तू गणेशा (गझल)
तू गणेशा (गझल)
सृष्टीत जीवनाचे, भान तू गणेशा
पूजेत आज पहिला, मान तू गणेशा
मुखमंडलीत आभा, अन् करांत परशू
नेत्रांत तेज दिसते, छान तू गणेशा
वसतोस या मनी तू, नित्य सोबती तू
तू प्राण आमचा रे, जान तू गणेशा
बेसूर गीत गातो... सूर, ताल नाही
होऊ सुरेल आम्ही, तान तू गणेशा
जास्वंद फूल प्रिय तुज, अर्पितो सदा रे
स्वीकार वंदना ही, शान तू गणेशा
ओंजळ रितीच माझी, मी अशी भिकारी
या भक्त 'उमा'स दे ना, दान तू गणेशा
