वर्षा अनुराग
वर्षा अनुराग
उमलून येतो फुला फुलांनी
झाडावरचा दरवळ पाऊस
ओढ लावितो अधीर तनुला
हवाहवासा अवखळ पाउस
धारानृत्य जल्लोषाचे
उन्मेषाचा उन्मल पाऊस
अलगद बरसे हृदयामध्ये
तलम रेशमी मलमल पाउस
नव्याच रानी नवा शहारा
कायेवरती थरथर पाऊस
स्वप्निल नयनी दाटून येतो
अनुरागाचा मंथर पाऊस
धुंद घनिका तरल तराणे
रिमझिम संतूर नाद पाऊस
मनपाखराची आस जागवी
मधूर मधूरशी साद पाऊस
ओला पाऊस..निळसर पाऊस
मस्त दिवाणा.. मदहोश पाऊस
चराचराला घालून विळखा
आवेगाने बेहोश पाऊस
