Anil Kulkarni

Abstract

4.0  

Anil Kulkarni

Abstract

अलक... डॉ.अनिल कुलकर्णी.

अलक... डॉ.अनिल कुलकर्णी.

3 mins
296


लग्न

एकमेकांची फक्त नजरानजर झाली, बाकीचे सोपस्कार प्रेमाने केले.


आनंद

आज्जी येणार म्हणल्यावर कुंडीतली रोपटीही शहारली.


ओळख

अँसिडच्या हल्ल्याने चेहऱ्याची ओळख मिटली, पण व्यक्तिमत्त्वानेच नवी ओळख निर्माण केली.


निराशा

दुष्काळाने सगळे संपले होते,

गारपिटीने उरलेसुरले धुवून नेले.


वाढदिवस 

त्याने विचारले "तुला वाढदिवसाला काय घ्यायचे"?

ती म्हणाली "फक्त चांगले वागा". तुटलेला पतंगाप्रमाणे तो आपटला.


लग्न

आम्ही पत्रिका पाहणार नाही, ब्लड रिपोर्ट पाहणार.

दुसऱ्याच दिवशी ब्लड रिपोर्ट मुळे साखरपुड्यातच लग्न उरकलें.


भक्ष आणि लक्ष

पाल एकटक भक्षाकडे पाहत होती.

खोलीत चार माणसे मोबाईल कडे टक लावून पाहत होती.

पालीला कधी नव्हे ते गहिवरुन आले.


सुखरूप

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह व इन्फेक्शन खूप वाढल्या मुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले,सगळे असहाय्य होते, फक्त ऑक्सिजन ने त्याला पुन्हा माणसात आणलें.


हाल

रामाचा १४ वर्षे वनवास व अस्पृश्यांचे हाल

त्याला १४ दिवसाच्या विलगीकरणात कळून चुकले.


भान

गरीबीत लढता लढता व गरिबांच्या साठी लढता लढता

तो राजकारणात खूप प्रसिद्ध व श्रीमंत कसा झाला, हे त्याला ही कळले नाही.


प्रवास

पाळण्यानंतर लग्ना पर्यंतचा प्रवास शांततेत झाला.

सासरी जातांनाच भयानक अपघात झाला.

डोलीनंतर स्ट्रेचर ते स्मशानभूमी प्रवास स्मशान शांततेत संपला.



पथ्य

कथा अति लघुत्तम कथेला म्हणाली तू एवढी बारीक कशी?

अति लघुत्तम कथा म्हणाली मी शब्दांच पथ्य पाळतें.



सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त तिचा कर्तुत्ववान महिला म्हणून गौरव होणार होता.

पहाटे पाचला उठून मुलांचे डबें तयार करून ईतर सर्व कामे करूनच ती सत्काराला गेली.

आई कुठे काय करते ?असं कुणी म्हणू नये, हाच सत्कार तिला जास्त महत्वाचा होता.


स्वच्छ्ता

रोज ती घर स्वच्छ पुसून चकचकीत करत होती.

पण आजपर्यंत तिला घरच्यांचे जळमटं

साफ करता आली नाहीत की विचार स्वच्छ करता आले नाहीत.


देवघर

"तुझे बाबा ढगात गेलेत नां"?

"हों बाप्पाला करोना झालायं नां, त्यांना बघायला गेलेत"


करोना युग

"बाबा बाहेर जाऊ नका"

"बाहेर पोलीस पकडतील

बाप्पाही तुम्हाला समजावण्यासाठी बोलावून घेईल.


सुख

विलगीकरण संपल्यानंतर प्रथमच तो बंद खोलीतून हॉलमधील सोप्यावर बसला.

मुगाचा शिरा, मुलीची मिठी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून

सुख म्हणजे नक्की काय असतं याची त्याला पुन्हा जाणीव झाली.



निर्माल्य

देवीच्या दर्शनाला गर्दी होती. कुणी फुलं, हार देवीला वाहत होते.

कुणी जाताना भुकेले बसलेल्यांना पैसे टाकीत होते. दोन्ही निर्माल्याच, एक सुकणारं, दुसरं सुखावणारं.

देवात माणूस शोधावा व माणसात देव शोधावा.


अंधश्रध्दा

कावळा १: कोण एक विषाणू आलांय म्हणें.

माणसाचं आता श्रद्धा व श्राद्धाविनाच चाललंय सगळं.

कावळा २: जोपर्यंत अंधश्रद्धा आहे तो पर्यंत पिंडाला व आपल्याला मरण नाही. 

हे ही दिवस जातील...


जमीनदोस्त

अपघातग्रस्त गाडी डोंगराच्या कड्यावरून,

पानांवरून ओघळणाऱ्या दवबिंदू प्रमाणे शेवटी जमीनदोस्त झालीच.

संसार

रोज दोन्ही पाय एकमेकांजवळ निपचित पडून राहायचें

तक्रार न करता संसार केलेल्या जोडप्या प्रमाणे,त्यांना ते नवीन नव्हतें.


बकेट लिस्ट

कोरोना मुळे तिची भिंतीवरची बकेटलिस्ट शोभेची झाली होती. पण कोरोनाच्यामुळे घरच्यांना वेळ देणे, स्वछतेचे पालन करणे, इतरांच्या मदतीला धावून जाणे, नवीन सवयी,जीवनशैली बदलणें ही लिस्टच बकेट लिस्ट झाली होती.


श्रध्दा

ऐकलं कां "कोण एक विषाणू आलांय म्हणें.

माणसाचं आता श्रद्धा व श्राद्धाविनाच चाललंय सगळं.

"अरे जोपर्यंत अंधश्रद्धा आहे तो पर्यंत पिंडाला व आपल्याला मरण नाही."


प्रसंग

ती:लग्नानंतर तूं बदललास,

तो:मी हेच म्हणालो तर,

तो:त्यासाठीच आजचं कॅंण्डल लाईट डिनर,

मेणबत्तीच्या साक्षीने होऊनच जाऊ दें, आपण आपलेंच की बदललेलें.

प्रसंगांची पेरणीच देते आयुष्याला आकार.


वर्दी

संचारबंदीच्या काळात एक फुगे विकणारीला पोलिसांनी हटकले.

फुगेवली म्हणाली"साहेब पोटात काय हवां भरायची का?

पोलिसांनी तिला रोज ५००रू.महिनाभर वर्गणी काढून द्यायचे ठरविले.

बी

एरवी सारखं पत्नीला बी पॉझिटिव्ह म्हणणारा,

आज खरच पत्नी कोरोना बी पॉझिटिव्ह झाल्यावर मनात प्रार्थना करत होता बी निगेटिव्ह.

कालाय तस्मै नमः


अंतर

बस मध्ये एरवी सुंदर तरुणीच्या आसपास जागा शोधणारा तो

आज अंतर ठेवून बसला

Positiveविचार करत positive विषाणूंच्या संसर्गाला अंतर द्यायचं असतं

हे तो जाणून होता.


भेट

"पुन्हा भेटू म्हणून त्याने निरोप घेतला"

पण अदृश्य शक्ती आधी भेटेल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं.

अंतर

बर्याच दिवसांनी समोरून ती दिसली

चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे ओळखू नाही आली

एरवी अंतर न पाळणारा तो बहिणाबाईंच्या शब्दाने सावध झाला

जगणं मरणं दोन श्वासाचं अंतर.


गणित

रेल्वे स्थानकावर भिक मागण्यारीला १०रू.दिल्यावर तिच्यायाकडे शंभर रुपये जमा झाले.

ती खुश झाली.तिचे गणित सुरू झालेअसेल,चहा की वडापाव की जेवण पोटभर.

तिकडे 5 स्टार हॉटेलमध्ये आमदारांच्या संख्याबळाचं गणित सुटलं होतं.खातं कोणतं मिळेल? खायचं की बिनकामाचं.

प्रत्येकाचं गणित वेगळं,उत्तर वेगळं. जेवढा भौतिक गोष्टींचा हव्यांस जास्तं तेवढं गणित अवघड.


युती

"वरवर दोघांची युती होती.

वेगळे नाहीतच असे वाटत होते".

"कधीही साथ सुटेल याची भीती होती".

"शेवटी एकमेकांची साथ सुटली".

"सापाने फक्त कात टाकली होती"


निरोप

निरोप देताना तो मागे वळून पहात नसे.

अश्रू आपले ऐकणार नाहीत हे त्याला पक्के माहीत होते.


नवस व हवस

ते दिल्लीहून नवस फेडण्यासाठी विमानाने शिर्डीला आले.

दानपेटीत त्यांनी सहज दोन लाखांची बंडले टाकली.

बाहेर ताटकळत बसलेल्या भिकाऱ्यांना त्यांनी माफ करनां एवढेच अवघडून म्हटले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract