आई तुज्या-शाक्का बाऊ
आई तुज्या-शाक्का बाऊ


माझ्या लहानपणी मला आईच्या हातावर भाजल्याचा डाग दिसला, की फार नवल वाटायचं. तिच्या गोऱ्यापान हातावर मध्येच कुठेतरी भाजल्यानंतर तो गुलाबी-जांभळट दिसणारा चट्टा पाहिला की हमखास तो न्याहाळत तिला विचारत असे, “आई तुला हे कसं लागलं गं?” मग तिने सांगितलेला action sequence बरेच दिवस माझ्या डोक्यात चित्रीत होत असे. ते ऐकून वाईटही वाटायचं, की आपली आई कित्ती मेहेनत करते!
पुढे मोठी होताहोता ज्या ज्या बाईच्या हातावर तसा भाजल्याचा डाग दिसे, ती प्रत्येक बाई माझ्यालेखी ‘अतीशय मेहेनती/कामसू’ ठरत असे.
लग्नानंतर पहिल्यांदाच (स्वयंपाक खऱ्या अर्थाने लग्नानंतरच!) जेव्हा माझ्या हाताला तस्साच भाजल्याचा चट्टा आला...तेव्हा पहिल्याने ओरडून “आ##ह” आणि मग आनंदाने “आ~~ह” निघालं! मी लग्गेच आईला फोन करून सांगितलं, की ‘आई मला अग्गदी तुझ्झ्यासारखं भाजलंय बघ!’ तेंव्हापासून (उगाच) माझ्यालेखी मी आदर्श, कामसू गृहिणी होऊ लागले होते. तो गुलाबीसर डाग बरा होऊ लागला, त्याचं कित्ती वाईट वाटलेलं मला!
काल मी स्वयंपाक करत असताना माझ्या छोट्या लेकीने ओट्यापाशीच बसून बघण्याचा हट्ट धरला. खूप समजावून नको गं, म्हटलं, तर आगाऊ स्वतःच ओट्यावर चढून बसली. “आई, माज्याशाटी काय कलतेश् तू?” असं लाडीक विचारत जवळच्या पातेल्याकडे बोट दाखवलं, तेच..चुकून लागलंच! भाजलंच तिला! हातातलं सगळं टाकून काळजीने, तरी रागवतच मी तिला उचलून घेतलं. “बाहेर जाऊन का नाही खेळत तू पिल्लू? काय सारखं इथे बघायचं असतं तुला?! झाला न आता बाऊ?” तशी भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत माझी पिल्लू म्हणते कशी, “आई, मला तुज्याशाक्काच बाऊ झाला बघ!!!”