लग्नानंतरचे प्रेम !
लग्नानंतरचे प्रेम !
आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता . त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती . त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती .
शुभा सुध्दा चांगली शिकली होती , दिसायला सुध्दा अगदी मापात होती , संस्कारी होती . फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नव्हते .पण आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाठ बांधली होती .
मनाने आणि विचाराने सुध्दा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब .. विहान आणि विराज ही दोन मुले . सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे .
विहानची बायको अनघा एकुलती एक आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रुपाची आणि पैश्याची घमेंड असणारी .
विहान सोबत लव मॅरेज होवून दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र नाही होवू शकली . विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशीच स्वप्न बघत होता .
साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी , मनमिळाऊ आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती .विराज लग्न झाल्यावर आई बाबांच्या इच्छेसाठी का असेना पण तिच्यासोबत गरजेपुरते बोलायचा .
लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या संसाराला सुरवात झाली . शुभाचा मनमोकळा स्वभाव सगळ्यांना खुप आवडला .
सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती .हळूहळू सारं काही शिकत होती .
घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काहीना काही बनवून ठेवत असे .तिच्या हाताला खुप चव होती . तिच्या येण्याने घराला नवचैतन्य आले होते . शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते .सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला .
या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता . तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभा मध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता .
लग्न झाल्यावर एका महिनाभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते .
विराजला सुध्दा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तींसोबत असणारं वागणं सुध्दा तितकच उच्च आणि मनमोकळ असणं आवश्यक असतं.
विराजने तिच्या साध्या रहाणी कडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलुंकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होवून तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळलेच नाही .
विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासू सासरे , आई वडील सगळ्यांना विचारून त्याच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली .
विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले , तिला पार्लर मध्ये नेवून थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकओव्हर केला .
त्याच्या लक्षात आले , शुभा म्हणजे खरंच १ नंबरी सोनं आहे , थोडीशी झळाळी दिली आणि ती अजूनच चमकून गेली .
विराजला आपल्या आई वडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली
समाप्त .

