Alka Jatkar

Tragedy Inspirational Others

3  

Alka Jatkar

Tragedy Inspirational Others

आवर्तन

आवर्तन

9 mins
1.6K


 पायाला ठेच लागली आणि एकदम तोलच गेला. सावरण्याच्या गडबडीत हातातील पिशवी खाली पडून त्यातल्या वस्तू रस्ताभर झाल्या. खाली वाकून वस्तू गोळा करत होते तेवढ्यात... खाडकन थोबाडात बसली. तशी घाबरून समोर पाहिले आणि एकदम बधिरच झाले. पुढची थप्पड चुकवत मी कळवळून सांगू लागले "मारू नको ना मामा. चुकून झाले हे सगळे. पुन्हा नाही होणार". 


मामा आणखीन एक धपाटा घालत म्हणाला "पुन्हा नाही होणार म्हणे ! लाज नाही वाटत? एवढे गहू सांडलेस. तुझ्या बापाचे होते काय? आधीच आमच्यावर बोजा होऊन राहिली आहेस, त्यात असे नुकसान कर. नालायक कुठली."


"अरे मामा, अचानक गाय आली अंगावर, म्हणून घाबरून पाळायला लागले आणि ठेच लागून पडले. माफ कर ना मामा.. माफ कर". 


गहू सांडले होते म्हणून मामा फारच संतापला होता. पुन्हा एक धपाटा घालायला त्याने हात उगारला. सपकन पाठीत धपाटा बसणार म्हणून घाबरून मी डोळे झाकून घेतले, आणि इतक्यात मागून एक भारदस्त आवाज आला. "का मारताय एवढ्याश्या पोरीला? लाज, शरम काही आहे का नाही? केवढासा जीव तो, आणि तिला असली कष्टाची कामं सांगताच कशी?" 


हे ऐकून तर मामा फारच बिथरला. " ओ काका, तुम्हाला काय करायचंय? आमच्या घराचा मामला आहे. आम्ही बघून घेऊ. तुम्ही जा गप घरी."

"कुणाशी बोलतो आहेस तू... माहिती आहे का तुला? मला घरी जायला सांगतो आहेस? गावात राहायचं आहे ना तुला? गावाचा सरपंच देखील अदबीनं बोलतो माझ्याशी. तू तर किस झाड की पत्ती." काकांनी घेतलेला पवित्रा बघून मामा चपापला. घाबरून अजीजीने हात जोडत खालच्या आवाजात म्हणाला " अहो, काय सांगायचं काका तुम्हाला. ही माझ्या बहिणीची पोरगी. एकदम दळभद्री आहे अगदी. लहान असतानाच आईबापाला खाल्लं आणि आता आलीये आमच्या मुळावर बसायला. आमचं आम्हालाच झालं होतं थोडं, त्यात हिची ब्याद. काय करावं तरी काय माणसानं?"

"पण म्हणून असे वागवतात का लेकराला? तुझी स्वतःची मुलगी असती तर असंच मारलं असतंस का तू? एवढी जड झाली असेल तर मी नेतो या मुलीला माझ्या घरी. मी सांभाळीन तिला. मला काही जड नाही एक मुलगी सांभाळणं. माझ्या दोन मुलात ही तिसरी." काकांनी असं म्हणताच मामा खूषच झाला बहुदा.  


"खरंच सांगतो इथं फार हाल होत आहेत हो तिचे. माझं हातावरचं पोट. माझी चार मुलं आणि बायको. बायको तर काय आजारीच असते सारखी. ही लहानपणी खूप लाडात वाढलीये हो. आईबापांनी कधी काही कमी पडू दिलं नाही हिला. हिच्यासाठी दिवस रात्र कष्ट करायचे दोघे. पण एक दिवस कामावरून परत येत असताना एका ट्रकनं उडवलं दोघांना. जीवच गेला बघा त्यांचा. लहान लेकरू... एकटं काय करेल म्हणून घेऊन आलो बघा मी. पण माझ्याच्यानं नीट होत नाहीये हो हिचं. अर्धपोटीच राहतेय बघा रोज. काय करू मी तरी? फार वाईट वाटतं. पण पैशाचं सोंग कुठून आणणार? खरंच घेऊन जाता का तिला? तिचं तरी कल्याण होईल." मामा खोटं खोटं रडत बोलला. 


माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काका म्हणाले "येतेस का ग बाळ माझ्या बरोबर? घरी माई आहे, ती छान सांभाळेल तुला." मी काहीच न कळून मान हलवली. मामानेही आग्रह केला, आणि मी काकांबरोबर त्यांच्या घरी आले. 

"अहो, ऐकलंत का? हे बघा आपल्याकडं कोण आलंय ते?" घरी पोहोचताच काकांनी आवाज दिला. 

"अगंबाई, कोण आहे?" असं म्हणत गोल पातळ नेसलेल्या प्रेमळ चेहेऱ्याच्या एक बाई बाहेर आल्या. मला पाहताच आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या "ही कोण? हिला कशाला घेऊन आलात घरी?"

काका म्हणाले "सांगतो सारं, पण आधी पाणी तर दे हिला प्यायला."  

मला पाणी देत त्या बाई काकांकडे वळून म्हणाल्या "हं, सांगा आता." मग काकांनी सगळी कथा सांगितली. बाई चेहेऱ्यावर नाराजी दर्शवत काकांना म्हणाल्या "कशाला नसती ही जबाबदारी. त्या मामाचा काय भरवसा? कशावरून तो उद्या 'आपणंच हिला फूस लावून हिला पळवून आणली' अशी तक्रार पोलिसात करणार नाही? नकोच ही भानगड. सोडून या हिला परत."

"अहो काळजी करू नका. असं काहीही होणार नाही. आणि झालंच तर मी बघून घेईन सगळं. तुम्हालाही वाटत होतं ना की आपल्यालाही एक मुलगी असावी म्हणून? मग देवाने आता चांगली हिला पाठवलीच आहे तर आपण सांभाळू या हिला. आता मनात काही शंका ठेवू नका." काकांनी असे खूप समजावल्यानंतर बाई थोड्या शांत झाल्या. मग मला नीट निरखित म्हणाल्या " हे बघ बाळ, माझी मुलं मला माई म्हणतात, आणि ह्यांना तात्या. तुही माई, तात्याच म्हण आम्हाला, आणि नाव ग काय तुझं?"

"स्वाती" 

"हं" माईनं मान हलवली आणि पडवीतून घरात वळून बघत ती म्हणाली "सुरेश, रमेश बाहेर या बरं. हे बघा एक छोटीशी मुलगी आलीये आपल्याकडे राहायला. “कुठंय कुठंय?” असे म्हणत दोन दादा बाहेर आले, आणि माझ्याकडे पाहत उंबऱ्यातच उभे राहिले. माई त्या दोघांना जवळ घेत म्हणाली "ही स्वाती. आजपासून आपल्या घरीच राहणार आहे बरं. भांडायचं नाही तिच्याशी”. दोन्ही दादांनी एकसुरात "हो”... असं म्हंटलं तशी मला हसूच फुटलं एकदम. "आता खेळा बरं तिच्याशी. सारं घर दाखवा तिला आपलं."

 "चल" असं म्हणत माझ्या दोन्ही हातांना धरून ते मला आत घेऊन गेले. सारे घर दाखवून त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेलं. 'बापरे ! काय काय गमतीजमती होत्या त्यांच्या खोलीत. पुस्तकं, रंगीत चित्रं, मोराची पिसं, खेळणी, शंख शिंपले, अन काय काय... मी भान हरपून बघतच राहिले.  

"स्वाती, तुला ह्यातलं काय हवं ते घेऊ शकतेस हं." खेळण्यांकडे बोट दाखवत रमेशदादा म्हणाला. सुरेशदादा त्याच्या जवळची चिंच देत मला म्हणाला "आता आम्ही थोड्यावेळ अभ्यास करतो. मग आपण लपाछपी खेळुयात." मला हे दोन्ही दादा खूप आवडले. खेळता खेळता लगेच गट्टीच जमली आमची.  

