व्दिज
व्दिज
नात्यांच्या या अफाट पसाऱ्यात
माणसांच्या ढोंगी दुटप्पीपणात
शत्रू कोण मित्र कोण या हिशोबात
होरपळच पदरी आली जीवनात ।।१।।
आपुलकीचा मध जीभेवर शिंपत
कडू कारल्याला तुपावर घोळवत
टोमण्यांचा विखारी डंख पचवत
मी राहीले अखंड धगधगत ।।२।।
मूकपणे प्रसंगांना तोंड देत
संकटांशी दोन हात करत
उभी राहीले मी दिपस्तंभागत
न डगमगता वादळवार्यांना थोपवत ।।३।।
आपलेपणाच्या चिरंतर सुखात
आनंदाच्या त्या प्रेमपावसात
न हुरळता मी चिंब भिजले सुखात
दुःखाचे कढ रिचवत मनात ।।४।।
सत्याचा वसा न सोडता
असत्याशी तडजोड न करता
खोटेपणाचा बुरखा फाडत
स्तब्ध राहीले मी न हळहळता ।।५।।
स्वकीयांनीच उसवलेली मने शिवत
रक्तबंबाळ ह्रदयावर मलमपट्टी लिंपत
वेदनेची खपली हलकेच जोजवत
संयमित मी हरवले आहे पहाटेच्या सुखस्वप्नात ।।६।।
अगणित आकांक्षांच्या या वाळवंटात
प्रेमाची हिरवळ फुलण्याच्या शोधात
नात्यांच्या अतूट विश्वासात
माणसातील माणुसकीला आव्हानत ।।७।।
