माझ्या आवडीची खिचडी
माझ्या आवडीची खिचडी
मलाही आवडते खिचडी खूप, पण आज खास मुलांची आणि त्यांच्या बाबांचीही फर्माईश आहे. त्याचं काय आहे, साबुदाणा खिचडीचे ह्या आधीचे अनेक बेत फसलेले आहेत, त्यामुळे हा बेत कळाला तरी सगळ्यांना बशीत लोहगोळे दिसतात!
आईचा सल्ला एकच! थोडं प्रेमानं करावं, म्हणजे कशी मऊशार होईल.. आता मी थोडीच ह्यांच्या नावाने खडे फोडत खिचडी शिजवते! आणि त्यासाठी साबुदाणाही तसाच पाहिजे ना! आईकडचा साबुदाणा कसा छान भिजतो.. ईकडच्याला त्याची सरच नाही मुळी! पाण्याचं प्रमाण कितीदा बदलून पाहिलं मी! मुळात आत झरा नसेल तर बाहेर भिजेलच कसा ना..?
शिकाऊ नणंद हळूच टीप देऊन जाते, वहिनी तुला सांगू का, वाफ येत असताना थोडासा दुधाचा हबका मारायचा! बघ मग कशी नरम रहाते!”. “पण मला नाही हो असली आगाऊ मस्का मारायची सवय! वाफ दवडत असेल तर ती ह्यांची! मला का बरं त्याचा जाच?”
हं, तरीही खिचडी सारी माझ्याच आवडीची न, म्हणून मोजून मापून मीठ, साखर, लिंबू घालतेच मी. तसंही काय मुलांना त्यातल्या बटाट्याशी, आणि सासऱ्यांना जोडीला दही असल्याशी मतलब! स्वतःसाठी चैन म्हणून बारीक चिरून कोथिंबीर भुरभुरली की आहाहा…
मुलं म्हणतात “मम्मी, yummy झालीये हां खिचडी!” तरी पाणी पितापिता सासूबाईंचं पुटपुटणं कानावर येतंच.. “दाण्याचा कूट, खोबरं, भरमसाठ ओतल्यावर खिचडी yummy न व्हायला काय आहे!” आईच्या पाठीवरून हात फिरवत असताना ते माझ्याकडे बघून हळूच डोळे मिचकावतो…
साऱ्या केल्याचं समाधान याहून मोठं कधीच नसतं.