आव्हान
आव्हान


अनिताने आळस देत भिंतीवरील घड्याळात पाहिले. दुपारचे तीन वाजत होते. 'तीन वाजत आहेत. म्हणजे समूहावर 'आजचे आव्हान' आलेच असणार. आज मला चांगलीच झोप लागली. इतका वेळ अनेक बायकांनी आव्हान स्वीकारलेही असेल. हरकत नाही. वेळ आहे. काय आव्हान दिलेय ते पाहूया आणि हमखास जिंकूया...' असे पुटपुटत अनिताने भ्रमणध्वनी सुरू केला आणि ती त्या समूहात शिरली.. जणू एखाद्या चक्रव्यूहात शिरल्याप्रमाणे! तिने आव्हान वाचले,
'पंखा, स्टुल, दोरी यासह सेल्फी काढायची आहे.' असे आव्हान होते. ते पाहून अनिता मनाशीच पुटपुटली,
'आजचे आव्हान म्हणावे तितके आव्हानात्मक नाही. कसे सपकसार, आळणी वाटतेय. तरी पाहूया बायकांनी काय दिवे लावले आहेत...' असे म्हणत अनिताने ज्या ज्या बायकांनी आव्हान स्वीकारून ते तडीस नेले होते त्यांनी टाकलेल्या सेल्फी बघितल्या आणि ती पुन्हा पुटपुटली,
'आव्हानही पुळचट आणि पूर्ण करणाऱ्याही तशाच... आव्हान कसे हवे? बुद्धिला झिणझिण्या आणणारे, काही तरी विचार करायला लावणारे, मतीला चालना देणारे, मती गुंग करणारे असे असावे. बहुतांश बायकांनी पंख्याखाली स्टुलावर बसून पंख्याला हात लावायचा प्रयत्न केला आहे. स्टुलावर बसून पंख्याला हात लावता येईल का? एक-दोघींनी तर स्टुलावर उभे राहून, दोरी पंख्यावर टाकलीय आणि स्टूल हलू नये म्हणून कपाटाचा आधार घेतलाय. हे काय, यांनी तर दोरी ऐवजी सुतळीच आणलीय की... थांबा हे आव्हान कसे आव्हानात्मक करता येईल आणि ते कसे यशस्वीपणे पार पाडायचे... जिंकायचे हे या महिलांना मी दाखवून देते...' असे म्हणत अनिताने गरगर फिरणारा पंखा बंद केला. स्वयंपाक घरात असलेला स्टूल आणला. दोरी? तिच्या पटकन लक्षात आले आणि ती धावतच बालकनीत गेली. तिथे धुणे वाळत घातलेली दोरी काढून घेऊन आली.
'आज सेल्फी तर टाकूयाच पण त्यापूर्वी हे आव्हान पार पाडण्यासाठी, जिंकण्यासाठी मी काय काय करते याचा सरळ व्हिडीओ करूनच टाकूया...' असे बडबडत अनिताने सेल्फी स्टिक काढली. समूहावर एक संदेश टाकला,
'आजचे आव्हान मी स्वीकारत असून मी आव्हानाला कशी सामोरी जातीय त्याचा व्हिडीओ फेसबुकवर लाइव्ह दाखवत आहे आणि शेवटी आव्हान पूर्ण केल्याची सेल्फी टाकते...' असे म्हणत तिने सेल्फी स्टिक व्यवस्थित बसवली. त्यावर भ्रमणध्वनी व्यवस्थित बसवला. त्याची दिशा ठरवताना अनिताची दशा झाली. खूप वेळ खटपट केल्यानंतर तिच्या मनासारखी स्थिती तयार झाली आणि ती पुढच्या तयारीला लागली. ही सारी तयारी करताना आणि आव्हान जिंकायचे या नादात ती दररोजच्याप्रमाणे नटायचे, सजायचे चक्क विसरून गेली. झोपेतून उठलेल्या म्हणजे बऱ्यापैकी विस्कटलेल्या अवस्थेत ती तयारीला लागली.
स्टूल बरोबर ठेवला. तो ठेवतानाही पंखा आणि स्टूल यांची स्थिती अनेकदा तपासली. नंतर पंख्याला दोरी बांधली. नंतर ती स्वतः स्टूलावर चढली. दोरीचे दुसरे टोक गळ्यात बांधत असताना फेसबुक लाईव्ह पाहणारांना प्रचंड धक्का बसला, फार मोठा गोंधळ उडाला...
अनिता तीस वर्षीय विवाहित तरुणी! लग्न होऊन तीन महिने झाले होते. पती अनिल एका मोठ्या पदावर नोकरीला होता. सासरही तसे गडगंज होते. अनिलच्या गावी जमीन आणि इतर बरेच व्यवसाय होते. अनिताचे माहेरही चांगल्यापैकी श्रीमंत होते. त्यामुळे अनिताला नोकरी करण्याची गरजच नव्हती किंबहूना अनिलची तशी अट होती. अनिताचे सासर-माहेर त्या शहरापासून अगदी जवळ होते. दिवसभर अनिताला काही काम नसायचे. दोन महिन्यांपासून तिने कामाला असलेल्या सर्व बायका काढून टाकल्या होत्या आणि सारी घरकामे ती स्वतःच करीत होती परंतु दोघा राजाराणीच्या संसारात काम ते काय असणार? शिवाय शनिवारी आणि रविवारी तसेच मध्यंतरी एखादे दिवशी अनिल लवकर घरी आला तर दोघेही जेवायला बाहेरच जात असत त्यामुळे अनिताला विशेष काम नसायचे. थोडेफार असलेले काम झाल्यानंतर तिचा सारा वेळ टीव्ही पाहणे, भ्रमणध्वनीवर खेळणे, फोनाफोनी करण्यात जात होता. काही महिन्यांपासून व्हाट्सअपवरील विविध समूहावर 'ऍक्सेप्ट द चॅलेंज' असा एक आव्हानात्मक खेळ सुरू होता. सुरुवातीला कधी ते आव्हान स्वीकारायचे तर कधी स्वीकारायचे नाही असे अनिता करीत होती परंतु अनिता मुळात कुशाग्र बुद्धिची, कल्पक असल्यामुळे जे आव्हान ती स्वीकारायची ते आव्हान पूर्ण केल्याशिवाय तिला राहवत नसे, चैन पडत नसे. त्यामुळे हळूहळू अनिता त्या खेळाच्या आहारी गेली. आव्हान स्वीकारणे आणि कल्पकतेने ते पूर्ण करणे ही सवयच तिला जडली नव्हे कालांतराने ती तिची विकृती बनली. त्याच विकृतीच्या आहारी जाऊन तिने त्यादिवशी समूहावर आलेले 'ऍक्सेप्ट द चॅलेंज' स्वीकारले. ते आव्हान पूर्ण करीत असताना इतर बायकांपेक्षा आपण काही तरी वेगळं करतोय हे दाखवताना ती जी काही कृती करीत होती त्यामुळे फार मोठा गोंधळ उडाला कारण ती कृती म्हणजे एक प्रकारे अनिता आत्महत्या करीत असल्याचे फेसबुकवर प्रत्यक्ष दिसत होते. महत्त्वाचे म्हणजे अनिताने फेसबुकवर दाखवताना म्युझिक सिस्टीमवर एक गाणे लावले होते.
'मी असेन, मी नसेन...'
तिचे सासरे फेसबुकवर लाईव्ह होते. त्यांनी अनिताचा तो 'शो' पाहिला आणि त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी स्वयंपाक घरात पाहात आवाज दिला,
"अग... अग... लवकर ये. आलीस का?..."
"आले. आले..." असे म्हणत स्वयंपाक करीत असलेली त्यांची पत्नी धावतच बाहेर आली.
"काय झाले हो? इतक्या गडबडीने कशाला बोलावले?.."
"अग, हे फेसबुक तर बघ..."
"अग माय, ते डबडं पाहायला बोलावलं का? मला वाटलं कायच झालं की..."
"अग, बघ, सूनबाई... अनिता बघ तर..."
