला आला. सर्व जण गडबडीने जागे झाले. काय झालं हे कोणालाच कळत नव्हत
ं. समोर काळवटीच्या बाजूला बोट दाखवत तो फक्त म्हणत होता की तिथे कोणीतरी आहे. आम्ही सर्वच जण उठून मैदानात आलो समोर बघितलं तर खरंच एक पांढरी आकृती खडविकडून खाली काळवटीच्या बाजूला भुईमुगाच्या शेतात उतरताना दिसत होती. भर पावसात त्या थंड हवेच्या झोतातही आम्हाला दरदरून घाम फुटला होता. कोणी म्हणत होतं कोणीतरी माणूस आहे. तर कोणी म्हणत होतं एखादा प्राणी असेल.
आता काय करायचं असा विचार करत असताना आमच्यातला सर्वात मोठा मुलगा म्हणाला चला जवळ जाऊन बघू कोणी चोर वगैरे असेल. पण भर पावसाळ्यात कंबरे एवढ्या गवतातून तेही इतका चिखल असताना तो माणूस रस्ता सोडून तिकडून का येत असावा आणि चोर म्हणावं तर तो एकटा कसा..? असा विचार मनात आला आणि तितक्यात एक जण म्हणाला मला तर ते काहीतरी वेगळं आहे असं वाटतंय. झालं या वर घड्याळात तर दोन वाजत आले होते पण आमच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजले. बाकीचे जे उठले नव्हते त्यांना तसच ठेऊन आम्ही पाच-सहा जण थोडीसी हिम्मत करून काळवटीच्या दिशेने चालू लागलो. एखादा प्राणी असता तर त्याने दिशा बदलली असती पण ही समोरून येणारी आकृती सरळ येताना दिसत होती. अंधारात ती आकृती फक्त पांढरी दिसत होती. काळ्याकुट्ट अंधारात कसल्याही प्रकाशाची सोबत नसताना एवढ्या चिखल पाण्यातून गवतातून ती आकृती कशी काय चालत आहे हेच मुळात कळत नव्हतं. माझं म्हणाल तर मी मात्र खूप घाबरलेलो होतो. तो अनुभवच खूप वेगळा होता. आम्ही सरळ रस्त्याने पुढे गेलो असता ती आकृती थांबल्या सारखी वाटली. आता मात्र उलट झालं होतं आम्ही त्या आकृतीच्या दिशेने चालत होतो आणि ती आकृती अगदी आली तशीच मागे सरकत होती. आम्ही रस्ता सोडून काळवटीत जणाऱ्या पांदनीपाशी पोहचलो तितक्यात तोच आमच्यातला सर्वात मोठा मुलगा होता तो म्हणाला थांबा नको जायला. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. कारण ती आकृती जशी आली तशीच मागे जात होती. आणि आम्ही तिच्याकडे सरकत होतो. क्षणभर आम्ही एकमेकांकडे पाहून इशारा केला आणि माघारी फिरलो. आता मात्र सर्वच जण घाबरलेल्या अवस्थेत होतो. कशीतरी उरली सुरलेली ती रात्र आम्ही ढकलली.
असाच माझा एकट्याचा अनुभव सुद्धा होता पण मी कानाडोळा केला होता. तो सिजन होता उन्हाळ्याचा टेलिव्हिजनवर आय पी एल मॅचेस चालू होत्या सर्वजण क्रिकेट बघत बसले होते मी मात्र एकटाच लवकर येऊन झोपलो होतो. सोबत कोणी नव्हतं म्हणून लवकर झोपही लागली साधारण साडेदहा च्या सुमारास माझ्या अंगावरची गोधडी कोणीतरी खेचल्याचा मला भास झाला आणि मी पटकन उठलो. उठून बघतोय तर अंगावरील गोधडी अर्धी वरांड्यातून खाली गेलेली होती. पण भास असेल म्हणून मी काही लक्ष दिलं नव्हतं. आजच्या या रात्रीला मी त्याच प्रसंगाचा जास्त विचार करत होतो.
दुसऱ्या दिवशी आम्ही आमचं अंथरून उचललं आणि सरळ मंदीर घाटलं. परत काय आम्ही शाळेवर झोपायला जायचं नाव काढलं नाही. ती आकृती नक्की काय असेल यावर अजूनही चर्चा होते आमच्यात. पण त्याचा अंदाज लावणं कोणाला जमलं नाही. त्यावेळी मात्र एका वयस्कर माणसाने आम्हाला सांगितलं होतं की काळवटीत जाणाऱ्या पांदीत जे भूत आहे ना तेच शाळेतल्या आवारात फिरत असतं. मग काय अहो परत शाळेच्या व्हरांड्यात ओढून नेलं तरी आमच्यामधील कोणी झोपायला गेलं नाही. आणि मी..! मी तर नाहीच नाही.