*ये मेघा रे*
*ये मेघा रे*
उष्णतेचा दाह वाढू लागलाय
धरा ही आसुसली पाण्यासाठी
बघा उन्हाने जीव त्रासले सर्वांचे
पशुपक्षी ही तहानले उदकासाठी
चातकापरी वाट पाहे तो शिवारी
कर पुरी प्रतीक्षा बळीराजाची
मेघराजा वर्षाव कर आता धरेवर
पेरणीसाठी मृग धार पावसाची
ढवळ्या पवळ्या संग तो राबेल
बियाणांची पेरणी करेल
काबाडकष्ट करुनी धान्य पिकवेल
शिवारातले बहर बघून तो आनंदेल
मेघा बरसतो तो सांभाळून बरस
अति, कमी नको, शेतीच्या कामाला
अपाय होईल असा कोपू नको तर
हवा तेवढाच पडून फुलू दे शेताला
फिटू दे घेतलेले कर्ज सावकाराचे
वर्षभराची काळजी त्याची मिटू दे
बायका पोरांसंगे सुखाचे घास दोन
खाऊन आनंदाने त्याला जगू दे
अशाने गळफास त्याचा चुकेल
त्याच्या लक्ष्मीचा चेहरा खुलेल
जर पोशिंदा समाधानी तर माझा
देश भारतही समृद्ध सुखी असेल