एका आईची मानसिकता..
एका आईची मानसिकता..


..ह्यांच्या विक्षिप्तपणाची न, हद्दच पार झालीये मुळी! एक गोष्ट नीट ऐकून घेतील म्हणून नाही, की कुणाशी धड बोलतील म्हणून नाही! कसं काय वागायचं ह्या माणसाशी.. अन् जाऊ दे वय झालंय, समजून सोडून तरी किती द्यायचं? आता बघा, शेजाऱ्यांची सून, मुलगा, वेळेत घरी येत नाहीत, त्याचा ह्यांना काय बरं जाच? ते घरी येईपर्यंत ह्यांची बडबड नी फेऱ्या सुरू व्हरांड्यात! मी आहे आक्खी समोर, ती माझी काळजी करावं म्हटलं जरा.. एक चहा दिवसभरातून सोबत घेतील तर शपथ! सारखं लक्ष एकतर पेपरात, टीव्हीत, नाहीतर जळल्या त्या मोबाईलमधे! इकडून तिकडे मेसेजेस पाठवत राहायचं एकसारखे.. कसल्या कसल्या निसर्गोपचारांचे, कुठल्या तरी बाबा महाराजांचे, नाही तर ह्यांच्या आवडत्या पार्टीचे! प्रचाराला जाताना सोबत ह्यांनाच घेऊन जा म्हणावं! वर ह्या कश्शाहीवरून चुकूनही बोलायचं नाही हं ह्या माणसाला! जी वटवट सुरू करतील ना, ऐकून ऐकून नुसतं माझं बीपी चढू लागतं. पुन्हा कसंनुसं होतंय सांगितलं तरीही संताप! जगणं वागणंच सारं कठीण होऊन बसलंय ह्यांच्यासोबत! बरं झालं पोरं आपापल्या मार्गाला लागली..नाहीतर ह्यांना सोसू शकले नसते हो कुणी!.. मी आहे, म्हणून टिकून आहे!
छे! आता कुणाचा फोन आला त्यात.. “हॅलो, हं, नीतू, बोल गं बाळा, कशी आहेस?.. छान.. इथे सगळं जैसे थे! आमची प्रकृती उत्तम!” “तू काय म्हणतेयस? हं..!...? अगं असं म्हणू नये गं मोठ्यांना.. शेवटी तुझे सासू-सासरे आहेत ते. अगं, वय वाढत जातं तसं होतं असं काहींना.. त्याचा असा राग राग करू नये बरं.. आता तुझे बाबाच नाही का, इतके विचित्रपणे वागतात पाहिलंयस ना.. तुझ्या घरचे परवडले! अगं मला काय माहीत नाही..? पहिलंय ना मी त्यांना. अगदी प्रेमळ आहेत दोघे. किती काळजी करतात ते तुम्हा मुलांची.. तू वायफळ वैताग करू नकोस. थोडं शांत रहायला शिकायला हवं तू आता. काहीही झालं तरी आता ते तुझीच जबाबदारी आहेत. आपलं डोकं शांत असेल, तर साऱ्या थकल्या-भागल्या घराचं नंदनवन होऊ शकतं राणी.. ठीक आहे. सांभाळ हो स्वतःला.. अच्छा.”