आभाळाचा पाऊस
आभाळाचा पाऊस


आभाळ कुठे कधी काही बोलतं!
आपल्या सगळ्या मनांचे धुमसणारे आवाज मात्र त्याच्याकडे नक्की पोहोचत असावेत. उगाच का ते हुंकार देतं? उगाच का ते भरून येतं? सगळे झंझावात सहन करतं, मन आवरून धरायचा प्रयत्न, शेवटी मात्र असफल होतोच...
कळा अशा असह्य होतात, की त्यांना वाट करून दिल्याशिवाय श्वासही घेववत नाही...
ओतून देतो मग तो सगळं. कडेलोट करतो साऱ्या जळमटलेल्या आशांचा, आसक्तींचा. ओरबाडून काढतो उरले-सुरले गर्वाचे, स्वाभिमानाचे मुखवटे; पाणी सोडून देतो माझ्या-तुझ्यावर...
आणि फक्त बघत राहतो, ते सारं मातीत मिसळताना...
त्रयस्थपणे.
मग सगळं कसं शांत... शांत... होऊन जातं... निःशब्द!
अगदी त्याच्या मूळ स्वभावासारखं! मग बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, वाटण्यासारखंही काहीच उरत नाही.
शांतपणे, ते स्वच्छ आभाळ, तरीही आपल्या सोबत चालतंय, आपल्याला नखशिखांत व्यापून आहे, असंही उगाच, आपल्यालाच वाटत राहातं...