वैशाख पौर्णिमा
वैशाख पौर्णिमा
वंदना घे आज सार्या दु:खितांची गौतमा
गाठ आहे घट्ट पक्की वेदनांची गौतमा
जीव हा बेजार झाला कोणता आजार हा
ही नदी वाहून गेली आसवांची गौतमा
फार झाला खेळ आता माणसांची वंचना
मानहानी खूप झाली भावनांची गौतमा
डॉक्टरांना शोधतांना धूमकेतू आठवे
बंद झाली दार आता मंदिरांची गौतमा
मागणी लाखात आहे डॉक्टरांची वाचवा
प्रेत आहे जाळलेली वंचितांची गौतमा
काम धंदे बंद सारे आज नाही भाकरी
माणसे आहे उपाशी शोषितांची गौतमा
मानवा आधार आहे तो विचारांचा तुझ्या
धाड आली घोळक्याने वादळांची गौतमा
अंगुलीमाला समाजातील वाढू लागले
वेळ आली प्रेम भावा पेरण्यांची गौतमा
मानवांची आज झाली दानवांची भावना
गोष्ट आहे छेडलेल्या भांडनांची गौतमा
भावनांचा कोंडमारा खूप झाला मानवा
बौद्ध तत्वे ज्योत आहे जीवनांची गौतमा
ठार झाली माणसांची शांततेची भावना
युद्ध सारी पेटलेली मानवांची गौतमा
भावकीचे युद्ध झाले रक्तधारा सांडल्या
सांग त्यांना तू कथा रे कोलियांची गौतमा
प्रेम आहे माणसांची शुद्ध भाषा माणसा
भूक आहे आज त्यांना शिक्षणांची गौतमा
दु:ख आता फार झाले फार झाल्या वेदना
वंदना घे पोळलेल्या काळजांची गौतमा
