आई-पप्पांसोबत पहिलं ड्राइविंग
आई-पप्पांसोबत पहिलं ड्राइविंग
कित्ती महिन्यांनी आई-पप्पा रहायला आलेत माझ्याकडे! यावेळी मी त्यांना गाडीतून फिरवणारे. म्हणजे दरवेळी हे ड्रायव्हरला पाठवतात सोबत, पण यावेळी मीच नको म्हणून सांगितलं. आईचं चालूच आहे कधीपासून, “कश्शाला तुला नसते सोस बाई? घेऊयात की ड्रायव्हर.. नाहीतर तुझ्या पप्पांना तर चालवू देत.” पण मी तिचं एक मुळी ऐकून घेणार नव्हते. तसं मी निघताना पाहिलं हळूच पप्पांकडे. आईच्या हो-नाही मुळे थोडी चिंतेत होते मी, तोच पप्पांनी आईची नजर चुकवत मला हळूच डोळे मिचकावले! बस्स्! अजुन कोणतंच पाठबळ नको होतं आता मला.
पार्कींगमध्ये जाईतोवर हायस्कूलमधले दिवस आठवले. नव्यानेच नी उशीराच मी सायकल शिकायची ठरवली होती. तेव्हासुद्धा पप्पा अस्सेच माझ्यापाठीशी होते. आई माझी थोडी घाबरून असायची पहिल्यापासूनच. म्हणायची, “पोरीची जात बाई, उद्या कुठं काय झालं म्हणजे..नको नको ते काही..सायकल नाही शिकली म्हणून काही कमी पडत नाही. का हो?” त्यावेळी मी आणि पप्पा त्यांची सायकल घेऊन भाजी आणायला म्हणून ज
ायचो. एखादी भाजी घेऊन मग घर जवळ येईपर्यंत ते मला सायकल घेऊ द्यायचे, नी स्वतः मागून पळत यायचे.
कारचे आरसे नीट करताना मागे सरसावून बसलेली आई, आणि पाणी भरल्या पण चमकणाऱ्या डोळ्यांनी ऐटीत बसलेले पप्पा बघताना मला काळजात धडधडू लागलं. तेच दिवस बरे होते खरं तर. म्हणजे आज स्वतःच्या गाडी चालवण्यावर शंका नाहीये, पण ह्यांना सुरक्षित परत घरी आणण्याची जबाबदारी आज माझी आहे. तेंव्हा माझं काहीही झालं तरी निभावून न्यायला माझे पप्पा होते. आज तशी सैर त्यांना मी करवून आणायची आहे.
मुद्दाम थोडं लांबच्या रस्त्यानं घेतली मी गाडी. भाजी, फळं घेतली. देवाच्या दर्शनाला गेलो, समोरच्या बागेत थोडं बसलो, ऊसाचा रस प्यायलो, नी परत यायला निघालो. आता आई मागे बसली होती. घराजवळ पोचलो, तोच पप्पांचा हात धरून म्हणाली, “मूळचं शिक्षण एकदम परफेक्ट झालंय बघा. आता उद्या तुमची पोर विमानसुद्धा चालवेल!”
मी आणि पप्पा चमकून एकमेकांकडे बघू लागलो.. ‘आमचं सिक्रेट हिला कसं कळलं बुवा!!?’