Savita Tupe

Abstract Inspirational Children

3  

Savita Tupe

Abstract Inspirational Children

आजी !!

आजी !!

7 mins
194


    " सानू , चल बाळा जेवायला ." आईने आवाज दिला.

     सानू आईला ,"हो , आले आई ! " म्हणत पटकन डोळे पुसत जेवायला आली .

   आईने हळूच सानूकडे पाहिले , तिच्या लक्षात आले ही मुलगी आज पण रडली आहे . आईला कळेनासे झाले होते की सानूला कसे समजून सांगावे ?

   सानवी ८ वर्षाची हुशार आणि चुणचुणीत, तेवढीच अतिशय समजुतदार मुलगी . घरात सगळ्यांची लाडकी . पण दोन दिवसांपासून अगदी शांत अन् अबोल झाली होती . घरात सतत चिवचिव करणारी ही चिमणी गप्प गप्प रहात होती , मधूनच डोळे भरून येत होते तिचे आणि त्याला कारण होते , तिची आजी .

  हो ! आजी !...‌ 

   दोन दिवस आधी सानूची आजी फलटणला काकाकडे गेली होती .

 आजोबा गेल्यानंतर आजी प्रत्येक काकाकडे तीन चार महिने जाऊन रहात असे . पण ह्यावेळी मात्र सानूच्या इथे आजी बरेच दिवस राहिली होती . इतके दिवस सानूला नीट कळत नव्हते पण ह्या वेळी मात्र सानूला आजीचा खुप लळा लागला होता . तिची आणि आजीची छान गट्टी जमली होती . म्हणूनच आजीपण सानूच्या घरी छान रमली होती .

   आजीला गावाला जावं लागलं कारण दुसऱ्या काकीला आता बाळ होणार होते , त्यामुळे जाणं गरजेचे होते . लवकरात लवकर परत येईल असे सांगुन आजी गावाला निघून गेली .

   सानूला सारखी आजीची आठवण येत होती . घरात सगळे समजावून सांगत होते पण सानूला काही करमत नव्हते . कोणी ओरडेल म्हणून सानू एकटीच रडत बसायची . 

  आजही तसेच झाले . आईने बाबांना खुणावले . बाबांच्या लक्षात आले , त्यांनी आईला शांत रहा म्हणुन सांगितले .

   सगळ्यांचे जेवण झाल्यावर बाबांनी सानूला विचारले की , " आईस्क्रीम खायला जाऊ या का ? "

सानूची कळी खुलली , " हो , चला . " म्हणत सानू बाबांच्या आधीच निघाली . आईला पण सोबत घेऊन तिघे जवळ असलेल्या आईस्क्रीम पार्लर मध्ये निघाले . 

   तिघांनी त्यांची फेवरेट आईस्क्रीम घेतली आणि ते तिथल्याच एका कट्ट्यावर बसले . सानूने आईस्क्रीम संपवली . थोडावेळ मुड छान राहीला तीचा पण परत शांत झाली . 

   आई बाबा आता मात्र काळजीत पडले . बाबांनी आईला घरी जायला सांगितले आणि ते सानूला घेऊन तिथेच बसले .

   सानू काही बोलत नव्हती . बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले , " आजीची आठवण येते का ग खुप ? "

बस ! .... बाबा एवढंच बोलले आणि सानू बाबांच्या कुशीत शिरून रडू लागली . ती बाबांना रडत रडत म्हणाली ," बाबा आजी आपल्या घरी कायमची का नाही रहात ? "

"हो बाळा , आता आली ना इथे की कधीही परत पाठवायचे नाही तिला ." बाबा सानूला प्रेमाने समजावत म्हणाले .

 " पण मला आत्ताच आजी हवी आहे . तुम्ही जा आणि तिला आत्ताच्या आत्ता घेऊन या ." सानू हट्टाने म्हणाली .

  बाबांना सानूची आजीसोबत असणारी जवळीक जरा जास्तच जाणवत होती .

यावर लवकरात लवकर उपाय काढायला हवा याची बाबांना जाणीव झाली .

    थोडावेळ विचार करून बाबा सानूला म्हणाले , " सानू , माझ्या कडे एक मस्त आयडिया आहे ."

सानू डोळे पुसत बाबांकडे बघत म्हणाली ," काय आहे बाबा ? "

बाबा म्हणाले ," बघ , आजीला तर आत्ता लगेच नाही आणू शकत आपण , पण तिने इकडे लवकर परत यावे म्हणून तिला तू छान पैकी पत्र लिहून पाठव ." 

सानू आश्चर्याने बाबांकडे बघत म्हणाली ," पत्र ? "

बाबा म्हणाले , " हो , तू छान पत्र लिहून दे मला , मी त्यावर काकाचा पत्ता टाकून पत्रपेटीत टाकतो . पत्र दोन दिवसांनी मिळेल आजीला . पत्र मिळाले की आजी नक्की येईल परत तुझ्यासाठी ."

 सानूला बाबांची आयडिया आवडली असावी .ती जरा विचारात पडली मग बाबांना म्हणाली ," तुम्ही मला सांगाल का पत्र कसे लिहायचे ? "

 बाबा म्हणाले , " अरे , तुला तुझ्या शाळेमध्ये शिकवले नाही का पत्रलेखन कसे करतात ते ? "

सानू आठवून म्हणाली , " हो शिकवले आहे , पण तसेच लिहायचे असते का पत्र ? "

बाबा तिला , " हो " म्हणाले .

जास्त वेळ न घालवता बाबा तिला म्हणाले , " चल , आता आपण घरी जाऊ , माझ्याकडे आहे पत्र , मी तुला देतो मग तू उद्याच पत्र लिहून दे मला , मी लगेच पत्रपेटीत टाकून देतो ." 

    सानू आनंदाने घरी आली . आई दारातच वाट बघत बसली होती . सानू खुश झाली हे बघून आईला सुध्दा बरं वाटलं .

   बाबांनी सानूला कपाटातून एक आंतरदेशीय पत्र काढून दिले . सानू खुप खुश झाली ." आई मी आजीला आत्ताच पत्र लिहून पाठवणार आहे , मग बघ आजी लगेच परत येईल माझ्याकडे ."

आई तिला ," वा ! छान ," असे म्हणाली ,तोवर सानू आतमध्ये पळाली सुध्दा .

   आई बाबा दोघे हसत होते , त्यांच्या चिमुकलीला हसताना बघून .

  बाबांकडून पत्र कसे लिहायचे ते समजून घेवून सानूने आजीसाठी पत्र लिहायला घेतले .

    ........................................................................

     " माझी खुप खूप आवडती आजी ! "


     आजी मला तुझी खुप आठवण येते ग . मला ना घरात करमतच नाही . तू का गेलीस मला सोडून ? 

    तुझी आठवण आली की , मी रोज सारखी रडत असते . आजी तुला येते का माझी आठवण ? 

   आपण किती किती मज्जा करायचो ना ! पण आता माझ्यासोबत तसे कोणी खेळतच नाही .तूझ्या मुळे मला अभ्यास करायचा कंटाळा येत नव्हता . तू किती छान समजावून सांगायची सगळं .

     आई आणि बाबा अभ्यास घेताना माझं काही चुकलं की लगेच रागावतात .मग मला आवडतच नाही त्यांच्या सोबत .

   सकाळी अंगणात मोगऱ्याची , पारिजातकाची फुले पडलेली असतात पण मला कळतच नाही कोणती फुले निवडून घ्यायची ते .तू किती मस्त गोळा करून सावकाश ताटात ठेवायची . देवपूजा करताना किती स्तोत्र म्हणायचो आपण , मला ना आता ते आठवतच नाही एकटीला . आई करते पूजा पण तिला ऑफिसला जायचे असते मग ती पटकन आवरायला सांगते मला .मग मला अशी घाई घाईने पूजा करावीशी नाही वाटत .

   आजी , मला तुझ्यासोबत का नाही नेले ग गावाला ? तू सोबत असेल तर मी कुठेपण राहू शकते . 

     दुपारी जेवताना तूझ्या हाताने गरम गरम वरण भात खाताना किती मस्त वाटायचे आजी .  

    संध्याकाळी शुभंकरोती , रामरक्षा म्हणायची सवय पण तुझ्यामुळे लागली होती . तुला एक गंमत सांगू का आजी ? पण तू ओरडू नको बरं का ! , तू गेल्यापासून ना मी शुभंकरोती आणि रामरक्षा म्हणलेच नाही . आजी ! पण मी ना बाप्पाला म्हणलं आहे , मी माझ्या आजीसोबतच सगळं म्हणणार . म्हणून तू माझ्या आजीला लवकर आपल्या घरी घेवुन ये . मगच मी शुभंकरोती म्हणणार . तोपर्यंत मी बाप्पासोबत कट्टीच घेतली आहे . 

      रात्री तू किती किती छान गोष्टी सांगते , तूझ्या कुशीत मी कधी झोपून जायचे कळतच नव्हतं , तू तुझी साडी माझ्या अंगावर पांघरून टाकायची ना , मग मला खुप छान ऊब लागायची त्यात . मी झोपले की माझ्या स्वप्नामध्ये त्या गोष्टींमधली परी यायची आणि मला खुप चॉकलेट आणि आईस्क्रीम द्यायची , तिच्या पंखावर बसवून , ढगावर फिरायला न्यायची . आता ना मला स्वप्नच नाही पडत आजी .

आणि जर स्वप्न पडले तरी स्वप्नात पण फक्त तूच

 दिसते ग आजी !

     ये ना ग आजी लवकर . मी खुप खुप वाट बघते आहे तुझी . 

   तू मला म्हणाली होती ना , बाप्पा लहान मुलांचे ऐकतो म्हणून , मग मी बाप्पाला म्हणलं आहे की माझी सगळी खेळणी घे पण मला फक्त माझी आजी परत आणून दे .

   आमचे सगळे काका आणि काकी एकाच घरात राहूदे म्हणजे सगळ्यांना आजी मिळेल .

  आजी बाप्पा खरंच ऐकेल ना ग माझे ?

  लवकर ये आजी .

                          तुझी सानुकडी!

      .....................................................................


    पत्र लिहून सानूने बाबांना दिले .बाबांनी मग त्यावर काकांच्या घराचा पत्ता टाकून पत्राच्या पेटीत टाकले .

    सानू मग आजीची वाट बघत बसली .

     दोन दिवसांनी काकांच्या घरी आजीला सानूचे पत्र मिळाले .

सगळेच चकित झाले की पत्र कसे काय आले ? आठच दिवस तर झाले होते आजीला येवून .असे पत्र आजीसाठी पहिल्यांदाच आले होते .

       सगळ्यांनी सानूचे पत्र वाचले .आजीला तर खुप रडायला आले . तीलापण सानूची खुप आठवण येत होती .

   सानू त्यांच्या घरातलं पहिलं नातवंड होती . दुसऱ्या काकाचा मुलगा अजून लहान होता आणि आता तिसरी सून आत्ताशी बाळंत होणार होती . त्यामुळे सानू सगळ्यांचीच खुप लाडकी होती .

    सानूच्या पत्राने सगळ्यांना रडवलं . एवढीशी मुलगी आजीची किती आठवण काढत असेल हे तिच्या पत्रावरून सगळ्यांच्या लक्षात येत होते .आजीचा अजून धोसरा काढून हि चिमुकली आजारी पडली तर ?? या काळजीने सगळेच चिंतित झाले .

   काकीचे बाळंतपण अजून महिनाभर तरी लांब होते आणि काकीची आई पण सोबतीला होती , म्हणून मग आजीने थोड्या दिवसांसाठी सानूकडे परत जायचे ठरवले . 

  काकी बाळंत झाल्यावर मग सानूला सुध्दा घेवून यायचे ठरले . आजी पण मनातून सुखावली .

   आजीला तिन्ही मुलेच , आजीला मुलीची खुप हौस होती , तिला स्वतःला मुलगी झालीच नाही पण आता मात्र ती हौस सानूच्या रूपाने पूर्ण होत होती .मुलीची माया काय असते ते आजी अनुभवत होती . सानूच्या मायेने आजीचे सुध्दा डोळे भरून आले . 

   आजीने मग पुण्याचे तिकीट काढले आणि दुसऱ्याचं दिवशी सकाळी सानू कडे निघाली .

     अशी ही शब्दांची लडिवाळ किमया !

    तो होता ८० चा काळ , तेव्हा फोन , मोबाईल एवढ्या प्रमाणात अस्तित्वात नव्हते .

    कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या जवळच्या माणसांची पत्र लिहून ख्याली खुशाली कळवली जायची . घरचे लोक खुप आतुरतेने जवळच्या माणसांच्या पत्राची वाट बघत असत . 

   पत्रातला शब्दांचा खजिना वाचायला माणसे अगदी आतुर व्हायचे . पत्र वाचताना लिहिणारी व्यक्ती नजरेसमोर उभी राहून बोलल्याचा भास व्हायचा .


  !! असाच शब्दांचा भावूक करणारा शब्द प्रवाह वाचून आजीला तिच्या लाडक्या नातीकडे वहावत घेवून गेला नसता तर नवलच !


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract