राममोहन
राममोहन
आकांत ऐकून सतीचा
थिजल्या भावना अनिवार
सनातन पाशात होता
बांधलेला काळ निर्विकार
व्यासंगी, विद्वान
बहुभाषांचा जाणकार
आहेस भारताचा
आधुनिक शिल्पकार
काचले जीवन स्त्रियांचे
वाहून परंपरांचे भार
सोसले किती अबलांनी
अन्याय आणि अत्याचार
वेदनेच्या द्रोहामध्ये
नव्या युगाचा उद्धार
अग्नीदेहाच्या राखेत
पेरलेस क्रांतीचे फुत्कार
जंजिरेवर दुर्बलतेच्या
केलास निर्भिड प्रहार
अंधारलेल्या आभाळात
घडले उजेडाचे सत्कार
अमानुष धर्मरूढीचा
करूनी ठाम धिक्कार
दिलीस तू निद्रिस्त
शतकांना अभ्युदयी ललकार!
