Savita Tupe

Abstract

3  

Savita Tupe

Abstract

एकत्र कुटुंब .

एकत्र कुटुंब .

4 mins
260


  रेवा लग्न ठरल्यानंतर आज पहिल्यांदाच सिद्धार्थच्या घरी आली होती . घरातली भरपूर माणसे बघून आधीच तिचा जीव दडपला होता .

 सिद्धार्थच्या घरात त्याचे काका काकी त्यांची दोन मुले . आजी आजोबा , आई वडील , अजून एक लग्न न झालेले चुलत आजोबा . असे एकूण १०-१२ माणसे अगदी गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होती .  

  घर सुध्दा खुप ऐसपैस होते . दोन्ही भावांचा एकत्र बिझिनेस होता . वडील आणि आजोबा गावाकडे असणारी शेती जाऊन येवून करत होते . महिला मंडळ मात्र घरातच होते .

   घराचा कारभार अजूनही आजेसासूच्या हातात होता .पण तिच्या दोन्ही सुनांना तिने कधीही कोणताच सासुरवास केला नव्हता . एकमेकांचा आदर सन्मान जपत सगळे अगदी आनंदाने रहात होते .त्यात आता अजून एक मेंबर वाढणार होता .

  ओळखीच्या मध्यस्थी मार्फत चहा पोह्याचा रीतसर कार्यक्रम होवून रेवा आणि सिध्दार्थचे लग्न ठरले होते . 

  रेवाला सगळ्यांची नीट ओळख व्हावी म्हणून तिला आज जेवायला बोलावले होते .

  रेवा तिच्या मैत्रिणी सोबत आली होती . घरातली एवढी मोठी पलटण आणि त्यांचा चाललेला हास्य विनोदाचा गोंधळ रेवाला सहन होत नव्हता . 

  तिच्या घरी तिचे आई वडील आणि छोटा भाऊ असे चौकोनी कुटुंब राहत होते . 

 आई वडील दोघेही नोकरी करणारे . आईचे आणि तिच्या सासूचे , जावेचे कधी पटलेच नाही . कामाचा जास्त लोड तिच्या आईवर पडायचा म्हणून त्यांनी आपले वेगळे बिऱ्हाड थाटले होते . त्यामुळे रेवाला सुध्दा एकटं एकटं रहायची सवय लागली होती आणि आता इथे एवढ्या माणसांचा वावर बघून तिला वाटत होते की लग्नानंतर आपला इथे निभाव लागेल ना ? 

  किचन मधला तो दहा पंधरा माणसांचा स्वयंपाक कुठे अन् तिच्या घरात बनणारा चार माणसांचा स्वयंपाक कुठे ?? ती तर मनातून तिच्या घरच्या आणि इथल्या घरातल्या कामाची नकळतपणे तुलना करू लागली . 

  हे मला जमणार नाही हा ठाम निर्णय तिच्या मनाशी पक्का झाला आणि तिने लग्नानंतर आपण वेगळे राहू हा निर्णय लग्नाच्या काही दिवस आधीच सिद्धार्थला ऐकवला . त्याला तर धक्काच बसला हे ऐकून आणि तिचे त्यामागचे कारण ऐकून .

  त्याने घरी रेवाचा निर्णय सांगितला , पण कोणीही त्यावरून चिडले नाही . उलट त्यांनी रेवाची मानसिकता समजून घेतली आणि सिद्धार्थला सुध्दा समजावले . 

  तो या गोष्टीला तयार नसतानाही त्याला जवळच दुसरा फ्लॅट घेवून दिला आणि एक निरोप रेवाला द्यायला लावला की लग्न झाल्यावर फक्त महिनाभर एकत्र रहा आणि मग दुसऱ्या फ्लॅट मध्ये शिफ्ट व्हा . तीही या गोष्टीला तयार झाली .

  नियोजनानुसार लग्न पार पडले . पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर ते दोघेही पाच सहा दिवस हनिमूनला जाऊन आले आणि मग त्यांचा संसार सुरू झाला .

  रेवाला या घरातले वातावरण किती मनमोकळे आहे हे कळायला लागले . आजेसासूपासून चुलत सासू पर्यंत सगळ्यांचा एकमेकांबद्दल असणारा आदर अगदी त्यांच्या कामातून सुध्दा तिला दिसत होता . 

  वरच्या सगळ्या कामाला बाई होती . फक्त स्वयंपाक मात्र त्या सगळ्या मिळून , सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत बनवत असायच्या . त्यात अगदी रेवाची आवड सुध्दा जपली जात होती . 

  रेवाला जे कामाचे दडपण आले होते ते या सगळ्यांना एकत्र काम करताना बघून आता मात्र ते टेन्शन तिला जाणवत नव्हते .

  सगळ्या अगदी हसत खेळत किचनमधले काम पटकन उरकून रिकाम्या होवून बाकीच्या गोष्टींची मज्जा पण आनंदाने घेत होत्या .

  रेवाचे लग्न होवून महिना होवून गेला तसे तिच्या आजेसासूने तिला नव्या घरी जाण्याची परवानगी दिली .

 रेवाला खरंतर मनातून वेगळं राहायचा आनंद वाटत नव्हता पण आधीच एकटे राहायची सवय पुन्हा डोके वर काढू लागली तशी मनाशी काही स्वप्न रंगवत ते दोघेही दुसऱ्या फ्लॅट मध्ये शिफ्ट झाले . 

  सिद्धार्थला खुप अवघड झाले होते या सगळ्यांना सोडून जाताना . आजीजवळ जाऊन तर तो रडला . पण आजीने त्याची समजूत घातली आणि त्याला पाठवून दिले .

  नव्या घरात रेवाचा संसार सुरू झाला . दोन तीन दिवस मस्त आरामात गेले तिचे .पण नंतर मात्र सकाळी लवकर उठून सिद्धार्थच्या नाष्ट्यापासून ते त्याचा टिफीन बनवणे , बाकीची कामे करणे या सगळ्यात तिला स्वतःसाठी वेळ मिळेनासा झाला .बाकीच्या कामाला बाई लावली पण स्वयंपाक तुझ्याच हाताचा पाहिजे ही सिद्धार्थची अट आता तिला जाचू लागली .त्यात रोज काय नवीन पदार्थ बनवायचे तिला कळेनासे झाले .

  थोड्याच दिवसात तिचे एकटेपणाचे भूत उतरले . तिला घरच्या एकत्र हसत खेळत रमणाऱ्या सासरच्या माणसांची आठवण येवू लागली . 

   तिला आधी वाटणारे माणसांचे ओझे उतरून तिला तिच्याच एकटेपणाचे ओझे वाटू लागले . 

   शेवटी रेवा तिच्या एकटेपणाला वैतागून पुन्हा आपल्या माणसात परतली .

  घरातले सगळे खुप खुश झाले .त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता .

  रेवाला माणसांची खरी ओळख करून देण्याचा उद्देश साध्य झाला होता . आता तीही खऱ्या अर्थाने या कुटुंबाची मेंबर झाली होती .

  जोर जबरदस्ती करून माणसांवर कोणतेही नाते लादता येत नाही . त्यासाठी त्याला आपल्या कृतीतून त्या माणसांची खरी ओळख करून द्यावी लागते . त्यांच्याप्रती असणारी भावना जाणवून द्यावी लागते तरच ते नाते अजून घट्ट विणले जाते ..


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract