वृद्धाश्रम
वृद्धाश्रम
गरज सरो आणि जन्मदाते मरो!! अशी परिस्थिती आहे सध्या मानवजातीची!
जिने माझ्या मुखाला चाखले गोड अमृत;
आज तिच्या आठवणी झाल्या आहेत विस्मृत!
ज्यांनी मला अंगा खांद्यावर खेळवले;
आज मी त्यांच्याच सन्मानाला धुळीत मिळवले!
ज्यांची बोटे धरून चालले मी आयुष्याची वाट;
आज त्यांचाच वृद्धाश्रमात मांडला आहे मी थाट!!
आई होती फक्त छान छान कपडे द्यायला आणि नेसवायला साडी!
तिच्या आजारपणात तिची सेवा कशी करणार तिची लाडी?
बाबा होते फक्त आयुष्यभर स्वतःच्या रक्ताचे पाणी आटवायला;
त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या कृश देहाला कोणी सांगितलं आहे घरात नटवायला??
त्यांना नाही राहिली कपड्यांची व सर्व साधारण व्यवहारांची जाण;
करतात ते दोघे माझा पॉश फ्लॅट त्यांच्या मल-मूत्राने घाण!!!
ज्यांनी मला ज्ञानरूपी मंदिराचा बनवला होता कळस;
समाजात वावरताना वाटू लागला आहे मला त्यांचा किळस!!
सेल्फी काढण्यापूर्ती आणि टिकटॉक वर व्हिडिओ बनवण्यापूर्ती त्यांची सोबत वाटायची बरी!!
पण आज माझ्या छोट्या कुटुंबाला त्यांच्यासोबत नांदायला अडचण होत आहे खरी!!
वरचे एवढे समृद्ध विचार असणारी मी; कोंडला श्वास माझ्या आईबापाचा चार भिंतीत, ज्यांनी बनवलं होतं मला त्यांच्या कातडीने!!!
काल पासून कानावर गोष्टी येऊ लागल्या आहेत, माझेही चिरंजीव आमची पाठवणी करणार आहेत वृद्धाश्रमात तातडीने ?
