उद्ध्वस्त मन
उद्ध्वस्त मन
मनात काय चाललंय
मनात जाऊन कळले असते तर
सांगता आले असते
पण असं होत नाही
मनातले काहूर शांत राहात नाही
मनालाच कळत नाही
त्याची होणारी चलबिचल विचारांची आदलाबदल
ते वेगळ्याच गर्दीत भटकत असते
नेमकं काय होतंय मनालाही कळत नसते
मनातलं ओळखता येत नाही म्हणून
बदलणारे मन कसेही वळण घेते
भितीच्या ज्वाला लपेटून
चुकीच्या दिशेने पळते
देत असतो अंतरात्मा फसगत होण्याचा इशारा
तेव्हा दुखावलेले मन कुविचारांनी धडधडत असते
चांगल्या, वाईटाच्या रिंगणात
मनातला कल्लोळ थांबत नाही
नको त्या विचारातूनही बाहेर पडत नाही
मनाच्या विरोधात जाऊन आपलीच राख झाली असते
त्यांनतर एक शापित आत्मा घेऊन जगायचे असते
पावले चुकताय हे
डोळ्यांना दिसत असतानाही
पाय मागे घेत नाही
नियंत्रण सुटलेल्या मनाला
ताब्यात ठेवता येत नाही
उद्ध्वस्त होते जगणे तेव्हा चूक कळते
चुकले ते चुकले चुकीला माफी नसते
स्वतःला अश्रुंनी कितीही न्हाऊ घातले तरी
आयुष्य पुन्हा सुंदर दिसणार नसते