"अच्छा! अनिताने एखादा व्हिडीओ टाकलाय का? खूप छान व्हिडिओ टाकते हो. बघू .. बघू..." असे म्हणत तिने कौतुकाने पतीच्या हातातला भ्रमणध्वनी हातात घेतला आणि दुसऱ्याच क्षणी धाडकन ती सोफ्यावर बसली. डोळे पाण्याने गच्च भरलेल्या अवस्थेत तिने विचारले,
"अहो... अहो...हे काय झाले? अ... अ... अनिताने हे... हे... काय केले? आ..आ... आणि अनिल कुठे आहे? अहो, तुम्ही असे काय बसलात? अनिलला फोन तरी करा..." हातातला फोन नवऱ्याच्या हातात देऊन ती म्हणाली. तसे अनिलचे वडील पटकन उठले. त्यांनी अनिलला फोन लावला पण तो फोन उचलत नसल्याचे पाहून ते पुटपुटले,
"हे पोट्ट कधी पटकन फोन उचलेल..." असे म्हणत त्यांनी पुन्हा फोन लावला. एक- दोन अनेकदा फोन केल्यानंतर अनिलने फोन उचलला आणि त्रासलेल्या आवाजात म्हणाला,
"काय झाले बाबा? बोला पटकन..."
"अ..अ..अरे, त.. तू फेसबुक पाहिले का?"
"बाबा, मी कार्यालयात आहे. इथे कामे असतात..."
"अरे, बाबा मला ते माहिती आहे. अनिताने फेसबुकवर..."
"आजचे समूहातील आव्हान तिने जिंकले असणार..."
"अरे, नाही रे. त.. त.. तू पटकन घरी जा. आम्हीही निघतोय इकडून... ती फेसबुकवरुन आऊट झालीये..."
"घरी जाऊ? तुम्ही येताय पण का?"
"अरे, वेळ घालवू नकोस. अनिताने जीव द्यायचा प्रयत्न केला आहे. त्याचा लाईव्ह व्हिडीओ..."
"का...य? आत्महत्त्या? अनिता? मी निघालोय. दहा मिनिटात घरी पोहोचतोय..." असे म्हणत अनिल धावतच निघाला...
तिकडे अनिताची आई दुपारची झोप झाल्यानंतर उठली आणि सवयीप्रमाणे फोन हातात घेऊन फेसबुकवर पोहोचली. अनिता फेसबुकवर होती. स्टूल, पंखा, दोरी यांची जमवाजमव करणारी अनिता तिला दिसली आणि ती प्रचंड हादरली. घाबरली. घामाने न्हाली.
'अ..अ...अग...अ.अ. निते..हे...हे..काय करतेस ग तू...' असे पुटपुटत तिने नवऱ्याला फोन लावायचा विचार केला आणि फोन बंद केला पण डोळे भरून आल्यामुळे तिला काहीच दिसत नव्हते. तिने पदराने डोळे स्वच्छ केले. धीर धरून पाणी डोळ्यातच अडवले. कसा बसा नंबर जुळवला. तिकडे अनिताच्या वडिलांनी फोनवर पत्नीचे नाव पाहिले आणि 'यावेळी हिचा फोन?' असे पुटपुटत ते म्हणाले,
"हं. बोल ग. काय म्हणतेस? काम आहे का?"
"कामाचे सोडा हो. फेसबुक बघितले का?"
"अग, इथं पाणी प्यायला फुरसत नाही..."
"अहो...अहो... अनिता..अनिता... फेसबुकवर आत्महत्त्या करतेय..."
"फेसबुकवर? काय म्हणतेस?"
"आधी फेसबुक बघा आणि पटकन निघा..." असे म्हणत रडणाऱ्या अनिताच्या आईने फोन बंद केला. काही न कळलेल्या अवस्थेत त्यांनी घाईघाईने फेसबुक सुरू केले. खरेच अनिता स्टूलवर चढली होती. तिने दोराचे एक टोक पंख्याला बांधले होते आणि दुसरे टोक ती गळ्यात बांधत असल्याचे पाहून तिच्या वडिलांचे धाबे दणाणले. ते ओरडले,
"अ...अ...ने....अनिता, हे काय करतेस?..." तितक्यात त्यांच्या हातातील भ्रमणध्वनी धाडकन खाली पडला आणि त्याचे चार तुकडे झाले. सहकारी मदतीला धावले. कुणीतरी त्यांच्या भ्रमणध्वनीच्या भागांची जुळवाजुळव केली. ते घामाघूम झालेले पाहून एकाने पाण्याचा ग्लास त्यांच्यासमोर धरला. पाण्याचा एक-दोन घोट घेऊन ते म्हणाले,
"मला निघायला हवे..." कुणाला काही न सांगता त्यांनी चालकाला कार आणायला सांगितले...
अनिल लगबगीने निघाला पण त्याची कार सुरूच होत नव्हती. खूपवेळा प्रयत्न केल्यामुळे तो घामाने निथळत होता. कार सुरू होत नाही हे पाहून तो खाली उतरला. रस्त्यावर येऊन त्याने टॅक्सीला हात दाखवला. टॅक्सी थांबताच तो घाईघाईने आत बसला. चालकाला पत्ता सांगितला आणि एकदम काहीतरी आठवल्याप्रमाणे त्याने भ्रमणध्वनी सुरू केला. फेसबुकवर स्पर्श करताच उघडलेल्या फेसबुकवर आलेले दृश्य पाहून तो नखशिखांत शहारला. घाबरला.
'काय झाले? अनिताने हे असे का केले? आमच्यात काही वाद तर नव्हता झाला मग तिने असा निर्णय का घेतला? अनिता चक्क आत्महत्त्या करतेय? का? का? काय कारण असू शकते?..' असे मनाला विचारत अनिलने अनिताचा क्रमांक जुळवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ फोन लागत नव्हता. दुसऱ्या क्षणी एक विचार अनिलच्या मनात आला. तो पुटपुटला,
'कसा लागेल अनिताचा फोन? ती याही अवस्थेत फेसबुकवर लाईव्ह आहे. लागणारच नाही...' अनिलला पुन्हा काही तरी सुचले. त्याने शेजारच्या सदनिकेत राहणाऱ्या कमलाकरच्या पत्नीचा फोन लावला. काही क्षणातच पलीकडून आवाज आला,
"कुठे आहात भाऊ तुम्ही? घरी नाहीत का तुम्ही?"
"नाही ना. म्हणून तर तुम्हाला फोन केलाय. मी निघालोय. पण तुम्ही घरी जा ना..."
"कसे जावे आत? आतून दार बंद आहे. खूप जण जमले आहेत पण अनिता दारच उघडत नाही हो. भाऊ, तुमच्या दोघांमध्ये काही भांडण, वादविवाद होते का हो? आम्हाला वाटले नुकतेच लग्न झाले आहे, दोघेच राहतात. सारं काही आलबेल असेल पण... असतात हो वाद असतात पण या टोकाला जाणे म्हणजे..."
"म्हणजे? नाही हो. आम्हा दोघांमध्ये काहीच वाद नव्हता, भांडणं तर एकदाही झाले नाही..."
"मग अनिताने आत्महत्त्या का करावी? असे तर नाही ना भाऊ, तिचे बाहेर कुठे काही ... म्हणजे लग्नाच्या आधी एखादे प्रेम प्रकरण..."
"नाही.. नाही.. तसे काहीच नाही. ठेवतो. घरी पोहोचतोय..." असे म्हणत अनिलने फोन बंद केला...
अनिताच्या सदनिकेसमोर खूप गर्दी जमली होती. आळीपाळीने प्रत्येक जण दारावर थाप मारीत होता. दारावरची घंटी एकसारखी वाजत होती परंतु आतून कोणतीही हालचाल वा प्रतिसाद मिळत नव्हता. सारे चिंताग्रस्त होते. शिवाय प्रत्येक जण अनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते परंतु अनिल कुणाचीही फोन उचलत नव्हता, कट करीत होता. कुणीतरी पोलिसला फोन करून बातमी कळवली.
"अनिल फोनही उचलत नाही..."
"कसा उचलणार? कोणत्या तोंडाने बोलणार?"
"म्हणजे?"
"अहो, बायको आत्महत्त्या करतेय यामागे प्रामुख्याने कोण असू शकते? सासरची मंडळीच ना? पण इथे हे दोघेच राहतात मग याप्रकारामागे कोण असेल नवराच ना? मग कशाला तो फोन..."
"अहो, पण तिने आत्महत्त्या करतानाचा व्हिडीओ टाकलाय मग नवरा कसा असेल?"
"मी खून कुठे म्हणतोय? आत्महत्त्या करायला भाग पाडणारा तर नवरा असू शकतो. एखादी बाई या निर्णयापर्यंत येते म्हणजे तो तिचा आजचा विचार आहे का?"
"बरोबर आहे तुमचे. नवऱ्याच्या जाचाला, वागण्याला कंटाळून बाई असे करते..."
"या बुवाचे बाहेर तर काही संबंध नाहीत ना?"
"तसे वाटत तर नाही पण काय सांगावे बुवा. अशीच माणसे..."
"आपण एकांगी विचार करतोय. यामागे नवराच आहे असा पक्का समज करून आपण बोलतोय पण बाईच्या वागण्याचाही विचार करा. तिचेही बाहेर संबंध असू शकतात आणि ते संबंध नवऱ्याला समजताच बाई मरण पत्करु शकते."
"मला तुमच्या बोलण्यात तथ्य वाटते. नाही. मला थोडा संशय आलाच होता. वागणे, सजणे, बोलणे, नटणे, मुरडणे थोडे वेगळेच होते."
व्यक्ती तितक्या प्रकृती, तोंडं तितकी मतं! मतामतांचा बाजार तेजीत असताना तिथे अनिलचे आगमन झाले आणि सारे शांत झाले. पण कुणालातरी अनिलला पाहिले आणि स्त्री दाक्षिण्यतेची आठवण झाली. तो पटकन म्हणाला,
"बघा. बघा. कसे तोंड वर करून आले आहेत. बायकोवर आत्महत्त्या करण्याची वेळ आणली आणि स्वतःवर काही येऊ नये म्हणून कार्यालयात निघून गेला. सारे संपले आणि यांचे आगमन झाले. पोलिसांच्या ताब्यातच द्यायला हवे..."
"अरे, थांबा. त्यांच्याजवळच्या किल्लीने त्यांना दार तर उघडू द्या..." कुणीतरी ज्येष्ठ व्यक्ती म्हणाली आणि अनिलला दाराजवळ जाण्याची संधी मिळाली. अनिल दाराजवळ पोहोचला. त्याने खिशात हात घातला आणि त्याला काहीतरी आठवले आणि तो म्हणाला,
"अरे, बाप रे! चावी तर कारमध्ये ठेवलेल्या बॅगमध्येच विसरलो आणि कार सुरू होत नव्हती म्हणून टॅक्सीने आलो..."
"व्वा! व्वा! किती साळसूदपणे बोलतोय हा. सगळ्या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्या आहेत."
"आता घर उघडणार कसे? खुप प्रयत्न केले पण दार निघत नाही..." कुणीतरी म्हणत असताना तिथे अनिलच्या सासू-सासऱ्यांचे आगमन झाले.
"काय झाले अनिल? सगळे बाहेर कसे? अनिता कुठे आहे? तिला काही झाले तर नाही ना?"
"बाबा, अनिता आतच आहे. काय झाले ते समजायला मार्ग नाही. तिचा फोनही लागत नाही."
"अहो, मग दार तोडा की." सासऱ्यांनी सुचविले.
"अहो... अहो... काही तरी करा. अनिताला बघा हो. तळमळत असेल हो पोर माझी..."
"काका, मला सांगा, अनिताताईने तुम्हाला, काकूंना कधी फोन करुन तिचा छळ होतोय, नवरा त्रास देतोय असे काही सांगितले होते का हो?"
"नाही. नाही. असे काहीही सांगितले नाही. दररोज फोनवर बोलणे होत असे परंतु कधीच काही म्हणाली नाही."
"याचा अर्थ ती प्रचंड दबावाखाली होती. तिला एका शब्दानेही काही सांगायची परवानगी नव्हती. काय दहशत म्हणावी या माणसाची?..." स्वतःला फौजदार समजून एकाने प्रश्नांची सरबत्ती केली. तितक्यात खाडखाड आवाज करीत पोलिसांचे आगमन झाले.
"कोण राहते या घरात?" फौजदाराने विचारले.
"मी.. मी.. राहतो..." पुढे होऊन अनिलने सांगितले.
"आत्महत्त्या करणारी तुमची बायको होता?"
"ह..ह..हो. पण अजून आत्महत्त्या..."
"केली नाही? कुणाची वाट पाहतेय? आम्हाला फोन येऊन एक तास होतोय. त्यावेळी जो व्हिडीओ पाठवला होता त्यात एक स्त्री आत्महत्त्या करीत असल्याचे दिसतेय. एवढा वेळ काय ती बाई पंख्याची, दोरीची आणि स्टुलाची पूजा करीत बसलीय का?" फौजदाराने विचारले.
"असे म्हणू नका हो. दार उघडा ना. माझी पोरगी आत आहे हो..."
"अरे, तोडा रे दार..." फौजदाराने आदेश दिला आणि पोलिसांनी एका मागोमाग एक घाव घालत अथक परिश्रमाने दार तोडले. तसे फौजदार कडाडले,
"थांबा. कुणीही आत यायचे नाही. आम्ही बघतो काय झाले ते?" असे म्हणत फौजदार आणि काही शिपाई आत शिरले. फौजदारांनी एका शिपायाला दारात थांबण्याचा इशारा केला. अनिताच्या आईचे रडणे ऐकवत नव्हते, तिची अवस्था पाहवत नव्हती. तितक्यात अनिलचे आईबाबाही तिथे पोहोचले. गर्दी पाहून आणि विहीणबाईंची अवस्था पाहून अनिलच्या आईने आल्या आल्या टाहो फोडला...
काही वेळाने एक पोलीस धावतच बाहेर आला. तो म्हणाला,
"घाबरू नका. बाई जिवंत आहेत..."
"अहो, पण झाले काय?" कुणीतरी विचारत असताना अनिताची आई आणि सासू दोघीही पोलिसांना ढकलून आत शिरल्या. पाहतात तर अनिता सोफ्यावर पाणी पित होती. खूप थकल्यासारखी वाटत होती. तिच्या आईने तिला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिची मान खांद्यावर घेत तिने विचारले,
"पोरी ग, वाचलीस बाई! पण हे का केलेस तू? काय त्रास आहे तुला? अग, असा अघोरी विचार करण्यापूर्वी एकदा तरी सांगावे..."आईच्या बोलण्याचा मतितार्थ जाणून अनिता ताडकन आईपासून बाजूला झाली. तसे फौजदाराने विचारले,
"सांगा. तुम्हाला नवऱ्याचा काय जाच आहे? कशाप्रकारचा छळ होतोय तुमचा..."
"अहो, नाही. नाही. तसे काही नाही. मी व्हाट्सअप समूहावर आलेले आव्हान स्वीकारून ते जिंकण्यासाठी कृती करीत होते..." असे म्हणत अनिताने सारे काही सांगायला सुरुवात केली...
सारे सांगून ती म्हणाली, "मी स्टुलवर चढले. दोरी पंख्याला बांधली. गळ्यात अडकवली. आव्हान इथेच संपले होते अर्थात मी ते पूर्ण केले होते. फेसबुक लाईव्ह चालू होते. मला त्याच अवस्थेतील म्हणजे पंख्याला लटकेलेले दाखवून आव्हान पूर्ण केलेली सेल्फी टाकायची होती. पण माझा फोन स्टिकवर होता. तो घेण्यासाठी मी वाकले. मोबाईलला हातात घेत असताना माझा तोल गेला. पुढे काय झाले ते समजले नाही. कदाचित हा सोफा डोक्याला लागला असावा..."
"आम्ही आत आलो तर बाई इथेच पडलेल्या होत्या. बहुतेक शुद्ध गेली होती. आम्ही चेहऱ्यावर पाणी मारले आणि या शुद्धीवर आल्या. दवाखान्यात न्यावे लागेल..." फौजदार सांगत असताना इमारतीत राहणाऱ्या एक डॉक्टर पुढे होऊन म्हणाल्या,
"मी डॉक्टर आहे. तपासते..." असे म्हणत त्यांनी अनिताची नाडी, रक्तदाब, डोळे तपासले. सोफ्याच्या मारामुळे डोके कुठे सुजलंय का हे पाहिले आणि म्हणाल्या,
"सारे व्यवस्थित आहे. आताच दवाखान्यात न्यायची गरज नसली तरीही लवकरच दवाखान्यात जावे लागणार आहे... अहो, असे पाहताय का? तुम्ही आई होणार आहात..." डॉक्टरांचा तो आवाज सर्वांच्या कानावर गेला. पोलीस परत निघाले. दाराजवळ थांबलेल्या अनिलच्या खांद्यावर थोपटत म्हणाले,
"अभिनंदन! एक फार मोठे आव्हान तुम्ही जिंकले आहे. बारशाला मात्र आम्हाला बोलवा..." असे म्हणत फौजदारांनी निरोप घेतला...