तुझ्यानंतर
तुझ्यानंतर
कुणीही राहिले नाही जिव्हाळ्याचे तुझ्यानंतर
सखी जीवन मला वाटे तुफानाचे तुझ्यानंतर
कुठेही गारवा नाही समुद्राच्या किनाऱ्याला
सुरू झाले ऋतू सारे उन्हाळ्याचे तुझ्यानंतर
जिथे जाशील तू तेथे कशी येते गडे हिरवळ
ऋतू सरले सये माझे वसंताचे तुझ्यानंतर
फुलाला अन सुगंधाला कुठे नेलेस राणी तू
उन्हाने वाळले काटे गुलाबाचे तुझ्यानंतर
तुझ्यासोबत पुन्हा जीवन जगायाचे मला आहे
कसे फिरवू उलट काटे घड्याळाचे तुझ्यानंतर

