माधवी
माधवी
शाल्मलीच्या डहाळी
ऋतू सजला माधवी
कळ्याफुलांचा सोहळा
देठादेठात पालवी
बकुळीच्या सौरभाची
रानी वाहते जान्हवी
बहरून आला मनात
गुलमोहर लाघवी
चैत्र पर्णांची नव्हाळी
लाल तांबूस हिरवी
कोकिळेच्या कठांमध्ये
ऋतूराजाची मालवी
आभूषणे घालून फुलांची
कुडा नाजुक तन्वी
सुरंगी वर्षावात पहाटे
स्नात झाली अन्वी
फुलोऱ्याला वृक्षीच्या
रूप मृदुल सान्वी
रिठा डवरून उभा
पानापानात आर्जवी
लता कुंज तरारले
तु-यातु-याने शैशवी
मनमुग्ध नवकळा
मधुमासाच्या उत्सवी !
