निर्णय
निर्णय
"बाबा, आज ध्रुवच्या शाळेत गॅदरिंग आहे. तुम्ही याल ना बघायला? दोन पास मिळालेत आणि सगळ्या मुलांचे आई-बाबा दोघेही आलेले पाहून, मी एकटीच गेले की हिरमुसला होतो तो." स्वराने आग्रह करत सासऱ्यांना विचारले.
वामनरावांची तब्येत खरी तर फारशी बरी नव्हती. पण स्वराचा आग्रह त्यांना मोडवेना आणि ध्रुवचा हिरमुसला चेहराही डोळ्यासमोर आला.
"येतो..." म्हणत वामनराव तयारीला लागले.
ध्रुवचा डान्स मस्त झाला. डान्स करताना त्याचे डोळे आईला व आजोबांनाच शोधत होते. हे पाहून वामनरावांना गंमत वाटत होती. गॅदरिंग संपले आणि मुले आपापल्या आई-बाबांकडे पळाली. हे पाहताना ध्रुव हिरमुसला होतोय असे वामनरावांना वाटून गेले.
घरी परत आल्यावर ध्रुव जेवून झोपला आणि वामनरावांनी स्वराला हाक मारली.
"काय बाबा?" करत स्वरा लगेचच आली.
"बस इथे. मी इतके दिवस काय सांगतोय याचा विचार केलास का? अशी किती दिवस एकटी राहणार आहेस? तरुण आहेस अजून. आख्खे आयुष्य पडलेय तुझ्यासमोर. ध्रुवचा विचारही कर ना जरा. त्याला नसेल का बाबांची उणीव भासत?" एका दमात वामनरावांनी आपल्या मनातील विचार बोलून दाखवले. अर्थात ही आजची काही पहिली वेळ नव्हती.
वरुणच्या आकस्मित निधनानंतर दोन, तीन महिन्यांतच वामनरावांनी स्वराला हे सुचवले होते.
स्वरा यावर नेहमीप्रमाणे नाही, नाही करत उठून जाऊ लागली. आज मात्र वामनरावांनी सोक्षमोक्ष लावायचाच असे ठरवले होते.
"बस खाली. आज मला तुझे उत्तर हवेच आहे." जरा आवाज वाढवूनच वामनराव म्हणाले.
"नाही बाबा. मी पुन्हा लग्नाचा विचार करणार नाही. आणि ध्रुवला तुम्ही आहात ना बाबा. तुम्हीही तेवढेच लाड करता त्याचे."
"अगं पण, बाबा ते बाबा. आजोबाला नाही सर येत त्याची. आणि मी असा किती दिवस पुरणार आहे तुम्हाला?" स्वराला समजावत वामनराव म्हणाले.
शेवटी नाईलाज होऊन स्वरा म्हणाली, "बाबा आता खरं सांगू का? माझी नोकरी व्यवस्थित आहे. त्यामुळे पैश
ाची काळजी नाहीये. ध्रुवचं सारं नीट करू शकते आणि मी वरुणला शब्द दिलाय की शेवटपर्यंत तुमची नीट काळजी घेईन म्हणून. तेव्हा बाबा प्लीज मला आग्रह नका करू लग्नाचा." असे म्हणत स्वरा निघूनच गेली आतल्या खोलीत.
दुसऱ्या दिवशी थोडेसे डोके दुखत असल्याने स्वरा कामावरून जरा लवकरच परतली. कुलूप उघडून घरात येणार तोच तिला बाबा व त्यांचे मित्र रमेशराव बोलताना ऐकू आले. विषय तिचाच होता म्हणून ती तशीच थबकली. बाबा म्हणत होते, "अरे आता कसे समजाऊ या पोरीला... माझ्यामुळे दुसऱ्या लग्नाला नाही म्हणतेय बघ. मला माहित नाही का रे तिला संसाराची किती आवड आहे ते. तरुण आहे रे अजून आणि पैसे असले की सगळे होते का? बाकीच्या गरजा काही असतात की नाही? मी पाहतो ना कितीतरी वेळ तिच्या बेडरूमचा लाईट चालू असतो किंवा हॉलमध्ये येरझाऱ्या घालत बसते नुसती. मला कळतंय रे तिला वरुणची उणीव खूप जाणवतेय. मी पडलो पुरुषमाणूस... आता हे कसे समजावून सांगू तिला?"
"हं..." रमेशरावांनी नुसताच हुंकार दिला. त्यांनाही काही कळेना यावर काय बोलावं ते.
वामनरावच शांतपणे पुढे बोलू लागले, "माझ्यामुळे जर तिची आडकाठी होत असेल तर आता माझ्यापुढे मरणाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही."
"अरे काहीतरीच काय बोलतोस?" रमेशराव एकदम ओरडलेच.
"काय करू रे मग मी? खूप विचार केलाय यावर. ती मला वृद्धश्रमातही जाऊ देणार नाही की एकटंही राहू देणार नाही. आणि माझं आयुष्य किती आहे कोणास ठावूक? तोपर्यंत तिला अशीच झुरत राहताना पाहू का?"
आता बाहेर स्वराच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती घाईघाईने दार उघडत आत येत म्हणाली, "बाबा, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे पण पुन्हा तुमच्या मरणाचा विषय नाही हं काढायचा."
"नाही गं बाळ. तू सुखी झालीस तर अजून पन्नास वर्षे जगिन बघ..." भरल्या डोळ्यांनी वामनराव म्हणाले.
"आणि आता यावर एक झकास चहा होऊन जाऊ दे."
वातावरण हलके करत हसतच रमेशरावांनी फर्मान सोडले.