तो दिवस मजेत गेला. रात्री माईने केलेला मऊ भात, पिठलं खाल्लं आणि आम्ही तिघं तात्यांजवळ गोष्ट ऐकायला बसलो. तात्यांच्या गोष्टीत मी तल्लीन झाले होते, तेवढ्यात माई स्वैपाकघरातील सर्व आवरून अंथरूण टाकत मला म्हणाली "स्वाती, इकडे ये, माझ्या शेजारी झोप." येऊन मी माई जवळ अंथरुणावर झोपले. माई ने दिवा मालवला, तशी मी घाबरले. मला मामाच्या घराची आठवण येऊ लागली. मला झोपच येईना. सारखे मामा मामी आठवू लागले आणि एकदम रडूच फुटले. माई जवळच झोपली होती. मला म्हणाली "काय ग झोप येत नाहीये का?" मी रडत 'नाही' म्हणताच तिने मला तिच्या कुशीत ओढून घेतले आणि हळू हळू माझ्या डोक्यावर थापटायला सुरवात केली. तशी मला माझ्या आईचीच आठवण झाली. अशीच थोपटून निजावयाची ती मला. आईच्या आठवणीतच मी गाढ झोपून गेले. सकाळी उठून पहाते तो माई बाकी सारे आवरून सैपाकाला लागलेली.  

काय मस्त स्वैपाक करते माई. तिची आमटी तर मला फारच आवडली. अगदी माझ्या आईच्या आमटीसारखी चव. माझी आई मला तशी फारशी आठवत नाही, पण तिच्या आमटीची चव... अगदी ओळखीची. आईची आठवण आली आणि परत डोळ्यात पाणीच आलं माझ्या. माईच्या लगेच लक्षात आलं ते.  

 "आता रडत बसायचं नाही हं. मी आईच आहे ना तुझी? तूपगूळ आवडतं का तुला? घे." असं म्हणत माईने माझ्या पानात भरपूर गूळ आणि त्यावर तूप ओतले. मला इतकं छान वाटलं. मामाकडे आल्या पासून मी अशी छान जेवलेच नव्हते. मामी कायम मला उरलेली शिळी भाकरी आणि भाजी द्यायची खायला. गोड तर काहीच नाही द्यायची. मी अशी विचारात हरवलेली असतानाच माईचा आवाज आला "स्वाती डोळे पूस आता. भरल्या ताटावर रडू नये." 

मी डोळे पुसण्यासाठी हात वर उचलला आणि एकदम भानावर आले. भांबावून विचारात पडले. “अरे, हे काय? कुठे आहे मी?" एकदम लक्षात आले की किराणा माल घेऊन घरी परत जाताना आपण ठेच लागून पडलोय. पिशवीतून सांडलेल्या वस्तू गोळा करतोय... आणि आपण उभ्या असलेल्या फुटपाथवर कडेला ज्या चारपाच झोपड्या आहेत, तिथल्या एका सहासात वर्षाच्या मुलीला एका बाईने खाडकन थोबाडीत मारलीये, ती मुलगी कळवळून रडतीये. 

"बापरे ! म्हणजे आपण लहानपणीची थोबाडीत अजून विसरलो नाहीये, समोरचा प्रसंग आपल्याला भूतकाळात घेऊन गेलाय तर'". 

सांडलेला किराणा माल पिशवीत भरताना मनात विचार आले "का मारलं असेल या मुलीला? ती ही माझ्यासारखीच छोट्याश्या चुकीसाठी मार खातेय का? बघावं का जाऊन?" 

विचारी मन मला मागे खेचू लागले. "नको रे बाबा. कसली गुंड लोक राहतात या झोपड्यातून. आपण चांगल्या हेतूने जायचो आणि आपल्याच अंगलट यायचं"

मी पिशवी उचलून चालू पडणार इतक्यात... आणखीन एक मुस्काडीत बसली त्या मुलीच्या गालावर. गाल चोळत ती छोटी जी कळवळली... की मी थबकलेच एकदम. "असा एखाद्या मुलीचा छळ होत असताना दुर्लक्ष करून पुढं जाणं योग्य आहे?" आपल्या लेकीच्या वयाची आहे ही. आजपर्यंत आपल्या लेकीला साधं बोटही कधी लावलं नाहीये आपण." मन परत भूतकाळात गेलं. "मला मार पडत असताना तात्या मध्ये पडले नसते तर? आपल्याला काय करायचय असा विचार करून ते निघून गेले असते तर? माझं काय झालं असतं? आजचे हे सुखी, समाधानी आयुष्य बघायला मिळाले असते? नक्कीच नाही... मामाच्या घरात, त्याचा मार, बोलणी खात तसेच खिचपत पडले असते मी."

त्या छोट्या मुलीला मारा पासून वाचवायचेच असा मनाचा निर्धार होत असतानाच कमकुवत मनाने पुन्हा कच खाल्ली. "तात्यांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. खेड्यात होतो आपण. किती मान होता तात्यांच्या शब्दाला. कुणाची टाप नव्हती तात्यांच्या विरुद्ध बोलण्याची. पण... आपले काय? आपण पडलो मध्यमवर्गीय... त्यात हे शहर आहे. आपल्याला कोण कुत्रं विचारत नाहीये इथे. आपल्यालाच कुणी मुस्काटात लगावली तर कोणी मदतीलाही येणार नाही इथं. जावे आपले सरळ निघून. ती मुलगी आणि तिचं नशीब."

विचारांच्या या द्वंद्वात माई आणि तात्यांच्या संस्कारांचा विजय झाला, आणि आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण... अन्याय होत असेल तर आपण तो थांबवलाच पाहिजे असा विचार पक्का झाला.   

मी लगबगीनं पुढे झाले, मुलीला मारणारा त्या बाईचा हात वरच्यावर पकडत मी ओरडले "ओ बाई, का मारताय एवढ्याश्या लेकराला?"

"ओ, कोन तुम्ही? जा की गप गुमान आपल्या वाटंन. तुमाला काय करायच्या हायती नसत्या पंचायती? आमचं आमी बघून घिवू. हात सोडा अन जा आपल्या घरला." त्या बाईच्या पवित्र्यानं क्षणभर मी घाबरले आणि दोन पावलं मागं सरकले. पण तात्या डोळ्यासमोर आले आणि धिटाईनं उभी रहात मी गरजले "जास्त शहाणपणा करू नको. बाल अत्याचाराविरुद्ध पोलिसात तक्रार करेन मी". 

पोलिसांचं नाव ऐकताच एकदम वरमली ती बाई. "ताई जाऊ द्या ना, घरचा मामला हाय. आता सकाळधरनं लायनीत हुबं ऱ्हाऊन भरलेलं समदं पानी सांडलं हिनं म्हून रागात जरा हात उचलला गेला बगा. आता परत नाय मारायची तिला, जा तुमी."  

 "पण इतक्या जोरात मारतात का? कुठं जिव्हारी बसलं असतं म्हणजे? खरं सांग काय कारण आहे ते?" ती घाबरतीये म्हणल्यावर मलाही आता जरा चेव चढला. 

मी मागे हटतच नाही म्हणल्यावर ती बाई एकदम रडायलाच लागली. "ताई, चूक झाली. पाया पडते. पण म्या तरी काय करू वं? मला काय सुदरनाच झालंया बगा. ही माज्या सवतीची पोर हाय. हिची आय मेल्यावर हिच्या बानं माज्याशी लगीन केलं, अन आता मी आट महिन्याची पोटुशी हाय, तर नवरा दोन महीनं झालं कुटं उलथलाय बगा.. आताशा मला बी काम होत नाय वं. सारं आंग जड झालंया बगा. चार दिस झालं आमच्या दोगीच्या बी पोटात अन्नाचा कण सुदिक नाय. नवऱ्याचा सारा राग या लहान लेकरावर निगतो बगा". थोडी शांत होत ती पुढं बोलू लागली "कुटं जावं, काय करावं कायबी कळंना झालंया. माजा बा मला म्हायेराला न्यायला तयार हाय, पन हिची ब्याद नको म्हणतुया. आता हिला कुटं सोडू म्या?"

आमची बोलाचाली ऐकून शेजारपाजारच्या झोपड्यात रहाणारी माणसं जमा झाली होती. बाईच्या बोलण्याला दुजोरा देत शेजारची एक म्हातारी म्हणाली "खरंच ओ ताई, लई बेक्कार हालत हाये बगा दोगीची." 

सारं ऐकून मी सुन्न झाले. मला काय बोलावं तेच समजेना. शंभर दोनशे देऊन तिथून निघून जायचा मी विचार केला. पर्स मधून पैसे काढून त्या बाईच्या हातावर टेकवले आणि पाऊल पुढे टाकले तर लक्षात आलं की आपला ड्रेस मागून कुणीतरी ओढतंय. मागे वळून बघते तर .. ती छोटी माझा ड्रेस घट्ट धरून उभी. बहुदा ‘ही आपल्याला आईच्या मारापासून वाचवेल’ असे तिला वाटले असणार. मला गलबलून आलं एकदम. "अरे, आत्ता आपण ह्या छोटीला आपल्या घरी नेलं तर? कुठेतरी चांगली सोय लावू हिची. छोटीला नेलं तर बाईही मोकळी माहेरी जायला.”

सारा विचार करून मी त्या बाईला विचारले "मी हिला घेऊन जाऊ का माझ्या घरी? एखाद्या अनाथाश्रमात चांगली सोय लावते हिची. पण नंतर कसलीही कटकट नकोय हं. नाहीतर माझ्या विरुद्ध तूच तक्रार करायचीस." तशी हात जोडत ती बाई म्हणाली "नाई ओ ताई. मी कशाला तक्रार करतिया? अजाबात काळजी करू नगा. हिचं बी भलंच व्हावं वाटतंय ओ मला. हिला नेलंत तर लई उपकार होतील बगा."

मी छोटीकडे वळत तिचं नाव विचारलं. 

"वैशू" छोटीनं लाजत लाजत उत्तर दिलं. 

"वैशू, येशील का माझ्याबरोबर, माझ्या घरी? मी छान खाऊ देईन तुला, खेळायला ताई दादा देखील आहेत तिथं." काही न समजून वैशूने आईकडं पाहिलं. 

"जा वैशू बाळा. छान खायला भेटल, भारी कापडं भेटतील तुला तितं.जा, नाय म्हणू नगं." तशी माझा हात पकडत वैशू छान हसली. तिचे ते गोड हसणे पाहून इतका वेळ बेताबेताने मदत करायचे ठरवणारी मी एकदम वैशूच्या प्रेमातच पडले. 

"आपल्या घरीच ठेवू हिला" मी मनाशी निश्चय केला आणि वैशूला घेऊन घरी आले. नवऱ्याला सारी हकीकत सांगताच "काही लफडं नाही ना होणार?' अशी रास्त शंका त्याने बोलून दाखवली.

"नाही होणार. काळजी करू नको. काही झालंच तर बघू काय करायचं ते." मी नवऱ्याला आश्वस्त करत म्हंटलं. 

वैशूला हात पाय धुवायला लावले. लेकीचा एक छानसा फ्रॉक तिला घालायला दिला. आधी दूध,बिस्किटे दिली तिला खायला आणि मग गोडाचा शिरा करायला घेतला तिच्यासाठी. 

शिरा करता करता तात्यांना हे सारं कळवावं म्हणून फोन लावला. मी सारी हकीकत सांगताच तात्या खुश होऊन म्हणाले "छान ! एक आवर्तन पूर्ण झालं. आता माझी खरी लेक शोभालीस तू."

तात्यांनी असं म्हणताच मला खूप भरून आलं. माई, तात्यांच्या शिकवणुकीतलं थोडंफार तरी आपण घेऊ शकलो, याचा आनंद झाला. मी या आनंदातच तात्यांना म्हणाले "तात्या, आशीर्वाद द्या मला. तुम्ही आणि माईने ज्या प्रेमाने मला वाढवलंत तसंच वैशूलाही मला वाढवता येईल म्हणून... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy