आई
आई


संध्याकाळी बागेत अर्धा तास चकरा मारून मी एका बाकावर बसते थोडावेळ. ह्याच ठराविक बाकावर बसायला आवडतं मला कारण समोरच लहान मुलांची खेळणी आहेत त्यामुळे मुलांची खूप गर्दी असते तिथे. मुलांचे हसरे नाचरे चेहरे पाहून मन आनंदून जाते अगदी .
मी बाकावर टेकले आणि समोरून तन्वी आणि तिला सांभाळायला ठेवलेली तिची ताई सुरेखा येताना दिसल्या. तन्वी माझ्या बिल्डिंगमध्येच राहते. तिची आई आयटीत कामाला आहे. मग घरी तन्वीच्या आजीला मदत म्हणून सुरेखा येते.
तन्वी आणि सुरेखाचे एकदम मस्त जमते. तन्वी खेळत असली तरी दर दहा मिनिटांनी 'ताई' म्हणून येऊन सुरेखाला बिलगते आणि सुरेखाही तन्वीला एक क्षण नजरेआड होऊ देत नाही. चुकून कधी तन्वी पडलीच तर सुरेखाच्या डोळ्यातच पाणी जमा होते. दिवसभर घरीही तन्वीचे खाणे पिणे, रुसवेफुगवे सुरेखा छान सांभाळते.
तन्वीला खेळायला सोडून सुरेखा माझ्याशेजारीच बसली. आज न राहवून मी म्हंटल " अग, किती जीव लावतेस तन्वीला. जणू तुझीच लेक आहे."
"खरंय मावशी, अहो मी हिच्यात माझी लेकच बघते."
"तुझी लेक ?" मी आश्चर्याने विचारले.
"माझी तन्वी येव्हडीच लेक हाय राधा."
"हो? अग मग तू इकडे कामावर आल्यावर कोण बघते तिला?"
"काय सांगू मावशी" असे म्हणून सुरेखा तिची संपूर्ण कहाणीच सांगू लागली.
"आमच्या लग्नापास्नच नवऱ्याला दारूची सवय होती बगा. हळूहळू सवय वाढतच गेली आन राधीच्या जन्मानंतर तर येव्हडी वाढली की घरी पैस द्यायचंच बंद केलं नवऱ्यानं. सारा पगार दारुतच उडवाय लागला.चार चार दिस उपास घडाय लागला बघा.आता माझं काय नाय पन जनम दिलेल्या राधीला तर जगवाय पायजे ना ?
मग मी काम बघाया लागले आन ह्ये काम आलं तन्वीला सांभाळायचं. आता रोज इथं राधीला आनलेल काय म्याडमला आवडलं नसत. घरी बी कुणी नाय तिला बगायला. मग काय ....दिलं पाठवून गावाला आज्जा आज्जीकडं .जाताना लै रडली बगा माजा पदर धरून. सहा महीनं झालं तिला बघून. लै आठवन येते बगा तिची. तिची तशी काय काळजी नाय मला. आज्जा आज्जी छान सांभाळतात. पण भीती वाटते ओ मावशी ....माज्यावर रागवणार तर नाही ना ती मोठेपणी लांब ठिवलं म्हनून ? का मला इसरूनच जाईल ती ?" बोलता बोलता सुरेखाच्या घशात हुंदका दाटून आला.
"अग,असा कशाला विचार करतेस? रक्ताचं नातं आहे तुमचं. अशी कशी विसरेल ती तुला? आणि रागवणारही नाही. मोठी झाल्यावर तुझी मजबुरी समजेल ना तिला." मी तिला दिलासा देत असतानाच 'ताई' म्हणून धावत तन्वी आली.
तन्वीला पाहताच तिला घट्ट मिठीत घेऊन सुरेखा तिचे पटापटा मुके घेऊ लागली. जणू तन्वी नाही तर सहा महिने दुरावलेली तिची लेक राधाचं तिच्या पुढ्यात उभी ठाकलीय .
अलका जतकर