Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

अशी कशी वेंधळी मी!

अशी कशी वेंधळी मी!

9 mins
891


 

         संजीवने घराचे कुलूप काढले. दरवाजा उघडला. तो आत गेला आणि एक उदास, नैराश्याची लाट सर्व घरभर पसरली असल्याची जाणीव झाली. त्याने घरभर नजर फिरवली. प्रत्येक वस्तू जणू मूक आक्रोश करीत असल्याचे त्याला जाणवले. घरातील प्रत्येक वस्तू निर्जीव असूनही स्वतःचे औदासिन्य लपवू शकत नव्हती. घड्याळाची टिक टिक चालू असली तरीही त्यात दरोजचा जोश, स्फूर्ती नव्हती. चालावे लागते म्हणून ते चालत होते, जणू त्याचे सेल संपत आले होते. संजीवने पंखा लावला तो फिरु तर लागला परंतु त्या फिरण्यात नेहमीचे चैतन्य नव्हते. येणारे वारे गतिमान नव्हते एक प्रकारची मरगळ त्या हवेत होती. संजीवने फ्रीज उघडला. नेहमी येणारा थंडगार झोत बाहेर आला परंतु त्यात तो गारवा, ती शितलता नव्हती. संजीवने चहाच्या साहित्याची जमवाजमव सुरू केली परंतु पटकन काही सापडत नव्हते. सारी तयारी झाली पण लायटर रुसून बसले. समीक्षेच्या एका प्रयत्नात त्या ज्वलनशील वायूला कवेत घेणारा लायटरचा तो स्फोटक बिंदू रुसला होता. वीस-पंचवीस वेळा खट खट असा आवाज केल्यानंतर तो बिंदू बाहेर पडला परंतु त्याला कवेत घ्यायला तडफडणाऱ्या वायूचा संयम संपला होता. लायटरचा तो बिंदू कवेत येताच जो मोठा स्फोट झाला त्यामुळे संजीवचा चेहरा भाजला. कसा तरी चहा उकळून संजीव बाहेर आला. चहाचा एक घोट घेतला आणि त्या चवीने त्याला अक्षरशः मळमळल्यासारखे झाले. त्याने तो कप तसाच बेसीनमध्ये नेऊन उलटला. समीक्षेच्या हातची चव तर सोडा परंतु तिने केलेल्या चहाच्या चवीच्या जवळपास जाईल अशीही ती चव नव्हती. त्याने टीव्हीवर गाण्याची वाहिनी लावली परंतु तिथलेही सूर त्याला भकास, बेसूर भासू लागले. गाण्याने लय हरवली, ताल हरवला असल्याचे त्याला जाणवले. लागलेले गाणे त्याचे आवडीचे होते परंतु तरीही त्याचे मन त्या गाण्यात लागत नव्हते. चरफडत त्याने टीव्ही बंद केला.

त्याने बाजूला पाहिले. तिथे येऊन पडलेले वर्तमानपत्र जणू त्याची वाट पाहात होते. दररोज वर्तमान पत्राची चाहूल लागताच हातातले काम सोडून आधी वर्तमानपत्र उचलणाऱ्या संजीवला त्यादिवशी तिकडे पाहावेसे वाटत नव्हते. काही क्षणात अनिच्छेने त्याने वर्तमानपत्र उचलले. पहिल्या पानावर त्याच्या आवडत्या नेत्याचे भाषण छापून आले होते. एरव्ही त्या नेत्याचे विचार, भाषण अधाशीपणे वाचून काढणाऱ्या संजीवला त्यादिवशी अक्षरशः अक्षर फुटत नव्हते. असे काय झाले होते त्यादिवशी? संजीवचे सर्वस्व, त्याची अर्धांगिनी, त्याची लाडकी बायको त्याला एकट्याला सोडून गेली होती..... माहेरी! समीक्षाला बसमध्ये बसवून संजीव नुकताच घरी परतला होता आणि स्वतःसोबत सारे घर उदासीन झाले असल्याचे त्याला पदोपदी जाणवत होते. तितक्यात त्याला एक भन्नाट विचार सुचला. समीक्षेची गंमत करावी या विचाराने त्याने खिशातला भ्रमणध्वनी काढला आणि समीक्षाचा क्रमांक जुळवला. काही क्षणातच तिकडून आवाज आला,

"कमाल झाली बाई, तुमच्या वागण्याची. अहो, मी अजून बरोबर शहराच्या बाहेर पडले नाही तर लगेच फोन केलाय. अशाने कसे होईल हो?"

"तेच तर मला कळत नाही. अशा वागण्याने तुझे कसे होईल ही चिंता मला सतावते आहे."

"म्हणजे? मी काय केले? नेहमीप्रमाणे काही वेंधळेपणा केला की काय? काही विसरले तर नाही ना? असेच होते माझे, कुठे उल्हासाने जावे म्हटले तर काही ना काही विसरते? अहो, काही विसरले का हो मी?"

"मी काय सांगू? शोधा म्हणजे सापडेल....." खट्याळ आवाजात संजीव म्हणाला.

"अग बाई, पर्स तर नाही विसरले? नक्कीच तसेच असणार. तुम्ही आणून सोडले म्हणून रिक्षेला पैसे देण्यासाठी पर्स काढली नाही. एक-एक मिनिट...आत्ताच कंडक्टर येऊन गेला. त्याला पर्समधूनच पैसे दिले याचा अर्थ पर्स सोबत आणलीय. मग? चष्मा तर विसरले नाही ना?....." असे म्हणत समीक्षाने हात डोळ्यावर नेला पण तिथे चष्मा नव्हता ते समजताच ती म्हणाली,

"मी चष्मा विसरले की काय? पण कंडक्टरने दिलेल्या तिकिटावरील सर्व नोंदी, भाडे तपासून पाहिले. ती तशी बारीक अक्षरे वाचली याचा अर्थ चष्मा डोळ्यावर होता. अहो, मला 'मामा की ऐनक' हा धडा होता त्याप्रमाणे चष्मा डोक्यावर तर नाही ना. थांबा. काय पण मी वेंधळी! अहो, चष्मा चक्क कपाळावर घातला आणि शोधतेय डोळ्यावर! अहो, सांगा ना हो, असे काय हो करता? मी काय विसरून आले हो?"

"विसरून नाही ग...तू चोरून नेलेस......"

"काय मी चोरी केली? शक्यच नाही. भलतेसलते आरोप करु नका. तुम्हाला असे तर म्हणायचे नाही की, तुमचे पैसे चोरून मी माहेरी नेतेय....."

"अग...अग...शांत हो. तसे नाही. तू की नाही.... तु ना माझे काळीज चोरून नेले...."

"इश्श! तुमचे आपले काही तरीच हं. सांगा ना गडे, मी काय विसरले ते."

"आम्ही नाही सांगणार जा......माहेरी!"

"तुम्ही म्हणजे ना. असे तर नाही मी माझे एटीएम घरीच विसरले. मी माहेरी जास्त खर्च करू नये म्हणून तुम्ही तर काढून ठेवले नाही ना?"

"मी तसे कशाला करीन? मला माहिती आहे, तू जास्त खर्च करीत नाहीस ते. उलट भावाला नाही तर वहिनीलाच चुना लावून येतेस तू!"

"माहिती आहे ना, मग सांगा ना, मी काय वेंधळेपणा केला ते?"

"ओळखा पाहू. मी मुळीच नाही सांगणार."

"जाऊ दे बाई! आधीच माझा वेंधळा कारभार त्यात तुम्ही जास्तच वेंधळं करून सोडता? काय बरे, विसरले असेल मी? हां. आले लक्षात. गॅस बंद करायला विसरले का? दूध तापायला ठेवून निघून आले का? पण असे कसे होईल? रात्रीच्या दुधात दोघांचा चहा केला आणि आपण निघालो तेव्हा दुधवाला आलाच नव्हता. मग? मी दाराला कुलूप लावायला विसरले का? तुम्ही नेहमीप्रमाणे गाडी 

काढायला अगोदर बाहेर पडलात आणि कुलूप मी लावणार होते. अहो, खरे सांगा, तुम्ही घरी परत जाईपर्यंत दार उघडे पाहून कुणी आत तर शिरले नाही ना? आलमारी बघितली का? दागिने, पैसा सारे काही व्यवस्थित आहे ना?"

"अग, घरी चोरी झाली असती तर मी तुझ्याशी अशा गप्पा मारत बसलो असतो का?"

"खरेच की हो. कमाल आहे ना, माझ्या वेंधळ्या वागणुकीची. पण मग मी काय विसरले बरे?"

"आठव बरे. तुला तुझ्या स्मरणशक्तीवर खूप विश्वास आहे ना?"

"डोंबल्याचा आलाय विश्वास.अहो,खोटे बोलावे पण रेटून बोलावे असे लहानपणापासून वागते मी."

" म्हणजे लग्नानंतर हे असे खोटारडेपणाचे संस्कार..."

"खड्ड्यात गेले हो संस्कार! डोके नुसते पिकते आहे... काय विसरले असेल या प्रश्नाने पार बुग्गा झालाय डोक्याचा आणि एक तुम्ही आहात काय झाले ते सांगत नाहीत उगाच सस्पेन्स तयार करत आहात. माझ्या ऊरात बघा कसं धडधडतय ते. जीवाचा नुसता धरकाप उडतोय आणि तुम्हाला ..."

"तू जवळ असतीस तर बघितला असता तुझा धडधडणारा ऊर...."

"इथे माझा जीव जातोय आणि तुम्हाला चेष्टा सुचतेय?"

"मला एक सांग, तू मला माहेरी पोहोचल्यावर दररोज किमान...."

"दहा फोन करणार आहे. तुम्ही म्हणजे नंबर एकचे वेंधळे आहात. म्हणून उठलात की नाही, चहा-नाष्टा-जेवण-औषधी वेळेवर घेतली की नाही हे सारे विचारण्यासाठी मी केव्हाही फोन करणार. एखादा आवडीचा सिनेमा, क्रिकेटचा सामना लागला की, तुम्हाला वेळेचे भान राहात नाही. उगाच रात्रभर जागत बसू नये यासाठी मी वेळी-अवेळी फोन करून आठवण करून देणार...."

"अग, किती छान जोडी जमलीय ना आपली....वेंधळा-वेंधळी! अं हं ही नावे मी नाही तर आपण एकमेकांना दिली आहेत बाईसाहेब!"

"ते जाऊ द्या ना. आता सांगाल का...."

"तेच तर सांगतोय की, तू मला काय करता हे विचारण्यासाठी वेळी अवेळी फोन करणार आणि रात्री बेरात्री फोन करून माझी झोपमोड करणार. पण असे फोन करण्यासाठी तू सोबत मोबाईल नेला आहेस का?" संजीवने हसत विचारले.

"अय्या खरेच की. थांबा हं. होल्ड करा. मी पर्समध्ये पाहते आणलाय का तो......" असे म्हणत समीक्षाने हातातला भ्रमणध्वनी कानाच्या आणि खांद्याच्यामध्ये दाबून धरला आणि आसनावर बाजूला ठेवलेली मोठी पर्स कम पिशवी उघडून त्यातून एक पर्स काढली. त्या पर्सला असलेले सारे कप्पे तपासत ती म्हणाली,

"खरेच की हो. मला मोबाईल सापडत नाही हो. तुम्हाला निघताना तीन तीनदा विचारले मोबाईल टाकला का, फोन टाकला का? तुमचे आपले नंदीबैल गुबगुबू! फक्त मान हलवता. बोलत काही नाही. नेहमी म्हणते सगळ्या बायकांना दोन दोन नवरे.....चुकले दोन दोन मोबाईल असतात. मलाही घेऊन द्या. म्हणजे मग एक मोबाईल कायम प्रवासी पिशवीत ठेवता येतो पण माझे ऐकाल तर ना? स्वतः मात्र तीन-तीन सीमकार्ड टाकलेले चार-चार मोबाईल बाळगता. त्या हव्यासापायी आतापर्यंत किती मोबाईल हरवले याचा आहे का काही हिशोब? एकदा तर तुमचा मोबाईल धावत्या रेल्वेतल्या शौचालयात पडला होता आणि मग बाहेर आल्यावर रेल्वे थांबवण्यासाठी चैन ओढू पाहात होता. प्रवाशांनी अडवले..... बरे, ते जाऊ द्यावे. रोजचेच रडगाणे आहे ते. माझा एकुलता एक गोजीरवाणा मोबाईल शोधून कुरियरने लगेच माझ्या माहेरी पाठवून द्या...."

"अग पण शोधू कुठे? मोबाईल ठेवायचा एक ठिकाणा आहे का तुझा?"

"घराच्या बाहेर तर ठेवला नसेल ना? मिसकॉल देऊन पहा ना." 

"तेच तर करतोय पण कधी व्यस्त लागतोय तर कधी 'कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे' असा गोड, मधाळ आवाज येतो....."

"त्या मधाळ आवाजाचे सोडा तो आवाज ऐकण्यासाठीच चार चार मोबाईल बाळगता. जा उठा. आधी बेडरूममध्ये जा....."

"बेडरूममध्ये? तू नसताना? ना रे बाबा ना. ठीक आहे. हा पोहोचलो आपल्या बेडरूममध्ये. अग पण कुठे कुठे शोधू तुला आय मिन मोबाईलला....."

"दोन्ही उश्यांखाली बघा..... नाही का? मग पांघरुणात गुंडाळला गेलाय का ते पहा. मला एक सांगा, रात्री स्वतःचे चार-चार मोबाईल बेडरूममध्ये आणता. रात्रभर येणाऱ्या संदेशांमुळे रात्रभर चिवचिवाट करतात. माझा एकच मोबाईल आहे तो आणा म्हटलं तर मुद्दाम आणत नाहीत. रात्री-अपरात्री मला फोन आला तर समजावे कस? काही सांगू नका, माहिती आहे, काय सांगणार आहात ते, सकाळी समजतो मिसकॉल आला होता म्हणून. समजते हो, पण ज्यावेळेसची गंमत त्याचवेळी मजा देते. शिळे खाण्यात काही अर्थ आहे का? तुम्ही कसे रात्री दोन नाही की तीन नाही, जाग आली धरा हातात....मोबाईल हो! ....."

"बरे, तुझे कीर्तन चालू असताना मी बेडरूममध्ये शोधले, तुझी कपड्यांची चार कपाटे शोधली. समीक्षे काय ती साड्यांची कोंबाकोंबी, एका साडीच्या पदराला हात घातला.... आलमारीतल्या एका साडीचा कोपरा वर करुन त्याखाली पाहावे म्हटलं तर...."

"पाडल्या ना सगळ्या साड्या खाली. मी म्हणते तिथे कशाला गेला होता तडफडत...."

"अग, तुझी मोबाईल ठेवायची जागा का एक आहे का? नंतर स्वयंपाक घरात पाहिले, फ्रीजमध्ये...."

"बाई... बाई, कमाल आहे तुमच्या वेंधळेपणाची अहो, फ्रीजमध्ये मोबाईल ठेवायला का ते दूध आहे की, भाजीपाला? नासू नये म्हणून ठेवायला..."

"डाळी-तांदुळाचे डब्बेही शोधले. मला माहिती आहे, तू म्हणणार की, ते डब्बे कशाला हुडकलेत? खरे सांगू का, म्हटले मागच्यावेळी नोटबंदी झाली त्यावेळी डब्यांमधून किती 'काळे धन' मिळाले होते ना तसे वाटले यावेळी तू डब्यात जमवलेल्या पैशांवर डल्ला मारावा..."

"हे...हे... पडली ना तुमची विकेट? अहो, वेंधळी असले तरीही एवढी वेंधळी नाही की, डब्यातले पैसे डब्यातच सोडून यायला. अहो, डाळीचा डब्बा, तांदुळाचा डब्बा, शेंगदाण्याचा डब्बा काय किंवा आलमारीतले चोरकप्पे काय सर्व ठिकाणी लपविलेली सारी रक्कम मी सोबत घेऊन आली आहे. बरे, मोबाईल दिसतोय का....."

"नाही ना. दिसला असता तर 'युरेका... युरेका ' म्हणून ओरडलो असतो ना. तुला बोलत सर्वत्र हिंडतोय पण मोबाईल काही दृष्टीला पडत नाही. आता फक्त एकच जागा शोधायची राहिली ती म्हणजे न्हाणीघर आणि शौचालय...."

"तुम्हाला असेच वाटणार ना, त्यामागेही कारण आहे कारण आपण स्वतः दोन-दोन मोबाईल घेऊन शौचाला जाता, एक-एक तास आतमध्ये खेळत बसता...मोबाईलशी हो. अहो, तुम्हाला आठवते का हो सहा महिन्यांपूर्वी तुमच्या बहीणबाई आल्या होत्या....."

" बरोबर आहे. सहा महिन्यांनी येणारी माझी बहीण आणि महिन्यातून सहा वेळा येणारी तुझी बहीण...."

"येत असेल पण सहा महिन्यांनी येणाऱ्या माणसाची वरवर करताना नाकीनऊ येतात हो. माझी बहीण नेहमी येत असेल पण कायम पलंगावर पडून नसते. तुमची बहीण तर स्वतः पाणी प्यालेला प्याला फेकून मोकळी होते. तुमची बहीण आपल्याकडे येताना चाळीस किलोची असते आणि इथून जाताना कुंटलभर वजनाची असते. माझ्या बहिणीचे नेमके उलटे होते. मुद्दा तो नाही तर मोबाईल शौचालयात नेण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुमच्या बहिणीची सकाळी सकाळी झालेली अवस्था आठवली की हसू येते हो...."

"तिथे सापडेलच कसा? पण खरेच माझा मोबाईल कुठे असेल हो. बरे, तुम्हाला आठवते का, तुमच्या गाडीवर बसून आपण आत्ता बसस्थानकावर येत असताना मला कुणाचा कॉल आला होता का हो? आठवते का तुम्हाला? कुणाचा कॉल आला असेल आणि तो उचलता उचलता खाली पडला असेल तर? पण नाही. ते मला समजले असते ना?

"खरे तर मला तुझा मोबाईल दिसत नाही. पण मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की, याक्षणी तो मोबाईल कुठे आहे ते..."

"अहो, मग सांगत काय बसलात? उचला तो मोबाईल आणि कुरिअर करून पाठवून द्या, माझ्या माहेरच्या पत्त्यावर....."

"तेही केले असते ग. पण तो की नाही आता माझ्यापासून खूप दूर गेलाय ग...."

"म्हणजे? माझा मोबाईल चोरीला गेलाय? तुम्हाला माहिती आहे तर पकडा ना त्या चोट्ट्याला. नाही तर पोलिसात द्या. अहो, किती छान होता हो माझा मोबाईल. कुणाची दृष्ट लागली असेल हो. आता बोलत बसू नका. कुठे आहे तो ...."

"तो चोर कुठे आहे माहिती नाही पण मोबाईल कुठे आहे ते माहिती आहे. तुझा मोबाईल शोधून दिला तर काय देशील?"

"तुम्ही मागाल ते देईन. मग तर झाले ना?"

"अग, वेडाबाई, तू आत्ता मला कुणाच्या मोबाईलवरून बोलतेस?"

"कुणाच्या म्हणजे? माझ्याच! अग बाई, खरेच की, माझा मोबाईल तर .....अस्से आहे का? माझ्या वेंधळेपणाचा अस्सा फायदा घेतलात का? खरेच मी किती वेंधळी आहे हो?...."

"असू देत. वेडी असेल नाही तर वेंधळी असेल पण आहे माझीच.....प्रिय समीक्षा!" असे म्हणत म्हणत संजीवने हसत हसत भ्रमणध्वनी बंद केला. काही वेळापूर्वी आलेले औदासिन्य एका क्षणात दूर पळाले.........

                       


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy