Alka Jatkar

Others

3.9  

Alka Jatkar

Others

फणेरी

फणेरी

5 mins
872


"का बरं टाकून दिला असेल हा फिरकीचा तांब्या त्याच्या मालकाने? किती वाडवडिलांचे स्पर्श झाले असतील याला. एखादी आजी, पणजी चिंचमीठ लावून चकचकीत ठेवत असेल याला. कुठे कुठे फिरून आला असेल हा घरच्यांची तहान भागवत? असं कसं कोणी टाकून देऊ शकतं घरातल्या जुन्या वस्तू? आपला अनामोल ठेवा." बकुळा परवाच सरांना कुणीतरी आणून दिलेला फिरकीचा तांब्या योग्य ठिकाणी ठेवताना विचार करत होती.


"बकुळा, हे बघ आज काय मिळालाय जुन्या बाजारात." राजवाडे सर आत येता येता आनंदाने म्हणाले. राजवाडे सर.. हे जुन्या वस्तू गोळा करण्याचा छंद असणारे, इतिहासात रमणारे, मिळालेल्या जुन्या वस्तू नीट निगुतिने जीवापाड जपणारे, आणि बकुळा.. राजवाडे सरांना या कामात मदत करणारी तेवढीच उत्साही मदतनीस.

फिरकीचा तांब्या नीट ठेवून बकुळा मागे वळून पहाते तो सरांच्या हातात एक जुनी सागवानी नक्षीदार पेटी. 

"काय आहे हे?" उत्सुकतेने पुढे होत बकुळाने विचारले. 

"अगं, फणेरपेटी आहे. खूप जुनी दिसतीये. शंभरदीडशे वर्षांपूर्वीची असावी" पेटी निरखून पाहत सर उद्गारले. 

"बघू" असे म्हणत बकुळाने ती पेटी हातात घेतली आणि एकदम हरखूनच गेली. "अगदी तशीच, नव्हे... नव्हे हीच ती." बकुळा मायेने पेटीवरून हात फिरवता फिरवता मनाशीच म्हणाली "माझ्या आजीची फणेरपेटी. स्पर्श ओळखू येतोय ना मला." 

मनाला आवरत "छान आहे" असं म्हणत तिने सरांना पेटी परत केली. तेवढ्यात सरांचा फोन वाजला, आणि पेटी टेबलावर तशीच ठेऊन सर बाहेर गेले.


बकुळाला राहवेना. तिने ती फणेरपेटी परत हातात घेतली. उघडून पेटीचा वरचा भाग काढून ठेवला आणि आतील गुप्त कळ दाबून खालचा चोरकप्पा उघडला. अत्यानंदाने तिच्या डोळ्यात पाणीच आले. आत वाळून कोळ झालेली 'बकुळीची फुले'.


"हे काय आहे?" आईच्या मागून हळूच डोकावून पहाणारी ती छोटुकली म्हणाली. "अगं, ही तुझ्या आजीची फणेर पेटी. खूप जुनी आहे. आजीच्या आजीची. तुझी आजी या आरश्यात बघून वेणीफणी करायची. आतला चोरकप्पा उघडत, आतील बकुळीच्या फुलांवरून हळुवार हात फिरवत आई म्हणाली, "आणि ही बकुळीची फुले. तुझ्या आजीची फार आवडती. ती कायम फुलं ठेवायची या पेटीत. तुझं नाव यावरूनच तर ठेवलंय आजीने 'बकुळा'. तू फार लाडकी ना तिची. दुधावरची साय." आई आजीच्या आठवणीत हरवून गेली, आणि फारसे काही न समजलेली बकुळा खेळायला पळाली.  


जेंव्हा कधी आई ही फणेर पेटी काढून बसे तेंव्हा बकुळाला हसूच येई. "एवढे काय आहे त्या फणेरीत? अशी काय पेटी कुरवाळत बसतेस आई?" 

"फणेरी? काय गोड शब्द आहे गं" आई मायेने बकुळाकडे बघत म्हणाली "तुला नाही आत्ता कळायचं. माझ्या आईची आठवण आहे ही."


