तुझ्या माझ्यातले अंतर
तुझ्या माझ्यातले अंतर
तुझ्या माझ्यातले अंतर मिटायाला हवे होते
तुझ्या सुरात माझे सूर मिळायाला हवे होते
जळाली बाग स्वप्नांची क्षणाचा वेळ झाल्याने
मला गांभीर्य वेळेचे कळायाला हवे होते
किती अश्रू तुझ्या माझ्या असे डोळ्यात आलेले
जरा थांबून दोघांनी रडायाला हवे होते
तुझ्या माझ्या अहंकारात झाली राख प्रेमाची
कुणी गर्वा पुढे थोडे झुकायाला हवे होते
अबोला जीव घेणा तो कधीही संपला नाही
तुझ्या मौनातले कोडे सुटायाला हवे होते
कधीही ऐकली नाहीस माझी हाक तू चंद्रा
तुला आक्रोश लाटांचे दिसायाला हवे होते
किती घाई इथे आहे ऋतूंनाही निघायाची
वसंताने घरी माझ्या रहायाला हवे होते
उजेडाला कुठे शोधू अता अंधार झाल्यावर
मनाने आणखी थोडे जळायाला हवे होते
भविष्याच्या तुझ्या रेषा कितीदा पाहते राणी
जरा अश्रूंस माझ्याही बघायाला हवे होते
उशीराने कळाले ना तुलाही अर्थ नात्यांचे
जरा आधी असे काही घडायाला हवे होते