थँक यु सुमेध
थँक यु सुमेध
अन्वी खूप दमून ऑफिसमधून आली आज. पाठ, कंबर चांगलीच ठणकत होती. दर महिन्यात या चार दिवसांच्या त्रासाने ती अगदी कंटाळून गेली होती पण ऑफिसला सुट्टी तर नाही ना घेता येत....
घरी येऊन बेल वाजवणार एवढ्यात तिला आतून सुमेधचा आवाज आला. तो आपल्या मित्रांना म्हणत होता, "अरे, बाहेर जाऊ रे आपण सगळे जेवायला."
"अरे कशाला? घरीच मागवू या ना... मस्त निवांत बसून जेवता येते. गप्पाही ठोकता येतात भरपूर." कोणीतरी म्हणाले.
"आज नको. आज बाहेरच जाऊया. पुन्हा कधीतरी घरी पार्टी. आणि हे फायनल आहे. बस्स." सुमेधने ठामपणे सांगून टाकले.
अन्वीला कुठेतरी हायसे वाटले. घरी जाऊन थोडावेळ शा
ंतपणे पडावे असे वाटतच होते तिला.
दार उघडून अन्वी घरात आली. सगळ्यांना हाय हॅलो करून कॉफी करण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळली. एवढ्यात सुमेध म्हणाला, "थांब. मी करतो कॉफी. तू फ्रेश होऊन ये. सगळेच जण कॉफी घेऊ आणि मग आम्ही जेवायला बाहेर जातोय."
फ्रेश होऊन अन्वी स्वयंपाकघरात आली. सुमेध तिच्यापुढे कॉफीचा मग धरत म्हणाला, "हे बघ... मुगाची खिचडीही लावून ठेवलीय. गरम गरम खाऊन घे आणि मग झोप. मला माहिताय तुला या दिवसात फार कलकलाटही नकोसा वाटतो. म्हणूनच साऱ्या मित्रांना बाहेरच घेऊन जातोय जेवायला."
भरून आलेल्या डोळ्यांनी अन्वी त्याला थँक यू म्हणणार तोच तो मित्रांसाठी कॉफी घेऊन बाहेर गेलाही.