विनोदी उखाणे स्पर्धा
विनोदी उखाणे स्पर्धा
परस बागेत मी बियाणं पेरलं
फळभाज्या वेलींनी ते घेरलं|१
देवाच्या कृपेने खूपच पिकलं
जाऊन बाजारी सहमी ते विकलं|२
त्याचे खुप खुप पैसे हो झाले
ते सोनाराला मी देऊन आले |३
घेऊन तेथे मंगळसूत्र नि डोरलं
ह्यांचे नाव त्यावरच मी कोरलं|४
नाव ? काय सांगू ? नावात काय?
बाळाचे दिसतात पाळण्यात पाय|५
छमछम पैंजण पायात वाजतात
उखाणा घेतांना जोडपी लाजतात|६
सा-यांना ऐकावासा वाटे उखाणा
नाव घ्यायचा तो ठरे एक बहाणा|७
सरस नाव घेइल तो एकच शहाणा
नसलं येत तर मूग गिळून बसाना|८
गालातल्या गालात खुदकन हसा
नस्ता का ते यमक जुळवून फसा|९
नाहितर तुम्ही नाव असलं घ्याल
आपलंच अज्ञान दाखवून द्याल|१०
सोन्याची विजार चांदीचे बक्कल
आमच्या ह्यांना भलेमोठे टक्कल|११
मी विग देऊन लढवली शक्कल|
तरी म्हणे मला जरा नाही अक्कल|१२
सांगा बरे ह्यात खरे माझे काय चुकले|
माझ्यासम हुशार पत्नीस हेच मुकले| |१३
(प्रथमत:समस्त स्री वर्ग व टक्कल असलेल्या पुरुष वर्गाची माफी मागून सहज सुचलं म्हणून लिहिलं आहे.विनोदी उखाणे लेखन स्पर्धा ह्यातूनच हास्य कविता लिहिली आहे कृपया नोंद घ्यावी.)
