Girish S

Classics

2  

Girish S

Classics

भगवद्गीता ८

भगवद्गीता ८

3 mins
80


अर्जुन म्हणाला, ब्रह्म, अध्यात्म, कर्म कसे जाणावे?. अधिभूत, अधिदैव म्हणजे काय? अधियज्ञ म्हणजे काय? या देहात कोण राहतो?. मृत्यू जवळ आला असता योगी तुला जाणतात हे कसे ते मला समजले नाही. 

श्री भगवान म्हणाले जे अविनाशी आहे तेच ब्रह्म व त्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म. सर्व भूतमात्रांना प्राण्यांना त्यांच्या भौतिक वाढीसाठी, प्रगतीसाठी करावे लागणाऱ्या गोष्टींना कर्म म्हणतात. नाशिवंत परिवर्तनशील भौतिक प्रकृती म्हणजेच अधिभूत. जीव हाच अधि दैव, आणि यज्ञ म्हणजे मी पुरुषोत्तम (यज्ञांचा अधिष्ठाता). जो मृत्यु समीप आला असता माझे स्मरण करतो व देहत्याग करतो तो माझ्यात विलीन होतो. हे कौंतेया, अंतकाळी माणसाला ज्याची आठवण होते, त्याचे चित्त ज्या ठिकाणी असते तसे फळ त्याला मिळते. म्हणून तू सर्वकाळ माझे ध्यान ठेवून लढाई कर. मन बुद्धि मला अर्पण करशील तर तू मला प्राप्त करशील. मन विचलित होऊ न देता जो योगाभ्यास करून माझे निरंतर चिंतन करतो तो मला म्हणजेच परमपुरुषाला प्राप्त करतो. अणु पेक्षा सूक्ष्म, सर्वज्ञानी, पुरातन, शासक, सर्वांचा पालक, सूर्य तेजाहुन तेजस्वी अशा त्याचे जो सदैव ध्यान करतो, अंतकाळी जो अविचल मनाने , भक्ति आणि योगबलाने भुवयांच्या मध्ये प्राणाची स्थापना करुन तो भगवंताची प्राप्ती करतो. ज्या परमपदाला (ब्रम्हस्वरूपाला) वेद ज्ञानी अविनाशी म्हणतात, महर्षी सर्व इच्छा त्यागुन त्याच्यात विलीन होतात, त्या ब्रह्म स्वरूपाचे मी तुला वर्णन सांगतो. सर्व गात्रे आवरून हृदयी रोधून, प्राणाची मस्तकी स्थापना करून योग अनुष्ठान करतो, ओंकार उच्चार करुन परमेश्वराचे स्मरण करत जो प्राण त्याग करतो त्या देहाला श्रेष्ठ गती प्राप्त होते. हे पार्था, जो अनन्यभावाने सर्वकाळ माझे स्मरण करतो अशा योगयुक्त भक्तास मी सहज प्राप्त होतो. जे माझ्यात विलीन होतात त्या महात्मा पुरुषांना परमगती प्राप्त होते. अनित्य, दु:खकारक असा पुनर्जन्म मिळत नाही. ब्रह्मलोक‌ तसेच इतर सर्व लोकांमध्ये पुनर्जन्म असतो पण कौंतेया जे मला प्राप्त(माझे धाम प्राप्त करतात) त्यांना पुनर्जन्म नसतो. 

ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक हजार युगांचा असतो व रात्र एक हजार युगांची असते. ब्रह्मदेवाचा दिवस सुरु होतो तेव्हा जीव व्यक्त होतात व रात्री अव्यक्त होतात. अर्जुना, जीव जन्मतो व नाश पावतो. रात्री नष्ट होतो व दिवसा पुन्हा उपजतो. या अव्यक्ता हुन अव्यक्त व शाश्व़त ज्याचा जगाचा नाश झाला तरी नाश होत नाही ते माझे धाम , अव्यक्त व अक्षर अशी ही परमगती, तेथुन परत येणे नाही. अर्जुना, परम श्रेष्ठ असा तो देव असीम भक्तिनेच प्राप्त होतो. तो सर्वव्यापी व सर्व समावेशक आहे. हे अर्जुना, मी आता तुला सांगतो की कोणत्या वेळी मृत्यू आला असता पुनर्जन्मातुन मुक्ती मिळते अथवा पुनर्जन्म मिळतो. उत्तरायणामध्ये, शुक्ल पक्षात, अग्नीच्या प्रभावात, दिवसा प्रकाश असताना ब्रह्म जाणणारे असतात त्यांचा मृत्यू झाला असता ते ब्रह्म पद प्राप्त करतात. दक्षिणायनात रात्री धूसर प्रकाशात, ज्याचा मृत्यू होतो त्याला चंद्रलोक मिळतो व त्याला पुनर्जन्म मिळतो. या जगात दोन गती आहेत त्या म्हणजे शुक्ल आणि कृष्ण. प्रकाशातून जो जातो त्याला पुनर्जन्म नसतो पण अंधाराच्या मार्गाने जातो त्यास पुनर्जन्म असतो. म्हणून अर्जुना, तु योगयुक्त हो. वेदात, यज्ञांत, तपात, किंवा दानातही जो पुण्य ठेवा मिळतो त्याहुनही हे ज्ञान थोर आहे. योग्यास परमस्थान मिळते.

आठवा अध्याय समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics