Alka Jatkar

Tragedy Others

4.0  

Alka Jatkar

Tragedy Others

आतुरता

आतुरता

3 mins
248


फेसबुक उघडून उगीचच स्क्रोल करत बसलेल्या उमाची नजर अचानक 'पीपल यू मे नो' मध्ये निकिता देशपांडे या नावावर पडली. फोटोतला चेहरा पाहत उमा, "अरे वा ! सापडली. " असे जवळजवळ किंचळलीच. शेजारी बसलेल्या नवऱ्याने पेपरमधून डोके उंचावत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

" अरे, माझी बालमैत्रीण निकिता सापडली. किती प्रयत्न करत होते मी तिचा काही थांगपत्ता लागावा म्हणून. आम्ही अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी. पण लग्नानंतर भेटलोच नाही एकमेकींना. नशिबाने तीने तिचा जुना फोटो डिपी म्हणून लावलाय म्हणून ओळखू तरी आली ती. आता करतेच तिला मेसेज म्हणत लगेच उमाने तिला इनबॉक्सला मेसेजही केला. " मी उमा. ओळखलंस का ? तुझी बालमैत्रीण." 


आता कधी बर बघेल निकिता ? असा विचार करत उमा उठली. मुले कॉलेजमधून यायची वेळ झाली होती. काहीतरी खायला करून ठेवायला हवं होत. 


मुले येताच त्यांनाही मोठ्या आनंदाने उमा म्हणाली "निकितामावशी सापडली फेसबुकवर. तिला मेसेज केलाय. कधी एकदा भेटते तिला असं झालय. पुण्यातच असते वाटत तीही." उमा आनंदाने भरभरून बोलत होती निकिताबद्दल आणि मुले हसत म्हणाली " चला. सुटलो बुवा एकदाचे. सारखे निकितामावशीचे पुराण ऐकून कंटाळा आला होता. आता काय ते तिच्याशीच बोलत बस. आम्हाला त्रास देऊ नकोस म्हणजे झाले."यावरही हिरमुसली न होता उमा, निकिताने मेसेज वाचला का हे सारखे पाहण्यात मग्न होती.


उमाला काही आता चैन पडेना. दर दहा मिनिटांनी निकिताने मेसेज वाचला का हे पाहायचा चाळाच लागला तिला. आणि सारखे बालपणीचे विचार. आत्ता मैत्रिणी नाहीत असं नाही आपल्याला पण निकिता ती निकिताच. किती घट्ट मैत्री होती ना आपली ? उठणं,बसणं, खेळणं,अभ्यास, टाईमपास सगळं एकत्र. फक्त जेवायला आणि झोपायलाच काय ते जायचो आपापल्या घरी. माझी सगळी गुपित तिला ठाऊक आणि तिची मला. नुसती निकितात रमली होती उमा.


शेवटी दोन दिवसांनी मेसेज पाहत असताना लाल, नीळा,पिवळा डॉट नाच करताना दिसले आणि एकदम खुश झाली उमा. निकिता रिप्लाय करत होती. मग थोडावेळ अशाच गप्पा झाल्या मेसेंजरवर. उमाला अगदी आत्ताच भेटायचे होते निकिताला. पण निकिताने तिला काही महत्वाची कामे असल्याचे सांगत रविवारी दुपारी पार्कमध्ये भेटू असे सांगितले. थोडी खट्टू होत उमाने होकार भरला.


लगेच उमाने निकिताला खूप आवडतात म्हणून बेसनाचे लाडू करायला घेतले. भरपुर लाडू करून डब्यात भरून उमा रविवार दुपारची आतुरतेने वाट पाहत लागली.


रविवारी भराभर घरचे आवरून दुपारी उमा पार्कमध्ये पोहोचली आणि निकिता समोरून येताना दिसलीच उमाला. वयाला न साजेशी पळत जाऊन तीने निकिताला कडकडून मिठी मारली. आणि उमाला काय बोलू न काय नको असे होऊन गेले. निकिताचा हात हातात घेत ती बोलत राहिली. पंधरा एक मिनिटांनी थोडीशी एक्साईटमेंट कमी झाल्यावर उमाच्या लक्षात आले आपण एकट्याच बडबडतोय आणि निकिता फक्त हो ...नाही अशी उत्तरे देतेय. तरीही फार तिकडे लक्ष न देता उमाने पिशवीतून लाडवाचा डबा काढला. "तुला आवडतात ना बेसनाचे लाडू? म्हणून मुद्दाम करून आणले. घे ना." 

"अरे तुझ्या लक्षात आहे माझी आवड?" म्हणत निकिताने एक छोटा तुकडा काढून घेतला. " मला डायबिटीस आहे ग पण. आणि आमच्या घरात कोणालाही आवडत नाहीत हे बेसनाचे लाडू. तेंव्हा उगीच वाया जातील त्यापेक्षा तु परत घेऊन जा ." असे म्हणत निकिताने डबा उमाला परत केला. आता मात्र उमा नाराज झाली. ज्या उत्साहाने ती बालपणीच्या मैत्रिणीला भेटायला आली होती ती मैत्रीण सापडेचना तिला कोठे.


आता दोघीही अवघडल्या. काय बोलायचे एकमेकींशी ? तेवढ्यात निकिताचा फोन वाजला. नाव वाचून खुश होत तीने फोन घेतला "बोल रमा ? काय म्हणतेस ? एक पाच मिनिटात फोन करशील का परत? जरा एका शाळेतल्या मैत्रिणीला भेटायला आलेय." 


फोन ठेवत त्याच आनंदात निकिता म्हणाली " अग,ही माझी जीम मधली मैत्रीण. इतकी गप्पिष्ट आहे सांगू तुला. आमचा फोन दीडएक तास तरी सहज चालतो बघ. भारी आहे एकदम ती." निकिता बोलतच राहिली तिच्या मैत्रिणीबद्दल. पुन्हा फोन वाजताच घाईघाईने उमाचा निरोप घेत निकिता म्हणाली " बर वाटलं तुला भेटून. कॉन्टॅक्ट मध्ये राहू फेसबुकवर. चल बाय." 


आणि फोन उचलत, " बोल आता निवांत. होती ग एक जुनी शाळेतली मैत्रीण." असे म्हणत निघूनही गेली निकिता.


उमा जड पावलांनी घरी परतली. परतातच मुले म्हणाली " मग, काय खुश ना ? कशी झाली ग्रेट भेट ? काय म्हणतीय निकितामावशी ?"


उमा शांतपणे म्हणाली " ती गेली काळाबरोबर पुढे निघून. मी बसलेय अजून भूतकाळातच तिची मैत्री आठवत."


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy