वाट
वाट
संध्याकाळ झाली
पाखरांचे थवेच्या थवे
घरट्याकडे परतू लागले
त्यांची ती ओढ पाहून
त्या पक्षिणीचे डोळे पाणावले
असेच त्या दिवशीही.......
पाखराची वाट पाहून पाहून
तिचे डोळे थकले अन्
हुंदका आवरताना नकळत काही थेंब,
पिलाच्या कोवळ्या लुसलुशीत
अंगावर टपकले,
पिलु बिचकलं, तिला बिलगलं
पुन्हा निजलं.......
त्या थेंबांचा अर्थ, त्यातील वेदना
त्याला कोठून कळणार?
तिचा आक्रोश, तिची तळमळ
त्या वेदनेची अव्यक्त सल
पाखराला तरी कुठं कळली होती?
दिवस, महिने, वर्ष......... संपली
त्या पक्षिणीचं नेहमीचं
वाट पहाणंही संपलं
उरलं फक्त
ऐन तारुण्यात,
चेहर्यावर आलेलं गांभीर्य..........
आटलेल्या नजरेपुढे एक शून्य.......
एक विस्कटलेलं घरटं....
एक अधुरं स्वप्नं.......
एक ओसाड मन........
अणि एकटेपण.