जसजशी बकुळा मोठी होऊ लागली तशी आईची फणेरी बद्दलची माया तिला उमजू लागली. पेटीतून आजीचा स्पर्श अनुभवायची आई. आपल्या आयुष्यातील सारी सुखदुःख जणू मूकपणे आजीला सांगत राहायची. आजी देवाघरी गेली पण आपली छान आठवण देऊन गेली लेकीला.


घरात बकुळाच्या लग्नाची धांदल उडाली आणि त्याही गडबडीत आई फणेर पेटी काढून निवांत बसली थोडावेळ. "आजीला सांगायचं असेल ना नातीचं लग्न ठरलेलं." बकुळाला एकदम वाटून गेलं "आपल्याकडेही अशी आठवण हवी आईची काहीतरी. म्हणजे आईपासून दूर राहताना कधीही आई भेटेल त्यातून." 

"आई, मलाही दे ना असं काहीतरी तुझी आठवण म्हणून" बकुळा फणेरी हातात घेत म्हणाली. "अगं, हीच घे ना... माझी आठवण म्हणून. माझा हा अनमोल ठेवा देतेय हो तुझ्या बरोबर नीट सांभाळून ठेव." आई बकुळाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.


"समीरा झाल्यावर तिच्या लग्नात भेट म्हणून द्यायची ठरवलेली होती आपण आपली आठवण म्हणून. हं... आणि शेवटी हरवलीच आपण इतकी जिवाभावाची फणेरी." बकुळाच्या डोळ्यातील एक थेंब तिच्या हातावर पडला अन बकुळा भानावर आली. कैक वर्षांपूर्वी एका भुरट्या चोराने नेमकी हीच पेटी पळवली. बहुदा या पेटीत दागिने असावेत असं वाटलं असावं त्याला. कित्ती कित्ती शोधली आपण ही पेटी त्यावेळी. आज अशी अचानक समोर येतेय. आत काही नाही म्हटल्यावर चोर बाजारात विकली असावी त्याने." बकुळा विचारात हरवली असतानाच एकदम सरांचा आवाज आला. 


"अरे, अजूनही तू पेटी न्याहाळत आहेस का? खूप सुबक आणि छान आहे ना? आता उद्या बारकाईने पाहू आपण ती. काही खास आहे का तिच्यात ते". नुसतीच मान हलवत पेटी बंद करत बकुळाने ती सरांकडे सुपूर्त केली. खरं म्हणजे बकुळाला ती पेटी आजिबात सोडवत नव्हती. पण ती थोडी संकोचली. सरांना कसं सांगायचं ही फणेर पेटी माझी आहे म्हणून? किती कष्टाने एक एक जुन्या वस्तू गोळा करतात ते.  

 

खूप विचार करून बकुळाने ठरवले "पेटी नाही, तर किमान बकुळीची सुकलेली फुले तर काढून घेऊयात आपण आठवण म्हणून." दुसऱ्या दिवशी जरा लवकरच ती कामावर आली आणि पेटी उघडून त्यातील फुले घेणार तोच "तू ही आलीस ना लवकर, फणेर पेटीच्या उत्सुकतेने? अरे... खाली एक कप्पा आहे होय याला? तुला कसा इतका पटकन सापडला?" सरांचा मागून आवाज आला. 


अचानक प्रश्न आल्याने गांगरून जाऊन बकुळा म्हणाली "माझीच आहे ही फणेर पेटी". 

"काय?" आश्चर्यचकित होत सर म्हणाले, आणि फणेरपेटीचा सारा इतिहास त्यांनी बकुळाकडून जाणून घेतला. पेटी कपाटात नीट ठेवत ते म्हणाले "अरे व्वा.. फारच खास चीज आली की आपल्या संग्रहात. 


 डोळ्यात आलेले अश्रू लपवत बकुळा हसून 'हो' म्हणाली. पण नाही म्हंटलं तरी ती थोडी हिरमुसलीच. आपली आहे हि फणेरी हे कळूनही सर काहीच बोलले नाहीत. 'तुला हवीये का परत? असं एकदा विचारायचं तरी.' मनाशी खंतावत बकुळा आपल्या कामाला लागली आणि 'रोज आपल्या नजरेस तरी पडेल आपली पेटी' अशी शेवटी मनाची समजूत घालती झाली.


रोज कामावर आली की बकुळा आधी फणेर पेटी बरोबर दिवसभराचे हितगुज करी आणि मगच बाकीच्या कामाला लागे. 'दुधाची तहान ताकावर' असं म्हणत बकुळा एवढ्यावरही आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. आणि एक दिवस तिच्या नवऱ्याची बदली झाल्याचे तिला समजले. ऐकून एकदम धक्काच बसला बकुळाला. पहिला विचार मनात आला तो फणेरीचा...आता परत नजरेआड जाणार कि काय? कसं राहू मी तिच्याशिवाय? लग्नानंतरची आपली किती तरी गुपित फक्त या फणेरीलाच माहिती आहेत. एकदा विरह सोसलाय...परत शक्य नाही. तेंव्हा आई होती समजवायला. आता ...


"बदली रद्द करून घ्या ना" असा बकुळाने नवऱ्यामागे लकडा लावला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी नवऱ्याला बदलीच्या जागी हजर होण्याचा आदेश आला आणि बिऱ्हाड हलवायचे ठरले. बकुळाला नोकरी पेक्षा तिच्या आवडत्या फणेरीचा सहवास तुटणार याचे दुःख अधिक झाले. 


नोकरीच्या शेवटच्या दिवशी फणेरीवरून मायेने हात फिरवत असताना बकुळाला रडूच कोसळले. किती प्रेमाने आईने दिली होती ही आपल्याला. आपणच वेंधळेपणाने हरवली होती तिची ही भेट...आता परत ताटातूट.


शेवटचे एकदा उराशी कवटाळून जड अंतःकरणाने तिने पेटी खाली ठेवली. दिवसभर आपले काम 'तिच्या जागी नवीन लागलेल्या माणसाला' तिने समजावून सांगितले आणि संध्याकाळी सरांचा निरोप घ्यायला त्यांच्या केबिनमध्ये ती आली. तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत सरांनी एक छोटीशी भेट तिच्या हातात ठेवली. सरांना वाकून नमस्कार करून पुन्हा फणेरपेटीकडे नजरही न टाकता ती ऑफिस मधून बाहेर पडली. घरी पोहोचताच सरांनी दिलेली भेटवस्तू कोपऱ्यात टाकून विषण्णपणे ती सामानाच्या आवाराआवरीला लागली.  


छोट्या समीराने खेळता खेळता कोपऱ्यात पडलेले सरांनी दिलेले गिफ्ट कुतूहलाने उघडले. ती पळतच बकुळाकडे आली "आई, ही बघ काय गम्मत आहे". 

"हं, आता काय? आवरू दे गं मला". चिडचिडत बकुळा म्हणाली. तेवढ्यात लेकीने बकुळाच्या हातात ती वस्तू ठेवली आणि बकुळाचा विश्वासच बसेना. तिची लाडकी फणेरी तिच्या हातात होती आणि वर एक चिट्ठी... 

बकुळा,

तुला माझी आणि आपल्या वस्तूसंग्रहालयाची आठवण म्हणून ही भेट देत आहे. मला कळत होतं तुझा किती जीव आहे या फणेर पेटीवर. पण... माझ्यातला जुन्या वस्तूंचा शौकीन ते कळून न कळाल्यासारखे करत होता. आता तू हे गांव सोडून जाणार म्हणल्यावर मलाच राहावेना. अत्यंत प्रेमाने तुझीच असलेली ही अनामत तुला परत देत आहे. या फणेर पेटीची खरी जागा माझ्या संग्रहालयात नाही, तर तुझ्या जवळ असण्यात आहे. 


राजवाडे सर


फणेरी घट्ट हृदयाशी धरत बकुळा पुटपुटली "आता मी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्यास तयार आहे."


Rate this content
Log in