मातृत्व
मातृत्व
नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारात दोन्हीं मुलांची फारच फरपट होऊ लागली तशी शेवटी तिने मैत्रिणीचा सल्ला मानलाच.
तिसऱ्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला तिने.
डॉक्टरांनीही सारे काही समजावून सांगितले आणि सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी सर्वतोपरी मदत करायची तयारी दर्शविली. तिला बाळ जन्माला येईपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार होते. नवरा व दोन्ही मुले यांना ती महिन्यातून एकदाच भेटू शकणार होती. हे सारे ऐकून तिची चलबिचल झाली खरी पण दोन्ही मुलांच्या प्रेमाखातर ती नऊ महिने त्यांचा व
िरह सहन करण्यास राजी झाली.
सुदृढ बाळासाठी चौरस आहार घेताना,दूध फळे खाताना थोडी दुःखी होई ती. आपली दोन्ही मोठी मुले साधी भाजी भाकरी खात असतील आणि आपण या साऱ्यावर ताव मारतोय हे तिच्या मनाला खात असे. पण शेवटी मुलांसाठीच करतोय ना आपण...हा दिलासा ती स्वतःला देई.
जन्माला येणारे बाळ आपल्या जन्मदात्रीला ओळखणारही नव्हते पण ती मात्र आजन्म त्याची ऋणी राहणार होती. तिच्या उदरातून जन्म देण्याबद्दल 'सरोगसी माता' म्हणून लाखो रुपये मिळणार होते तिला ज्यातून आपला संसार सावरू शकणार होती ती!!!