Alka Jatkar

Inspirational

3.4  

Alka Jatkar

Inspirational

श्वेता

श्वेता

1 min
11.9K


श्वेताचे आज कुठल्या कामात लक्षच लागत नव्हते. सकाळीच बाबांचा फोन आला होता... आईला बरे वाटत नाहीये आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेय म्हणून.


एकटे बाबा घर आणि दवाखाना कसे सांभाळणार या विचारात होती श्वेता. तिलाही पटकन उठून बाबांच्या मदतीला जाता येत नव्हते कारण घरात वयस्कर सासरे आणि दहावीची परीक्षा अगदी तोंडावर आलेला मुलगा.


एखादी कामाची बाई शोधायची म्हटलं तरी सात-आठ दिवस जाणार. काय करावं? श्वेताला समजेना. तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. आत्ता कोण असेल असा विचार करतच तिने दार उघडले तर दारात मोठी नणंद शिल्पाताई. 


'आता हिलाही आताच यायचं सुचलं होतं.' असे मनाशी निराशेने म्हणत वरपांगी हसून श्वेता म्हणाली, "अरे, या या शिल्पाताई."


तिला हॉलमध्ये बसवत श्वेताने पाणी आणून दिले आणि म्हणाली, "चहा टाकते हं शिल्पाताई."


यावर तिला थांबवत शिल्पा म्हणाली, "चहा वगैरे काही नको... तू पटकन तुझे आवरून बॅग भर आणि मिळेल त्या गाडीने आधी आईकडे जा. मी सारे पाहते इथले."


श्वेता आश्चर्याने पाहतच राहिली, तेव्हा शिल्पा म्हणाली, "अगं, दादांचा फोन आला सकाळी. तुझी आई आजारी आहे आणि इथल्या जबाबदारीमुळे तू माहेरी जाऊ शकत नाहीयेस म्हणून. त्यांनीच मला काही दिवस येथे येऊन राहायला सांगितलं."


आपल्या मनाचा इतका विचार करणाऱ्या सासऱ्यांकडे श्वेताचे लक्ष जाताच ते म्हणाले, "आवर पोरी. जा आईकडे. मी आजारी पडताच शिल्पाची काय अवस्था होते मी बघतो ना. तसेच तुलाही वाटणारच की गं. जा इथली अजिबात काळजी करू नको." 


डोळ्यातले अश्रू पुसतच श्वेता सासऱ्यांसमोर वाकली आणि लगेच आवरायला लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational