तिच्या सुंदर केसांची गोष्ट
तिच्या सुंदर केसांची गोष्ट
अगदी लहानपणापासूनच तिचं तिच्या भूऱ्या, दाट, बऱ्यापैकी लांब म्हणता येईल अशा, कुरळ्या फुलोऱ्या केसांवर खूप खूप प्रेम होतं. सुट्टीच्या दिवशी तिची आई अंगणातल्या जुईची गच्च वेणी बनवून तिच्या केसांत माळून देई. वेण्यांचे तर कित्ती प्रकार ती करायची! तिची मालू आत्या आली, की आत्या-भाचीची जोडी हिच्या केस-शृंगारात रमून जायची. मोठी होता होता, तरी तिच्या वयाच्या मुलींच्या बरंच आधी ती आपले एवढे लांब केस विंचरायला, त्यांची निगा राखायला शिकली. ती दुसरं काही करत नसेल, तर हमखास तिचा आवडता जाड दातांचा, लाकडी कंगवा घेऊन आरशासमोर सापडायची! पुढे असेच केस आवरताना ती स्वप्नं रंगवू लागली.. तिच्या केसांत तिच्यासारखंच हरवून जाणाऱ्या प्रियकराची. त्या कंगव्याचे दात, म्हणजे जणू त्याचीच लांबसडक बोटं.. ती हळूवार तिच्या केसांतून फिरत फिरत अलगद तिच्या गालावर, गालावरुन तिच्या केसांसारख्याच गडद भूऱ्या डोळ्यांखालून फिरतील.. त्याची बोटं पापण्यांच्या कडांशी रेंगाळतील.. डोळे मात्र तिच्यासोबत खोल खोल त्या स्वप्न प्रवाहात पोहत राहातील.. आणि तेवढयात एखादी जट सापडून कंगवा हातातून निसटून दूर उडून पडायचा. आपलंच स्वप्नरंजन आठवून तिला खळखळून हसू यायचं..
आज लग्नाच्या कित्येक वर्षांपानंतरसुद्धा ती तशीच आरशासमोर बसून तिचे केस सावरते आहे. हाताची गती अगदी तीच.. डोळे मात्र अगदी निराश..मधूनच पाण्याचे थेंब टपटप सांडत होते.. तिला आठवतंय कालचं कडाक्याचं भांडण! लग्नापासून ए
क प्रश्न तिला कायम भेडसावत असे..की ‘तो माझ्याकडे कधीच नीटसं बघत का नाही? केसांच्या बाबतीतलं माझं स्वप्न सोडाच, पण आजवर चुकूनसुद्धा तो माझ्या केसांना कधीच हातसुद्धा का लावत नाही!’ ह्याचं नेहेमीच तिला अपार दुःख होत असे. पण आपलं स्वप्न आपल्या प्रिय नवऱ्यावर लादावं हे तिला पटत नसे, त्यामुळे तिने तसं काही त्याला कधीच खुणावूनसुद्धा दाखवलं नाही.
काल मात्र एकदाचा सारा बांध फुटला. बाहेर कुठेतरी जाण्यासाठी गडबडीने आवरत होती ती. तरीही बराच उशीर झालेला होता. त्यामुळे तोही खूप चिडला, आणि शेवटी बोलून गेला, की “मला हे तुझे कुरळे केस मुळ्ळीच आवडत नाहीत! बघण्याच्या वेळेस बांधलेले असल्यामुळे तेव्हा मला लक्षात आलं नाही, नाहीतर आधीच नकार दिला असता! आता मात्र तो विखुरलेला डोक्यावरचा पसारा माझ्याच्याने मुळीच बघवत नाही! त्याच्यामुळे एव्हढा उशीर होतो तुला नेहेमी ते वेगळंच! तुझा हा असा चेहेरा मी कसा सहन करतो, ते माझं मलाच ठाऊक!” …आणि तिच्या काळजाचे ठोकेच चुकले! तिचं स्वतःच्या सौन्दर्यावरचं, स्वतःच्या परमप्रीय केसांवरचं प्रेम पार अर्थहीन वाटू लागलं तिला.. असं वाटलं एक कात्री घ्यावी, आणि कचाकच कचाकच… तेवढ्यात जटांमध्ये अडकून, तिच्या हातून कंगवा निसटून दूर उडून पडला.. ती शांतपणे कंगवा उचलायला उठली, आणि काही सेकंद कंगव्याकडे बघतच स्तब्ध बसून राहिली.. काही वेळाने तिने कंगवा उचलला, रागाने तोडण्यासाठी आपट आपट आपटला, आणि खूप खूप दूर, दूर फेकून दिला.