वाचाल तर वाचाल
वाचाल तर वाचाल


वाचाल तर वाचाल
म्हण नाही नुसती
आयुष्याची आहे
ती एक कसोटी!
पुस्तक सांगतात गोष्ट
आजची आणि उद्याची
वाढवते जी कक्षा
चौफेर ज्ञानाची!
पुस्तकात असते
शिकवण अनुभवांची
समर्पक शब्दांत
गुंफण विचारांची!
पुस्तके सोडवितात
गुंतागुंत भावनांची
नव्याने देऊन जातात
प्रेरणा जगण्याची!
पुस्तके जपतात
विविधता भाषांची
वर्णावी तरी कशी
किमया साहित्यांची!
पुस्तके देतात
अनुभूती विस्मयाची
दुःख-प्रेम-मैत्री
राग अन् आनंदाची!
झेप कुठेही असो
विज्ञान-तंत्रज्ञानाची
तुलना नाही जगती
पुस्तकातील माहितीची!
वाचन म्हणजे
संधी ज्ञानार्जनाची
जोड देवून तयास
मत परिवर्तनाची!
करूया जपणूक
ग्रंथरुपी संपत्तीची
विद्वत्तेची सर नाही
कुठल्याही मालमत्तेशी!
व्हाट्सऍप-फेसबुकच्या युगातही
जपूया महती वाचनाची
करूया इतकाच संकल्प
काळजी घेऊ पुस्तकांची