STORYMIRROR

Savita Tupe

Abstract

3  

Savita Tupe

Abstract

आयुष्याचा प्रवास

आयुष्याचा प्रवास

3 mins
236

  देवकीला ऑफिस मध्ये पोहोचल्यावर एका तासाभरातच तिच्या भावाचा फोन आला तशी ती गडबडीने लिव्ह टाकून तिथून बाहेर पडली . 

  गाडी सुरू करून ती हॉस्पिटलच्या दिशेने भरधाव गाडी पिटाळत निघाली . मनात असंख्य विचार येत होते . कालच तर भेटून आली होती बाबांना . तेव्हा तर अगदी ठीक होते मग अचानक काय झाले असावे ? 

  दिपकने नीट सांगितले पण नाही फक्त ,

 " बाबांना हॉस्पिटल मध्ये घेवून चाललो आहे तू पण लवकर ये . " एवढेच सांगून फोन ठेवून दिला .

   सकाळी अकराची वेळ , रस्त्यावर भरपूर गर्दी , शाळा कॉलेजला जाणारी मुले , आधीच रस्ता छोटा आणि त्यात चौकाचौकात लागणारे सिग्नल .  

  देविकाला या सगळ्यातून गाडी चालवणं मुश्किल होत होतं . त्यात तिचं सगळं लक्ष बाबांकडे लागलेलं .

     आईला जावून काही महिनेच झाले होते पण बाबांनी मात्र त्यानंतर उभारी धरलीच नाही . आईशिवाय ते स्वतःला अपूर्ण समजत होते . नशिबाने वहिनी खुप चांगली अन् काळजी घेणारी होती .अगदी आईसारखी माया करणारी होती पण बाबांना मात्र आईशिवाय जगणं अशक्य होतं . ते त्यानंतर कसे बसे दिवस काढत होते .

    मागच्या काही दिवसात देविकाला बऱ्याच वेळा त्यांना समजावून सांगायला जावं लागत होतं. त्यांनी खाणं पिणं सोडलं होतं , मग देविका त्यांच्या आवडीचे काहीतरी बनवून न्यायची आणि त्यांना बळजबरीने खायला घालायची . 

  काल सुध्दा त्यांना देविकाच्या हातच्या अळूच्या वड्या आवडत होत्या म्हणून घेवून गेली होती ती आणि त्यांना खायला घालून खुप उशिरा घरी परतली होती . 

   तिला रात्रभर झोप लागली नाही , सारखे अस्वस्थ वाटत होते . झोप नीट न झाल्यामुळे तिला आज ऑफिसला सुट्टी घ्यावी असे वाटत होते पण तरीही ती ऑफिसला आली होती आणि एक दोन तासांनी भावाचा हा फोन .

   विचारात ती सिग्नल लागला आहे ते न बघताच पुढे निघाली आणि बाजूने येणाऱ्या गाडीवर धडकणार तेवढ्यात त्या गाडीवाल्याने थोडे वळून ब्रेक दाबला . गाडी साइडला घेत तो देविकाला अपशब्द बोलू लागला पण देविका ते ऐकायला थांबलीच नाही .

   मनातल्या धावणाऱ्या विचारांमुळे तिची गाडी मात्र म्हणावा तसा वेग घेवू शकत नव्हती , त्यामुळे तिला हा नेहमीचा रस्ता पण अजूनच लांब वाटत होता . 

  बाबांकडे लवकरात लवकर पोहोचण्याच्या नादात ती स्वतः एका अडचणीत सापडली असती .थोड्या वेळापूर्वी काय घडलं असतं या विचाराने ती धास्तावली .

    थोडे पुढे आल्यावर तिने जवळच्या गणपती मंदिराजवळ गाडी घेतली . गाडी साइडला उभी करून ती मंदिरात आली . 

   मंदिरात बाप्पाच्या मूर्तीला डोळे मिटून हात जोडले . डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत , दीर्घ श्वास घेत तिने स्वतःला सावरले . ती तिथेच डोळे मिटून शांत बसून राहिली . 

  तिला जरा मन शांत झाल्यासारखं वाटलं . तिने मनोमन देवाला प्रार्थना केली की , " बाप्पा , आईला तर नेलं . आता जरी बाबांना तिच्याशिवाय जगायची इच्छा नसेल तरी त्यांना सावरण्याचे बळ दे . 

  आमच्यासाठी ते आम्हाला आई एवढेच महत्त्वाचे आहेत .  

  त्यांचा हा जीवनप्रवास आईशिवाय अपूर्ण आहे ,खुप प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर . तिची सोबत त्यांना इथपर्यंतच होती .त्यांचा हा प्रवास कुठवर आहे हे फक्त तुलाच माहीत . 

   आई तर त्यांना अर्ध्यावर सोडून गेली पण 

जन्माला येणारा एक ना एक दिवस जाणारच याची जाणीव बाबांना होवू दे . 

   आयुष्याच्या या वाटेवर कोणाची सोबत कुठवर असावी हे तर विधिलिखित असते . 

   कुणाचे आयुष्य किती आहे हे जाणून घेणे कुठे आपल्या हातात असते ? 

 माझ्या बाबांना जगण्याचं बळ दे , त्यांना सावर . "

   देविका तिथून सरळ हॉस्पिटल मध्ये आली . समोर दीपक आणि वहिनी काळजीत बसल्या होत्या . देविकाला बघून दोघांनाही जरा धीर आला . तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले , " ते आता ठीक आहेत , माईल्ड अटॅक होता . वेळीच इथे आणले म्हणुन बरे झाले , पटकन उपचार करता आले त्यांच्यावर .तरीही पुढे काळजी घ्यावी लागेल .त्यांना कसलाही स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्या ."

  तिघेही त्यांना होकार देतात . देविका विचारते ," आम्ही त्यांना भेटू शकतो का ? "

  डॉक्टर म्हणतात ," जाऊ शकता , पण एक एक जण जा . आणि काही बोलू नका तिथे ."

   तिघांनी देवाला हात जोडले आणि पहिल्यांदा देविका बाबांना भेटायला रूम मध्ये गेली .

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract