वटपौर्णिमा
वटपौर्णिमा


नवऱ्याच्या अतिसंशयी स्वभावाने बायजाक्का अगदी त्रासून गेली होती. " हा कोण होता ? त्याच्याकडे कशाला पाहिलं ? कुणाकडे बघून हसलीस ?" असा काहीतरी संशय घेऊन बायजाक्काचा नवरा तिला बेदम मारहाण करायचा.
बरं... नवऱ्याला संशयाला कारणच नको म्हणून कुठे बाहेर पडू नये म्हंटल तर नवरा सारखा दारू पिऊन तर्रर्र ... त्यामुळे बायजाक्काला बाहेर पडून पोटासाठी चार घरची कामं करावीच लागत. लोकात मिसळावच लागे .पोटच्या लेकरांना खाऊ तर घालायला हवं.
आपल्याला नको जीव झाला असला तरी भोवतालची जगरहाटी चालूच असते. समाजात राहायचं तर सणवार, कूळधर्म हे व्हायलाच हवेत. ते टाळून कसं चालायचं ?
अशीच आली वटपौर्णिमा. नवऱ्याबद्दल काडीचेही प्रेम नसताना लोककाजेस्तव बायजाक्का घराजवळचा वड पुजून ...नवऱ्याला दीर्घायुष्य मागून आली आणि आला दिवस ढकलत राहिली.
एक दिवस नेहमीप्रमाणे बायजाक्काचा नवरा दारूच्या नशेत वडाच्या पारावर बसला होता आणि अचानक आतून जीर्ण झालेले वडाचे झाड कडकड आवाज करीत कोसळले ते नेमके बायजाक्काच्या नवऱ्याच्या अंगावर. बातमी कळताच बायजाक्का धावली वडाकडे. नवऱ्याचा निष्प्राण देह पाहताच न राहवून वडाला हात जोडले तिने. वडाने तिची खरी प्रार्थना ऐकली होती.