Savita Tupe

Comedy Drama Horror

3  

Savita Tupe

Comedy Drama Horror

भुताचे अस्तित्व

भुताचे अस्तित्व

5 mins
207


 उठायला उशीर झाला त्यामुळे अशोक आज पण गडबडीमध्ये वर्कशॉप वर जायला निघाला .

  स्कूटर जोरात पिटाळत तो दहा मिनिटे उशिराच पोहोचला . गाडी स्टँड वर लावून त्याने ऑफिसमध्ये डोकावले, काका अजून आले नव्हते. त्याला आनंद झाला कारण त्याचा आजचा ओरडा टळला होता . कपडे बदलून सगळ्यांसोबत तो लगेच कालचे अर्धवट सोडलेले काम करायला लागला.

     आज काका जरा उशीराच आले . चेहऱ्यावरून जरा चिडलेले दिसत होते . घरी आज पण काहीतरी झाले असावे असा अशोकने अंदाज लावला . नेहमीप्रमाणेच आज पुन्हा रात्री जास्त वेळ थांबावे लागणार हे त्याला कळून चुकले. नाही म्हणणे त्याला शक्यच नव्हते . काका त्याचे सख्खे मोठे चुलतेच होते .

    काका आणि काकुची बऱ्याचदा भांडणे व्हायची मग काका सगळे कामगार गेल्यावर वर्कशॉप बंद झाले की ऑफिस मध्ये बसून त्यांचा पिण्याचा प्रोग्राम चालू करायचे . 

   काका अशोकला गप्पा मारायला समोर बसायला सांगायचे . तो आपला शांत बसून काकांचे मन मोकळे होईतोवर शांत बसून ऐकत राहायचा.

   काकांना चार मुली आणि एक मुलगा . काकी जरा जास्तच आक्रस्ताळी होती .मुलींच्या नावाखाली काकाकडून पैसे काढून घ्यायची आणि त्याची दुसरीकडेच कुठेतरी विल्हेवाट लागायची . मुलींवर काकाचा खुप जीव . मुलींच्या लग्नाची काकाला नेहमी काळजी लागून राहायची पण काकी मुले काकाला मुलींसाठी काही करता येत नव्हते . काकाकडे दोन ट्रक पण होते . त्यात बाहेर ट्रिपवर गेले की त्याला जरा जास्तच पैसे मिळायचे मग तो ते पैसे काकीच्या नकळत अशोकच्या वडिलांकडे ठेवायला द्यायचा . मुलींसाठी पैसे बाजूला टाकायचे म्हणून आणि काकीच्या कटकटीला वैतागून मग तो स्वतः बऱ्याचदा लांबच्या ट्रीपला माल पोहोचवायला जायचा . तिकडून ६-७ दिवसांनी कधी १५ दिवसांनी यायचा . आल्यावर बरचसं सामान सुध्दा आणायचा . काकी ते सुध्दा कोणाला देवू देत नसायची . घरी आल्याबरोबर काकाकडून सगळं काढून घ्यायची , काका अगदी कंगाल होऊन जायचा . तो राग त्याला काकिवर काढता येत नसायचा मग तो इथे रात्री उशीरा पर्यंत ऑफिसवर पित बसायचा . त्याला काही शुध्द राहत नसायची मग त्याला घरी सोडवायची जबाबदारी आपसूकच अशोक वर यायची .काकाचे पिऊन जोवर मन भरत नाही तोवर अशोक पण तिथेच ताटकळत बसायचा . 

  अशोकने विचार केला तसेच आजपण झाले . सगळे निघून गेले मग काकाने त्याला काहीतरी खायला आणायला सांगितले.ग्लास आणि बाटली अन् सोबत शेंगदाणे , शेव अजून बरंच काही घेवून काकाचा प्रोग्राम सुरु झाला . 

  अशोकला काय काय झाले ते सगळं सांगत एक एक घोट घेत तो मनातली गरळ दारूसोबत पचवू लागला . 

   रात्रीच्या अकरा वाजता काकाचा कार्यक्रम उरकला . अशोकला बाहेर जरा डूलका लागला होता .काकाच्या आवाजाने तो पटकन उठला , त्याने झोपेतच ऑफिस बंद केले आणि गाडी काढून काकाला चला म्हणाला . डोळ्यावर झापड आलेली त्याच धुंदीत अशोक गाडी चालू करून निघाला .

    थंडीचे दिवस त्यामुळे रस्त्यावर जरा सामसूम झालेली . गार वारं लागत होतं त्यामुळे अशोक जरा जोरातच गाडी चालवत होता .

    काकांचे घर आधी यायचे मग त्यांना सोडून तो थोडे पुढे त्याच्या घरी जायचा . काकांचे घर आले तसे त्याने गाडी थांबवली आणि काकाला हात देवून उतरवावे म्हणून तो मागे वळला ....

  अशोकची भीतीने बोबडीच वळली .डोळ्यावरची झोप पण खाडकन उतरली .त्याला एवढ्या थंडीतही दरदरून घाम फुटला . त्याही अवस्थेत त्याला आठवले सकाळीच आई म्हणाली होती की , " आज शनी अमावस्या आहे जाताना नाही तर येताना शनी मंदिरात जावून मारुतीला तेल आणि रुईची माळ घाल ." 

   आज अमावस्या आहे आणि आता जवळजवळ साडेअकरा झाले होते . त्याने काहीच न सुधारून तशीच गाडीला किक मारली आणि घरी जाऊन अंगावर पांघरून घेवून झोपून गेला . झोपेतच जरावेळाने त्याला सटकून ताप भरला . 

   आई बाबा काहीतरी विचारत होते पण याला काही शुद्धच राहिली नाही .....


काय झाले असावे बरं त्याला एवढे घाबरायला ? त्याने नक्की काय पाहिले होते असे त्यामुळे तो इतका हादरला होता ??


   अशोक काकांना हात द्यायला मागे वळला तर त्याने पाहिले की मागे कोणीही नव्हते . चार साडेचार किलो मीटर अंतर पार करून तो आला पण त्याला काका मागे नाही याची जाणीवच झाली नाही .थंडी आणि डोळ्यावरची झोप त्याला इतकी अनावर झालेली की त्याला आता स्वतःलाच आठवेना की तो इथवर कसा आला ? काकांना जरा जास्तच झाली होती त्यादिवशी मग ते रस्त्यात कुठे पडले का तेही त्याला कळेना .कारण त्याला काका पडल्याची काही जाणीव झालीच नव्हती . निघताना काका त्याला धरून गाडीवर बसलेले त्याला आठवत होते .मग काका मध्येच कुठे गायब झाले ?काही कळेना त्याला .....,

दुसऱ्या दिवशी काकी घरी येऊन अशोकला ओरडू लागली .असे का केले ? काकांना किती ताप झाला ......

  अशोक आधीच घाबरला होता त्यात आता काकीला काय उत्तर द्यायचे म्हणून तसाच गप पडून राहिला . काकांचे काही विचारले तर काय सांगू ? तोही विचार करत बसला ..

  अशोकचे आई बाबा आणि काकी बराच वेळ बोलत होते पण अशोक काही उठून बाहेर आला नाही . कानावर काहीतरी शब्द आदळत होते पण ते समजण्याईतपत त्याला कुठे भान उरले होते ???

 दुसऱ्यादिवशी अशोकचा ताप थोडा कमी झाला मग त्याला आई बाबा ओरडायला लागले की असे कसे त्याने काकांना तिथेच सोडले आणि तो एकटाच निघून आला . त्याला लक्षात कसे नाही आले की काका गाडीवर नीट बसले का नाही ते ? काका तर पिले होते मग ह्याला काय न पिताच एवढी चढली की त्याला काकांना घरी आणायचे पण लक्षात आले नाही ????

 त्याचे झाले असे की अशोक अर्धवट झोपेतच होता काकाने हाक मारली तेव्हा . ऑफिस बंद करून तो तसाच गाडीवर बसला आणि काकांना चला म्हणाला . काकांनी गाडीवर बसायचे म्हणून त्याच्या खांद्यावर हात तर ठेवला पण ते दुसरा पाय वर टाकणार तेवढ्यात तिथेच होलपडले ते काही अशोकला कळले नाही आणि काका बसले म्हणून तो जोरात निघाला सुध्दा ...

  काका त्याला मागून हाक मारत होते पण हा पठ्ठ्या काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता ...

मग काय ????

काकांना जास्त झाल्याने तिथेच झोप लागली पडल्या पडल्या ...

पहाटे पहाटे गार लागायला लागले मग काकाला जाग आली . त्याला पण कळेना इथे असा कसा झोपलो ?? मग उठून रिक्षा करून काका घरी आला . 

   काकीला सांगितले मग काकी आली अशोकची खरडपट्टी काढायला पण अशोकला तर अमावस्येच्या भुताने आपले अस्तित्व दाखवले होते त्यामुळे त्याची पाचावर धारण बसली होती .....



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy