भाग्य !!
भाग्य !!
बापाचा संसार अर्ध्यावर मोडणारी , अवगुणी , पांढऱ्या पायाची म्हणून कायम हिणवलेली ती ....
जन्मताच आईला खाल्लं म्हणून बापाने कायम दुस्वास केला ....
तिच्यासाठी नाही पण स्वतःला रांधून खायला घालायला दुसरी बायको आणली तिच्या बापाने ...
दुसरी आई ? ...
ती तर कायमच तिच्या सावत्रपणाच्या नावाला जागली ...
आईच्याच सावत्रपणाच्या जाचात लेक कशीबशी चौथी शिकली .
जात्याच हुशार .. शांत ...संयमी !
प्रचंड त्रासाने सुध्दा हे सोनं तावून सुलाखून उजळले होते .
सर्वगुण संपन्न निघाली पांढऱ्या पायाची ही सावत्र लेक.
वयात येताच मागची ब्याद टळावी म्हणून अशिक्षित गरीब अनाथ मुलगा बघून आई बापाने कसेतरी लग्न लावून दिले ...
पण ..
वर्षभरातच तिच्या कष्टाळू वृत्तीने अन् समाधानी मनाने त्या गरिबाघरी लक्ष्मी नांदायला आली अन् तिथे नंदनवन फुलले ..
दोघांच्या अथक कष्टाने आणि चिकाटीने शेणा मातीच्या , सपराच्या घराच्या जागी आज पक्के घर दिमाखात उभे राहिले होते ..
सुख , समृध्दी आणि पहिलटकरणीचे तेज लेकीच्या मुखावर आनंदाने झळकत होते ...
आणि ...
स्वतःच्या नावाला वांझोटेपणाचा डाग लागूनही लेकीच्या सुखाने आनंदी होण्याऐवजी त्या सावत्र आईच्या तनामनात मत्सराने आगीचा डोंब उसळला होता ...
(समाप्त)
