विवंचना
विवंचना
शुभ्रांकित वस्त्र ल्यालेले
भोवताली पसारे धुक्यांचे
ओघळता दव जाणिवांचे
मोहरले पान काळजाचे
शहारलेल्या गालावरती
निखळला थेंब आनंदाचा
गुणगुणला ओठांवरती
हर्षोन्मिलीत क्षण प्रेमाचा
थबकलेल्या पावलांनाही
गवसला सूर उडण्याचा
हिरमुसल्या स्वप्न पंखाना
ध्यास अनंत क्षितिजाचा
निद्रिस्त भाव कळ्यांनाही
प्रसन्नतेने आली ही जाग
अंतरी नैराश्य तिमिराचा
न उरलाय कुठलाच भाग
सरल्या अवघ्या विवंचना
झाली सुगंधित पायवाट
सुखद वाटतो आयुष्याचा
हा नागमोडी वळण घाट
बाहू पसरूनी जगण्याला
मी स्विकारेन जखमांना
समन्वयाच्या हिंदोळ्यावर
झुलवेन या सुख दुःखांना