STORYMIRROR

Savita Tupe

Others

3  

Savita Tupe

Others

चूक कुणाची ?

चूक कुणाची ?

7 mins
263

   रेश्माला कसं समजावू कळेना ! शेवटी हतबल होवून गिरी स्वतःच शांत बसला . रेश्मा अजूनही जोरजोरात ओरडत होती . तेवढ्यात ओमचा रडण्याचा आवाज आला म्हणून गिरी उठून पाळण्याकडे गेला . साई अजूनही झोपला होता , ओमच्या आवाजाने तोही उठेल म्हणून गिरी त्याला घेवून बाहेर आला . बाहेर काकूंनी लगेच दुधाची बाटली आणून गिरिकडे दिली . ओम दुधाची बाटली तोंडात येताच शांत झाला . काकू हळूच गिरीला म्हणाल्या ," मी आत जाऊन रेश्माशी बोलू का ? "

" ती नाही ऐकणार काकू , बघू ती जरा शांत झाली की मीच समजावतो तिला . "

 दोघे बोलतच होते तेवढ्यात रेश्मा एका हातात साईला अन् एका हातात बॅग घेवून बाहेर आली . गिरीकडे बघत म्हणाली ," मी माझ्या पप्पांकडे चालले आहे . माझ्यामागे येवू नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील . साई माझ्याकडे राहील आणि ओमला तू सांभाळ , मी दोघांनाही नेवू शकते पण तुला जाणीव झाली पाहिजे की स्वतःचे करिअर बघून मुलांना सांभाळणे किती अवघड आहे ते . "

 गिरीश आणि काकू रेश्माचा हा अवतार बघून . एकदम शांतच झाले . त्या दोघांना काही समजायच्या आधीच रेश्मा दरवाजा उघडून बाहेर निघूनही गेली होती .

   गिरीश ओमला काकूंकडे देवून बाहेर पळाला पण तोवर रेश्मा गाडी घेवून निघूनही गेली होती .

 तो दारातच बसू रडू लागला . काकूंनी ओमला पाळण्यात झोपवले आणि त्या गिरीशकडे आल्या . त्याला हाताला धरून उठवत आत आणून सोफ्यावर बसवले , त्याला पाणी प्यायला दिले . 

   काकूंना कळेना त्याच्याशी काय बोलू ? छोट्याश्या भांडणाचे पर्यवसन असे होईल असे कोणालाच वाटले नाही .पण रेश्मा सगळ्यांना एका क्षणात तोडून अशी निघून गेली होती . गिरीने तिला फोन केला पण फोन बंद लागत होता . तो तसाच डोकं धरून अश्रू गाळत बसला . 

   आपण काय चूक केली म्हणून अशी शिक्षा रेश्माने त्याला दिली होती ? त्याला काही कळेना !

 सहा महिन्याच्या ओमला साई इतकीच रेशमाचीही गरज आहे मग असे असताना ओमला एकटे सोडून जाणे कसे शक्य झाले तिला ? 

  रेश्मा आणि गिरीश . दोघांचं लव मॅरेज . रेश्माच्या घरून विरोध होता म्हणून ती घरून पळून आली गिरीशने हतबल होवून तिच्याशी लग्न केले . 

  गिरीशला सगळ्यांच्या संमतीने लग्न करायचे होते .त्याला स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता . त्याला खात्री होती की त्याची परिस्थिती एखाद्या वर्षभरात नक्कीच बदलेल , मगच तो रेश्माच्या वडिलांकडे जावून त्यांची रीतसर परवानगी घेवून मगच लग्न करणार होता .

 कॉलेज संपून त्याला त्याच्या हुषारीवर एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली . घर घेतले होते . त्याचे लवकरच प्रमोशन होणार होते .

  दोन वर्ष एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले गिरीश आणि रेश्मा . पण रेश्माच्या आततायी स्वभावाने गिरिशला जे नको होते तेच तिने त्याच्या समोर आणले .

   गिरीश तिला फक्त सहा महिने थांबण्यासाठी विनवणी करत होता . तो सांगत होता की तो स्वतः घरी येवून बोलेल तिच्या वडिलांशी .पण रेश्मा काही ऐकायला तयार नव्हती . तिच्या लग्नाचे फक्त बोलणे सुरू झाले होते तिच्या घरी .कोणीतरी मुलगा येणार होता तिला बघायला पण काही होण्या आधीच रेश्मा आई वडिलांसोबत स्वतःच्या प्रेमाबद्दल सांगून खुप भांडली . तिच्यामध्ये थोडेही पेशन्स नव्हते . थोडे शांततेने घ्यायचे तर तिने त्यांना काहीही बोलू न देता तिथून घर सोडून निघून आली गिरीश कडे . गिरीशच्या आईने तिला असे अचानक आलेले पाहून गिरीशला फोन करून कळवले . त्यानेही घरी येवून तिची समजूत काढली पण काही उपयोग नाही झाला .

   तो तिच्या आई वडिलांकडे त्यांना सांगायला गेला पण रागाने चिडलेले तिचे वडील त्याला म्हणाले , " तुझ्या मुळे हे सारे घडले आहे . ती ज्या तोऱ्यात घर सोडून गेली आहे ना मग आता ती आम्हाला कायमची मेली असे सांग तिला . परत तिचे तोंड बघायचे नाही आम्हाला ."

  एकुलत्या एक मुलीने स्वतःच्या हेकेखोरपणामुळे स्वतःचे मायेचे पाश तोडून त्यांच्याकडे पुन्हा परतायचे मार्ग बंद करून घेतले .

   आई आणि काही मित्रांच्या सल्ल्याने मग दोघे एकत्र लग्न बंधनात अडकले . रेश्माचा स्वभाव थोडा हट्टी होता .गिरीश तिला वेळोवेळी खुप सांभाळून घ्यायचा . त्या दोघांच्या संसारात म्हातारीची लुडबूड नको म्हणून त्याची आई सुध्दा गावाला निघून गेली होती . 

   गिरीश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत होता . कष्टाळू आणि प्रामाणिकपणा या दोन गुणांनी त्याला यशाच्या उच्चपदावर नेवून ठेवले होते . रेश्माचा पायगुण चांगला आहे तिच्या पावलाने लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न आहे असे सगळ्यांना वाटत होते .

  छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असायच्या पण गिरीश समजुददार पणे सगळं सांभाळून घ्यायचा . 

   रेश्माच्या नकळत त्याने तिच्या आई वडिलांना भेटून त्यांची माफी मागत त्यांच्यासोबत स्वतःचे संबंध सुरळीत करून घेतले होते . त्याचा लाघवी स्वभाव पाहून त्यांचा त्याच्यावरचा राग जास्त दिवस टिकला नाही . गिरीश सारखा योग्य मुलगा आपला जावई आहे याचा त्यांना आता अभिमान वाटत होता . फक्त ते रेश्माला भेटायला येत नव्हते .

  लग्नाला तीन वर्ष होवून गेल्यावर रेश्माने बाळासाठी चान्स घेतला . तीन महिने झाले होते . त्यानंतर करण्यात आलेल्या सोनोग्राफी मध्ये जुळी बाळे आहेत हे कळल्यावर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . तिची खुप काळजी घ्यावी लागणार होती . त्याला आईला बोलवावे असे वाटत होते पण रेश्माला आवडेल की नाही म्हणून त्याने तिला न बोलवता तिच्याच आईला बोलवायचे ठरवले .

  पूर्णवेळ कामासाठी आणि तिच्या देखभालीसाठी दोन बायका कामाला लागल्या तरीही तिच्या आईला त्याने बोलावून घेतले . 

  आईला अचानक बघून रेश्मा आनंदाने रडू लागली . सगळं कसं सुरळीत चालू होतं . 

   रेश्माच्या डिलिव्हरी अगदी जवळ आली होती . आई होतीच सोबत . गिरीश त्याच्या एका प्रोजेक्ट साठी दिल्लीला जाणार होता , रेश्माला हे मान्य नव्हते . तो दोन दिवसात येणार होता तरीही तिने त्याच्यासोबत भांडणे केली . 

   रेश्माच्या आईला कामाचे महत्त्व पटवून देत तो दिल्लीला निघून गेला आणि इकडे रेश्माने घर डोक्यावर घेतले . कशीतरी समजूत घालून तिच्या आईने तिचा राग शांत केला पण ती पहिली चिंगारी तिच्या मनात पेटली होती .त्या चिंगारीने अजून पेट घेतला जेव्हा दोन महिन्याने तिला कळले होते की दिल्लीला गिरीश सोबत त्याच्या ऑफिसमधली प्रांजल पण गेली होती . 

  खरंतर गिरीश खुप लॉयल होता . त्याच्या ऑफिस मध्ये त्याने त्याच्या मर्यादा कधीच क्रॉस केल्या नव्हत्या की त्याच्या पदाचा कोणताही गैर वापर केला नव्हता .तिथले मेल फिमेल असे सगळे एम्पलॉयी त्याच्यासोबत अगदी मनमोकळेपणाने वागत असायचे .पण हे रेश्माला समजत नव्हते . तिच्या मनात संशयाने घर केले होते .

