गर्भसंस्कार.
गर्भसंस्कार.
लग्नानंतर दोनच महिन्यात श्वेताला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आणि घरातले सगळे खुश झाले .
देशमुखांचे घर म्हणजे ८/१० माणसांचे मोठे कुटुंब , त्यात श्वेता ही मोठ्या काकाची पहिलीच मोठी सून . लहान काकाची मुले सुध्दा आता १२ -१३ वर्षाची होती . छोट्या अमेय नंतर या घरात लहान असे कोणीच नव्हते . त्यामुळे खुप वर्षांनी त्या घरात पुन्हा पाळणा हलणार होता .
आजे सासूला नात सुनेच्या गरोदरपणात जणू नव्याने तरतरी आली आजीला गर्भ संस्काराचे बरेच ज्ञान होते . सोबत तिला आयुर्वेदिक औषधांची बरीचशी माहिती होती . तिचा आजीचा बटवा आता नातसूनेला एखाद्या खजिन्यासारखा वाटू लागला .
आजी रोज न चुकता सकाळ संध्याकाळ रामरक्षा , मारुती स्तोत्र , इतर काही अध्यात्मिक वाचन सूनेकडून करून घेत .
रोज सकाळी उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यायचे , गरोदरपणात गरजेची काही आसने ,सोबत पंचामृत , अजून काही पौष्टिक काढे , खाण्या पिण्याच्या वेळेचे नियोजन असेच काही बाही अन् गरोदर पणाचे डोहाळे पुरवत आजी आणि घरातली इतर माणसे श्वेताला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत तिला जपतही होते . तीही न कंटाळता बाळाच्या उज्वल भविष्यासाठी सांगितलेले सारं काही मनापासून करत होती .
यथावकाश चार महिन्यांनंतर त्या माऊलीला गर्भातल्या बाळाची हालचाल जाणवायला लागली अन् अत्यानंदाने ती हरखून गेली .
बाळ पण मोठा लबाड होता, आईचे वाचन चालू झाले की एकदम शांत व्हायचा, जणू तो आतमध्ये बसून एकाग्रतेने सारं काही ऐकत असावा .
हल्ली तिला हे जाणवत होते की रामरक्षा म्हणत असताना बाळ अगदी शांत असायचे . तिने हा अनुभव घरात सगळ्यांना सांगितला . आजेसासू म्हणाली ," दिवसातून जितक्या वेळा ऐकता येईल तितके ऐकत जा ."
उदरात जाणवणाऱ्या बाळाच्या हालचाली अन् मातृत्वाचे हे अनोखे सोहळे श्वेता अगदी आनंदाने अनुभवत होती .
श्वेताचे नऊ महिने भरले आणि योग्य वेळी ती बाळंत झाली , छान गुटगुटीत मुलगा झाला .सगळे आनंदी झाले .
आजेसासू आणि श्वेता ची आई तिच्यासोबत दवाखान्यात राहिल्या होत्या . दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाळ अचानक रडायला लागले . खुप वेळ झालं तरी काही शांत होईना . डॉक्टर पण तपासून गेले . त्याला भूक लागली असावी म्हणून श्वेता ने त्याला दुध सुध्दा पाजले . सगळे उपाय करून झाले पण तो काही रडायचं थांबेना . बाळाने रडून रडून हॉस्पिटल अगदी डोक्यावर घेतले .
श्वेता , तिची आई आणि आजेसासू काय करावे न कळून त्याला पाळण्यात घालून झोका दे , तर कधी हा पाळणा करून हलवत झोपावयचा प्रयत्न कर, असे नानाप्रकारे उपाय करत होते पण तरीही त्याचे रडणे काही थांबेना. त्याचे काही दुखते आहे का ते पण चेक करून झाले. त्याच्या रडण्याने घराचे सुध्दा सगळेच दवाखान्यात आले . त्या तिघीही अगदीच हतबल झाल्या त्याच्या रडण्यापुढे शेवटचा उपाय म्हणून आणि काय करावे ते न सुचल्याने आजे सासू मग घाबरून जोरजोरात रामरक्षा म्हणायला लागली आणि काय आश्चर्य हे ऐकताच बाळ रडायचे राहिले आणि शांत होऊन रामरक्षा ऐकू लागले.
घरातले सगळे स्तब्ध झाले हे बघून . मग सगळ्यांच्या लक्षात आले की अगदी पहिल्या महिन्यापासून बाळाला हे सारे श्लोक ऐकायची सवय लागलेली आणि आज त्यात खंड पडला , बाळाची डिलिव्हरी संध्याकाळी सातच्या नंतर झालेली त्यामुळे पहिल्या दिवशी काही जाणवले नाही पण आज मात्र बाळाचा दुसरा दिवस होता अन् त्यामुळे बाळ रामरक्षा ऐकायची वेळ होताच रडायला लागले . मात्र आजीने घाबरून राम रक्षा म्हणायला सुरवात केली आणि ते बोल बाळाच्या कानावर पडताच बाळ रडायचे थांबले आणि अगदी काही क्षणात ते शांत झोपून ही गेले .
गर्भात असताना आजीने आईला लावलेल्या सवयी बाळाच्या इतक्या अंगवळणी पडल्या होत्या की त्याची वेळ होताच ते अपेक्षित असणारे ऐकायला बाळ आतुर झाले पण काहीच ऐकायला नाही येत हे बघून त्याने रडण्याचा कार्यक्रम चालू केला .
खरंच किती सुंदर आहेत हे गर्भ संस्कार. काही काही संस्कार हे मुलांच्या बालवयातच मनावर रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी आईने थोडेसे कष्ट घेत काही सवयी अंगिकारल्या की जन्माला येणारी ही नवी पिढी निश्चितच सुसंस्कारी असेल . यात तिळमात्र शंका नसावी ....
