ओढ सृजनाची
ओढ सृजनाची
घरातली सारी कामे एकदाची आटोपली की शिल्पा बाहेर झोपाळ्यावर येऊन निवांत बसत असे. तिने व अमोघने एक सुंदरशी बाग तयार केली होती बंगल्याभोवती. त्या बागेतली झाडे, फुले, त्यावर बागडणारी फुलपाखरे, पक्ष्यांचा किलबिलाट याने तिचे मन शांत होत असे. मनाची घालमेल थोडी कमी होत असे.
आजही ती अशीच बसली येऊन झोपाळ्यावर. सहजच तिचे लक्ष गेले 'अरे, आज या बुलबुल जोडीची लगबग का वाढलीय एवढी?' शिल्पा बारकाईने पाहू लागली आणि तिला दिसलं की कुंडीतल्या एका छोट्याशा झाडावर घरटं बांधताहेत दोघे. ती कुतूहलाने बुलबुल जोडीची गडबड न्याहाळत राहिली. एक एक काडी जमवत मनासारखं घरटं बांधत होती ती दोघे.
शिल्पाला एकदम तिची आणि अमोघची धांदल आठवली त्यांचा बंगला बांधतानाची. हे असंच हवं, असं नको करत किती निगुतीने बांधला होता बंगला दोघांनी. प्रत्येक गोष्ट दोघांच्या मनासारखी कशी होईल याचा विचार करून. 'हा झोपाळा मला हवाच होता इथे.' झोपाळ्यावरून हात फिरवता फिरवता ती गतकाळात रममाण झाली आणि नकळत हसू उमटले तिच्या चेहऱ्यावर.
संध्याकाळी अमोघ घरी आल्या आल्या तिने उत्साहाने बुलबुल पक्ष्याच्या घरट्याची बातमी दिली. शिल्पाच्या या निरागस आनंदाकडे पाहतच राहिला तो. कितीतरी महिन्यांनी शिल्पाच्या चेहऱ्यावर इतका आनंद पसरला होता.
चार दिवसात घरटं बांधून पूर्ण झालं. रोज सुरक्षित अंतरावरून शिल्पाचे निरीक्षण सुरु असे आणि अमोघ आला की त्याला इत्यंभूत बातमी दिली जाई घरट्याची.
शिल्पाला आता उत्सुकता लागली होती की कधी मादी घरट्यात अंडे घालते याची. एक दिवस सकाळी ही गोड बातमी कळली आणि शिल्पाच इतकी खुश झाली की बस.
त्या बुलबुल जोडीची आळीपाळीने घरट्यातील अंड्याची घेतलेली काळजी, काही संकट जाणवताच एकाने दुसऱ्याला आवाजाने केलेला इशारा. हे सारे पाहताना शिल्पा अगदी गुंगून गेली होती.
अचानक जोराचा किलबिलाट झाला आणि काय होतंय हे शिल्पाला कळण्याच्या आतच एका कोकिळेने अंडे पळवून नेले की घरट्यातून.
बुलबुल जोडी धावली कोकिळेमागे पण....
बुलबुल जोडीचा केविलवाणा आवाज ऐकवेना शिल्पाला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. ती उदासपणे तशीच बसून राहिली झोपाळ्यावर.
रात्री अमोघ आल्यावर रडत रडतच ती खिन्नपणे म्हणाली, "त्यांचे पिल्लू गेले रे जगात येण्याआधीच."
अमोघ तिला शांत करत म्हणाला, "अगं, निसर्गनियम आहे हा. असं व्हायचंच कधीतरी."
रडता रडताच कधीतरी अमोघच्या कुशीत तिला झोप लागली.
खिन्न मनानेच शिल्पा सकाळी उठून घरचे काम उरकू लागली. तेवढ्यात तिला बुलबुल जोडीचा परत आवाज आला. "आता काय करताहेत हे दोघे?" असे मनाशीच म्हणत ती बागेत आली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. पुन्हा उत्साहात होती जोडी आणि घरट्यात एक अंडे.
ते पाहून आनंदाने एक उडीच मारली शिल्पाने. "आता मात्र हे अंडे कुणालाही पळवू द्यायचे नाही. राखणच करायची आपण चोवीस तास." असे मनाशी ठरवत एक लांब काठी घेऊन त्या जोडीबरोबर तीही रक्षण करू लागली घरट्यातील अंड्याचे.
शिल्पा पहाटे लवकर उठून, सारी कामे पटापटा आवरून बागेत येऊन बसे घरट्यावर लक्ष ठेवण्याकरता. तिच्या सुदैवाने हे अंडे वाचले बाकीच्या पक्ष्यांपासून. छान उबवले गेले आणि एका सकाळी बारीकसा नाजूक आवाज आला घरट्यातून.
शिल्पा खूपच आनंदून गेली. धावत जाऊन तिने ही बातमी देण्याकरता अगदी ऑफिसमध्ये फोन केला अमोघला.
हळूहळू पिल्लू मोठे होत होते. बुलबुल जोडी कुठून कुठून खायला आणून पिल्लाला भरवत होती. पिल्लू हळूहळू घरट्याबाहेर यायला शिकत होते, उडायला शिकत होते. शिल्पाला हे सारे पाहायला मजा येत होती आणि एके दिवशी पंख पसरून उडून गेले पिल्लू आणि त्या पाठोपाठ ती बुलबुल जोडीही.
शिल्पा पिल्लू मोठे झाले या आनंदात आणि घरटे रिकामे झाले या कासाविशीत तशीच बसून राहिली खूप वेळ अमोघची वाट बघत.
अमोघ घरी येताच त्याच्या कुशीत शिरत शिल्पा हळूच म्हणाली, "आपण परत एक चान्स घेऊयात का रे?"
अमोघ आश्यर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. तीन वर्षांपूर्वी दुर्दैवाने शिल्पाचा गर्भपात झाला होता आणि नंतर सगळ्यांनी खूप समजावून सांगूनही शिल्पा पुन्हा चान्स घ्यायला तयारच होत नव्हती. "माझ्या नशिबातच नाहीये मूल. कशाला परत परत विषाची परीक्षा घ्यायची." हेच डोक्यात घेऊन बसली होती ती.
आज नकळत एका बुलबुल जोडीने तिच्या आशा पल्लवित केल्या होत्या. एकदा अपयशी ठरलो तरी पुन्हा प्रयत्न करायचा. निराश न होता हे तिला उमगले होते.
अमोघने आत्यंतिक आनंदाने होकार भरत तिला गच्च मिठीत घेतले.