  तिच्या डिलिव्हरी नंतर ती बाळांमध्ये गुंतून गेली होती आणि त्याच वेळेस गिरीशला कंपनीने एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रोजेक्टवर अपॉइंट केले होते . कामाचा प्रेशर आणि त्यात रेश्माचा आततायीपणा त्याला सहन होत नव्हता . 

  गिरीशला जमेल तेवढे तो तिघांसाठी वेळ काढायचा प्रयत्न करत होता . त्याला कळत होते की दोन दोन लहान बाळांना सांभाळताना रेश्माची चिडचीड होते आहे . पण त्याचाही नाईलाज होता . 

 त्याच्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट ही होती की काहीही कारण नसताना त्याच्या बीझी राहण्याचा रेश्मा वेगळा अर्थ लावत होती . तो त्याला सहन होत नव्हता . खूपदा सांगूनही अगदी त्याने त्याचे फोन डिटेल्स सुध्दा तिला काढून दाखवत होता पण तरीही तिला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता . तोही अगदी हतबल झाला होता .

  जेव्हा जेव्हा मुलांसाठी वेळ काढून गिरीश घरी यायचा तेव्हा तेव्हा रेश्मा काहीतरी क्षुल्लक गोष्टीवरून त्रागा करत त्याच्याशी वाद घालायची . 

  तिच्यावरचं संशयाचं भूत कसं उतरवायचं हा मोठा प्रश्न गिरीश पुढे उभा होता .

  त्यात आज रेश्माने अगदी कहरच केला होता . ती गिरीशला म्हणाली की , " तुला बाहेर उंडारायला मोकळं रान मिळावं म्हणूनच तू मला मुलांच्या जबाबदारीमध्ये गुंतवलं आहेस . " 

  गिरीश यावर काय बोलणार होता ? तो अजून वाद वाढायला नको म्हणून नुकत्याच उठलेल्या ओमला घेवून बाहेर येवून बसला होता आणि त्याच्यामागे रेश्मा साईला घेवून हे घर सोडून निघून गेली होती . 

  या पाच महिन्यात किंवा रेश्माच्या गरोदरपणात त्याने त्याची जबाबदारी कधीच टाळली नव्हती . अगदी रात्रीची तो रेश्माला झोप मिळावी म्हणून दोन्ही मुलांना स्वतःजवळ घेवून झोपायचा . त्यांना अधून मधून उठल्यावर दुधाची बाटली भरून घेवून दूध पाजणे , त्यांचे डायपर बदलणे सगळे अगदी आवडीने आणि न कंटाळता करत होता . तरीही रेश्मा मात्र त्याच्यावर हे असले आरोप करून निघून गेली होती . 

  पुढे जावून कदाचित सगळं ठीक होईल ही पण तोपर्यंत ओम् साठी आईची माया कशी मिळवणार होता तो ? 

 साईला घेवून गेली होती पण त्याला बापाचे प्रेम कसे देणार होती ?

  रेश्माच्या स्वभावात आततायीपणा होता , गिरिशने तिला कायम समजून घेतले होते , पण ती मात्र त्याला समजू शकली नाही आणि यात ती मात्र दोन्ही मुलांची ताटातूट करून मोकळी झाली होती . 

  हसत्या खेळत्या घराला नजर लागल्या सारखे झाले होते . 

  खुप विचार करून गिरीशने एक निर्णय घेतला . त्याने रेश्माला वेळ द्यायचे ठरवले . तिला तिच्या चुकीची जाणीव स्वतःहून व्हावी असे त्याला वाटत होते .म्हणून मग त्याने तिला फोन सुध्दा न करण्याचा निश्चय केला . 

   ओम साठी त्याने त्याच्या आईला बोलावून घेतले .सोबतीला काकू होत्याच .

 त्याने तिच्या आईवडिलांना सुध्दा विश्वासात घेवून हे सगळे सांगितले . ते बिचारे मुलीच्या वतीने त्याची माफी मागत होते . आपली मुलगी चुकते आहे याची न बोलता ते तिला जाणीव करून देणार होते . तेही गिरीश सोबत तिला वेळ देण्यास तयार झाले .

  गिरीशला खात्री होती काही दिवस गेल्यावर ती स्वतःहून त्याच्याकडे परत येईल .फक्त तोवर तिची वाट बघायची असे गिरीशने मनातून ठरवले होते.


Rate this content
Log in